मजुरी, उत्पादन खर्च, दर यांचा विचार करता कापूस किंवा अन्य पिकांच्या तुलनेत शेवगा पीक मौजे भांबेरी (जि. जालना) येथील सतीश अंकुश कणके यांना फायदेशीर ठरत आहे. या पिकाबाबत मार्गदर्शन घेत उत्पादन व त्याची विक्री व्यवस्थाही सक्षम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केवळ चार एकर शेती असताना ती अधिकाधिक विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
गावची पीक परिस्थिती
एकूण 920 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 820 हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे. त्यापैकी 110 हेक्टर ऊस, 325 हेक्टर कापूस व मोसंबी 42 हेक्टर असे 477 हेक्टर म्हणजे 58 टक्के क्षेत्र या तीन पिकांखाली आहे. त्यांची प्रति हेक्टरी उत्पादकता अनुक्रमे 115 टन, 22 क्विंटल व 45 टन अशी आहे.
शेवगा ठरला फायदेशीर
याच गावातील सतीश अंकुश कणके यांनी 12 वीनंतर डीएड केले. नोकरी मिळाली नाही म्हणून शेतीतच संपूर्ण लक्ष द्यायला सुरवात केली. गावात त्यांचे कृषी विक्री केंद्र आहे. ते चालवत असताना आपल्या चार एकर क्षेत्रावर ते प्रयोगशील वृत्तीतून शेतीत विकास साधण्याचाही प्रयत्न करीत असतात.
भांबेरीपासून केवळ 10 ते 12 किमी अंतरावर समर्थ सहकारी साखर कारखाना आहे. कॅनॉलचे पाणी असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे असतो. उसाची एकरी उत्पादकता सरासरी 45 ते 50 टन अशी आहे, एकरी 80 टनांपेक्षा जास्त उत्पादन काढणारे शेतकरी तसे या भागात कमीच. आपणही ऊसपीकच घ्यावे अशी सतीश यांच्या घरच्या लोकांची इच्छा होती. मात्र, सतीश यांच्या डोक्यात काही वेगळे होते.
जालन्यापासून काही किलोमीटरवर असलेल्या धारकल्याण येथे त्यांचे सासरे राहतात. ते शेवगा उत्पादक आहेत. त्यांनी या पिकातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले होते. सासऱ्यांनीही सतीश यांना या पिकाच्या लागवडीबाबत उत्तेजन दिले.
तत्पूर्वी सतीश यांनी कोबी आणि काकडीचे पीक घेण्याचाही प्रयोग केला होता. मात्र, मजुरांची टंचाई व दोन्ही पिकांतील उत्पादनातील व दरांतील जोखीम त्यांना मोठी वाटली. आर्थिकदृष्ट्या ही पिके परवडली नव्हती. आपण शेवगा पिकाचा प्रयोग करून पाहू या असे त्यांनी ठरवले. त्याचे बियाणेही सासऱ्यांनी दिले. लागवडीपूर्वी शेवगा पिकाविषयी पुस्तकांतूनही ज्ञान घेतले. "ऍग्रोवन'ची साथ होतीच.
सतीश यांनी आपल्या चार एकरांपैकी एका एकरात शेवगा पिकाचे नियोजन केले. डिसेंबर महिन्यात शेवग्याची सुमारे साडेआठशे ते नऊशे झाडे लावण्यात आली. त्यासाठी अर्धा फूट खोल खड्डे खोदले. गांडूळ खत, शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेट खत मातीत चांगले मिसळून खड्डा भरला. त्याआधी त्यात थोडे फोरेट टाकले. बियाणे चार तास पाण्यात भिजवून त्यास कार्बेन्डाझिमची प्रक्रिया केली. प्रत्येक खड्ड्यात एक बियाणे लावले. बियाणे पाण्यात भिजवल्यामुळे बियाण्याची उगवण लवकर झाली. वाढीच्या सुरवातीलाच खते दिल्यामुळे झाडांची वाढ चांगली व निरोगी झाली. लागवडीपूर्वी खड्ड्यात गांडूळ खत, शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेट यांचा वापर केला. शेवग्याची उगवण झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने युरिया खत दिले.
शेवग्याची वाढ झपाट्याने होत होती. दोन महिन्यांनंतर झाडाची वाढ दोन ते अडीच फूट झाली असता सर्वप्रथम त्याचे शेंडे खुडले. आणखी दहा दिवसांनंतर त्यावर संजीवकाची फवारणी केली, त्यामुळे वाढ नियंत्रणात ठेवता आली. झाडाची अनावश्यक वाढ थांबल्याने त्याला जास्तीच्या फांद्या फुटल्या. पाचव्या महिन्यापासून फुले लागण्यास सुरवात झाली. फुलांची गळ होऊ नये म्हणूनही एका संजीवकाची फवारणी केली. ठिबकद्वारे मॅग्नेशिअमची मात्रा दिली. याशिवाय अन्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर दोन वेळा केला. शेवग्याला तीन वेळेस जमिनीतून व काही प्रमाणात ठिबकमधून खते दिली.
