सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यातील सातारा-पुसेगाव रस्त्यावर साधारणपणे तीन हजार लोकसंख्येचे जाणखगाव आहे. पाण्याचा कोणताही स्रोत नसल्याने दुष्काळात या गावात ग्रामस्थाना टॅंकरद्वारा पाणी पुरवले जात होते. प्रत्येक कुटुंबास 35 लिटर पाणी मोजून दिले जात होते. कडक दुष्काळामुळे जवळपास 220 विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडल्या होत्या. त्यात सर्वत्र गवत उगवले होते, तसेच जनावरांसाठी गावात छावणी सुरू करण्यात आली होती. या छावणीत गावातील 125 जनावरे दाखल करण्याची वेळ आली होती. दुष्काळामुळे पेरणी करता न आल्याने सर्वच क्षेत्र तसेच पडून होते. हातपंपाना अर्धा तास हापसा केल्यावर एक कळशीभर पाणी यायचे. याच दरम्यान सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्याशी येथील ग्रामस्थांचा संपर्क झाला. झालेल्या चर्चेतून पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जलसंधारणी कामे हाती घेण्याचा मुद्दा समोर आला. जाखणगावच्या सरंपच कृष्णाबाई वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. त्यात कोणती कामे कशा प्रकारे करता येतील, पाणीटंचाई कशी दूर करता येईल याबाबत दिशा ठरवण्यात आली. सर्व कामांत लोकसहभाग सर्वांत महत्त्वाचा असल्याच्या मुद्यावर एकमत झाले.
गावात ओढ्यावर पूर्वी कृषी विभागाकडून 10 बंधारे बांधण्यात आले होते. या बंधाऱ्याचे काम निष्कृष्ट झाल्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचून राहत नव्हते, त्यामुळे हे बंधारे गाळाने भरले होते. प्रथम या बंधाऱ्याची रचना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. या बंधाऱ्याना दरवाजे होते. कॉंक्रीटद्वारा ते बंद करण्यात आले. काही बंधाऱ्यांचे काम निष्कृष्ट असल्याने या बंधाऱ्याच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत होती. अशा बंधाऱ्यांना आतील बाजूस दगडाचे पिंचिंग करून बंधाऱ्याचे मजबुतीकरण करण्यात आले. यामुळे बंधाऱ्यांतून गळती थांबवण्यास मदत झाली. त्यानंतर लोकसहभागातून ओढ्याचे रूंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. त्यातील गाळ काढण्यात आला. सुमारे 10 बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरण्यासाठी नेला. 10 बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. "सकाळ माध्यम समूहा'च्या तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानाच्या माध्यमाची जलसंधारणाच्या कामांत मोठी मदत झाली.
गावात दुष्काळामुळे शेतजमीन पडून होती. पाणलोटाची कामे झाल्यानंतर पुढील दृश्यपरिणाम दिसून येऊ लागले. ज्या वेळी दमदार पाऊस झाला तेव्हा बंधारे पाण्याने तुडुंब भरून गेले. यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. शेतकरी पारंपरिक पिकांव्यतिरिक्त अन्य पिकांचा विचार करू लागले. बागायत शेतीसाठी त्यांचे नियोजन सुरू झाले. गावातील सुमारे पंधराशे हेक्टर क्षेत्र बागायत होण्यास त्यामुळे मदत झाली. या बागायत क्षेत्रात ऊस, आले, बटाटा, कांदा, सोयाबीन यासारखी पिके आता घेतली जात आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गावात दुष्काळी परिस्थितीत पूर्वी 100 ते 150 लिटर दूध संकलन होत होते. आता परिस्थितीत बदल झाला आहे. शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन वाढले असून, सध्या संकलन 600 ते 700 लिटरपर्यंत पोचले आहे.
लोकसहभागातून करण्यात आलेल्या जलसंधारण कामांमुळे पाण्यावाचून कोरड्या पडलेल्या 290 विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. वर्षातून आठ महिने टॅंकर सुरू असणाऱ्या जाखणगावात टॅंकरमुक्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणलोटाच्या कामांनंतर जो पाऊस झाला त्या वेळी गावातील हातपंपांना विना हापसा पाणी येत होते. सध्याही त्यांची परिस्थिती समाधानकारक असून, ग्रामस्थांचा पिण्याचा प्रश्न सुटला आहे.
1) गावातील 10 बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन
2) मातीचे चार बंधारे बांधण्यात आले.
3) दहा हजार मीटर क्षेत्रात बांधबंदिस्ती
4) 25 दगडी बांध बांधण्यात आले.
दुष्काळामुळे गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागे. शेतीचे त्यामुळे नुकसान झाले होते. आता गावातील सर्वांनी एकत्र येऊन जलसंधारणाची कामे हाती घेऊन ती पूर्ण केली आहेत, त्यामुळे टॅंकरमुक्ती होण्यास मदत झाली आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे बागायत शेतीला चालना मिळाली. गावाचा आर्थिक स्रोत आता वाढतो आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तहानही भागवली जात आहे.
जितेंद्र शिंदे, उपसरपंच जाखणगाव.
तीन वर्षे पाऊस नसल्यामुळे पेरणी करण्यावर मर्यादा आल्या होत्या. जनावरेही छावणीत ठेवावी लागली होती. पाणलोटाची कामे झाल्यामुळे विहिरीची पाणीपातळी वाढली, यामुळे माझे दोन एकर क्षेत्र बागायत झाले. सध्या ऊस, बटाटा व ज्वारी पिके घेतली आहेत, अजूनही पाणीपातळी चांगली आहे.
जगन्नाथ शिंदे, शेतकरी, जाखणगाव
पाणी उपलब्ध झाल्यामुळे दोन एकर बटाटा व एक एकर कांद्याचे पीक घेतले आहे. जुलै आला तरी अजून विहिरीत बऱ्यापैकी पाणीपातळी टिकून आहे.
बाळासाहेब शिंदे, शेतकरी.
जाखणगावच्या ग्रामस्थांची एकजूट चांगली असल्याने पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने गावाची वाटचाल सुरू झाली आहे. बंधारे पुनरुज्जीवित केल्याने विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
डॉ. अविनाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते, सातारा.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सातारा जिल्ह्यातील गोळेवाडी (ता. कोरेगाव) येथील ना...
सातारा जिल्ह्यात ऊस पट्ट्यातील मालगावमधील काही शेत...
विहे (ता. पाटण, जि. सातारा) येथील राजेंद्र देशमुख ...
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थल. लोकसंख्या ४,९७४ ...