निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमितपणामुळे दुष्काळाच्या झळा साऱ्यांनाच होरपळवतायेत. या दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलीय ती शेतकऱ्यांना. परंतू अशा परिस्थितीमध्ये जिद्द, मेहनत व चिकाटी, उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करत कांदा, केळी व मोसंबी पिकाची लागवड करुन रावसाहेब मोहिते या शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करत अवघ्या नऊ एकर शेतीमधून 11 लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
जालना जिल्हा मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले एक हजार पाचशे लोकसंख्येचे घेटुळी हे गाव. गावाचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेतीवर चालतो. यंदाच्या वर्षी पावसाचे अत्यल्प पाऊस झाल्याने गावातील शेतकरी संकटात सापडला आहे. परंतू अशा परिस्थितीमध्ये रावसाहेब मोहिते यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर व कुटूंबाच्या साथीने ही किमया केली आहे. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने भक्कम पाठबळ दिले आणि त्यांनी मग मागे वळून पाहिलेच नाही.
रावसाहेब मोहिते पाटील यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली आणली. त्यामुळे पाण्याची चांगल्या प्रकारे बचत होऊन अल्प पर्जन्यमान झाले असतानासुद्धा कांदा बी, केळी आणि मोसंबी पिकाची लागवड करत शास्त्रशुद्ध पद्धतीने खते, पाणी दिल्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
कांदा बियाण्याची दोन एकरवर लागवड करत ठिबक सिंचनाच्या वापराबरोबरच खताचा संतुलित वापर व किडरोगाचे वेळीच नियंत्रण केले. कांदा बी लागवडीसाठी 50 हजार रुपयांचा खर्च करुन 10 क्विंटल बियाण्यांचे उत्पादन करुन या माध्यमातून चार लक्ष रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे.
मोहिते पाटील यांनी यावर्षी कापूस, सोयाबीन व तूर आंतरपीक म्हणून घेतले. त्याचे एकूण क्षेत्र 2.5 एकर असून त्यापासून त्यांना जवळपास 50 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न झालेले आहे. कांदा बिजोत्पादनाची लागवड दोन एकर क्षेत्रामध्ये करत त्यापासून कमीत कमी 8 ते 10 क्विंटल बियाणे उत्पादन होऊन त्यापासून चार लक्ष रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. यासाठी ठिबक सिंचनाबरोबरच खताचा संतुलित वापर व किडरोगाचे वेळीच नियंत्रण केले असल्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
दोन एकर क्षेत्रामध्ये केळीचे पीक घेतले असून ग्रँडनाईन (G-9) जातीचे टिश्युकल्चर रोपे उपलब्ध करुन घेऊन लागवड केलेली आहे. या दाने एकरमध्ये केळीचे तीन हजार 500 रोपे लागवड केलेली आहे व या माध्यमातून सिंचनाचे योग्य नियोजनाबरोबरच खताचा संतुलित प्रमाण वापर केल्यामुळे केळीचे पीक जोमदार आलेले आहे. प्रती झाड 25 ते 30 किलोच्या केळीच्या घडाचे उत्पादन या पासून प्राप्त होत आहे.
मोसंबी पिकाची लागवड दोन एकरमध्ये केली असून प्रत्येक झाडामध्ये 18x18 फुट अंतर ठेवण्यात आले. मोसंबीच्या एकूण 270 झाडांची लागवड त्यांनी या क्षेत्रामध्ये केली असून लागवडीवेळी जमिनीवर आच्छादन म्हणून गव्हाचा भुसा वापरला आहे. डिफ्युजन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सिंचनाची सोय केली असून प्रत्येक झाडाला चार डिफ्युजर बसवून घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे सिंचन केल्यानंतर पाणी जमिनीत 10 ते 15 इंच खोलीवर गेल्यावरच ते मोसंबीच्या झाडाला मिळेल. हे पाणी जमिनीवर न दिसता जमिनीत असणार आहे, त्यामुळे बाष्पीभवन होणार नाही. पर्यायाने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन झाडांची योग्य प्रमाणात वाढ होणार आहे. या मोसंबी पिकापासून तीन लक्ष रुपयांचे उत्पादन अपेक्षित असल्याचे रावसाहेब मोहिते पाटील यांनी सांगितले.
आज विभक्त कुटुंबामुळे शेतीवर लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. मात्र कुटुंबातील सर्वच सदस्य शेतावर राबल्यास पिकांच्या उत्पन्नासोबत आर्थिक कामांचे नियोजन करता येते. पत्नी रुक्मिण मोहिते, मुलगा ओंकार, हनुमान, सून मनिषा व ज्योती यांनी शेतात मजुरांकडून काम करुन घेण्याबरोबरच शेतात पूर्ण वेळ दिल्याचा फायदा झाला.
संपर्कासाठी पत्ता
श्री रावसाहेब मोहिते
मु. घेटुळी ता.जि. जालना
मो. 8605874777, 9970915748
लेखक - एस.के.बावस्कर
जिल्हा माहिती अधिकारी, जालना
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 4/16/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
मेहनत, पक्षी संगोपनातील धोके, बाजारपेठेतील अनियमित...
लोप पावत चाललेली ग्रामसंस्कृती जपण्याचा प्रयत्न जि...
मजुरी, उत्पादन खर्च, दर यांचा विचार करता कापूस किं...