जमीन भारी व पाण्याचा निचरा कमी होत असल्याने झाडांना प्रत्येकी दोन फूट रुंदीचे व उंचीचे गादीवाफे तयार करून घेतले. शिवाय, दोन वाफ्यांमध्ये चरही काढले. त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला. तरीही मध्यंतरी झालेल्या अति पावसात सुमारे 60 ते 70 झाडांचे नुकसान झाले. जमिनीचा प्रकार लक्षात घेता आणि सिंचन जास्तीत जास्त कॅनॉलद्वारे असल्याने जमिनीवर क्षार मोठ्या प्रमाणात जमतात, त्यामुळे दिलेली खते संपूर्णतः पिकांना उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे घरच्या घरी जिवामृत बनवून प्रति झाड एक लिटर याप्रमाणे प्रत्येकी तीन महिन्यांतून एकदा या प्रमाणात दिले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला.
शेताला कॅनॉलचे पाणी येत असले तरी ते नियमित नसल्याने दोनशे फूट खोलीची कूपनलिका खोदली. त्यामुळे शेवग्याला व उर्वरित क्षेत्रातील कापसाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी देता आले. शेवटी पाणी कमी पडल्याने काकांकडूनही पाणी घेऊन ते शेवग्याला पुरवले. याशिवाय एक लोड पाणीही (वाफे पद्धतीने) दिले. एकूण प्रयत्नांतून शेंगा मोठ्या प्रमाणात लागल्या.
सतीश व त्यांच्या पत्नी असे दोघे शेवगा तोडणीचे व्यवस्थापन सांभाळतात. त्यांनी मजुरांवरील खर्च कमी केला आहे. तोडलेल्या शेंगांचे प्रत्येकी 10 किलोचे बंडल तयार करताना पाच बंडलचा गठ्ठा बांधून मार्केटला पाठविला जातो. सुरवातीला औरंगाबाद व जालना बाजार पेठेत माल पाठविला. मात्र, औरंगाबादच्या तुलनेत जालना बाजारपेठेत दर चांगले मिळाल्याने आता तेथेच माल पाठविला जातो.
मागील जुलै व ऑगस्टच्या कालावधीत त्यांना एकूण 50 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. त्याला दर क्विंटलला चार हजार रुपयांपर्यंत म्हणजे किलोला 40 रुपये दर मिळाला. त्यातून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यात 40 हजार रुपये खर्च आला. त्यानंतर जानेवारीत शेवगा प्लॉट सुरू झाला. सध्याही बागेत शेवग्याची तोडणी सुरू आहे. जानेवारी ते आतापर्यंतच्या काळात सुमारे शंभर क्विंटल मालाची विक्री जालना मार्केटला केली आहे.
जानेवारीत क्विंटलला सात हजार रुपये दर मिळाला. त्यानंतर तो तीन हजार, चार हजार व सध्या तो सात हजार रुपये सुरू आहे. मध्यंतरी एप्रिल-मेच्या काळात मात्र बाजारात आवक वाढल्याने दहा रुपये प्रति किलो दरानेही शेंगा विकाव्या लागल्या.
सतीश म्हणाले, की अन्य पिकांच्या तुलनेत शेवगा पिकाची देखभाल कमी आहे. पाणीही कमी लागते. सध्या त्यांनी दोन एकरांत ठिबक केले आहे. शेवगा पिकाला मजुरी खर्चही तुलनेने कमी येतो. दर 21 दिवसांनी त्यांनी कीडनाशकांच्या फवारण्या मात्र केल्या आहेत. पीक संरक्षण, रासायनिक व सेंद्रिय खते यांवरच जास्त खर्च करावा लागतो. मात्र, हे पीक वर्षभरातील हंगामाचा विचार करता दीड लाख रुपयांपर्यंत नफा देऊन जाते, असा आपला अनुभव आहे.
सतीश उर्वरित तीन एकरांत कपाशी घेतात. त्यांना एकरी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. आता लागवडीचे अंतरही त्यांनी साडेतीन बाय एक फूट ठेवण्यास सुरवात केली आहे. एकरी झाडांची संख्या पूर्वीच्या तुलनेत दीडपटीने वाढविण्याचा व खर्चावर नियंत्रण ठेवताना उत्पादनात वाढ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सचिन यांच्याकडे कृषी विक्री केंद्राचीही जबाबदारी असल्याने त्यांच्या पत्नी सौ. मंदा शेतीचे व्यवस्थापन पाहतात.
कृषी विभागाचेही कणके कुटुंबाला चांगले सहकार्य मिळते.
सतीश आपल्या केंद्राद्वारे ऍग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या शिफारशी काही वेळा शेतकऱ्यांना वाचून दाखवतात व त्याप्रमाणे निविष्ठा देतात. ऍग्रोवनवर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने विक्रेता आपली फसवणूक करीत नाही हे त्यांना उमगते, असा अनुभव सतीश यांनी सांगितला.
शेतीविषयक समग्र ज्ञान देणारे ऍग्रोवन हे एकमेव दैनिक असल्याचेही ते सांगतात. सून ते पती- पत्नी आवडीने वाचतात व त्यावर चर्चा देखील करतात. त्यातील काही बाबींसाठी कृषी विभागाची आणि कृषी शास्त्रज्ञांचीसुद्धा ते मदत घेतात.
(लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)
संपर्क - सचिन कणके - 9158538404
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मेहनत, पक्षी संगोपनातील धोके, बाजारपेठेतील अनियमित...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
जालना जिल्ह्यात बोररांजणी (ता. घनसावंगी) येथील सुम...
लोप पावत चाललेली ग्रामसंस्कृती जपण्याचा प्रयत्न जि...