অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची

सातारा जिल्ह्यातील विरवडे (ता. कराड) येथील महेश शिंदे हा युवक गेल्या काही वर्षांपासून फळभाजी पिकामध्ये आधुनिक पद्धतींचा अवलंब करत कमीत कमी मजुरांमध्ये चांगले उत्पादन मिळवत आहे. या वर्षी त्याने केलेल्या ढोबळी मिरचीच्या प्रयोगाची माहिती घेऊ. 
विरवडे (ता. कराड, जि. सातारा) येथील महेश माणिक शिंदे यांनी आयटीआय कोर्स केल्यानंतर काही वर्षे पुणे येथे नोकरी केली. त्यादरम्यान वडिलार्जित शेतीकडे लक्ष देणारे कुणीच नसल्यामुळे ते पूर्णवेळ शेतीकडे वळले. त्यांना वडिलोपार्जित सहा एकर शेती असून, ती पाच एकर क्षेत्र गावामध्ये व एक एकर क्षेत्र शेजारच्या सैदापूर गावामध्ये अशी विभागलेली आहे. या एक एकर क्षेत्राजवळील पवार यांची पाच एकर शेती ते सहा वर्षांपूर्वीपासून कसत आहेत. या शेतीमध्ये एकत्रित सहा एकरांत फळभाज्या व फुलपिके घेतली जातात. स्वतःच्या व पवार यांच्या शेतातील बोअरद्वारे क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येतो. या क्षेत्रातील पिकात झालेला फायदा किंवा तोटा दोघांमध्ये विभागला जातो. गावाकडील शेतातही पूर्वी भाजीपाला पिके महेश घेत असत; मात्र अलीकडे त्यांनी त्या पाच एकरांमध्ये ऊस पिकाची लागवड केली आहे. सध्या सहा एकरमध्ये ढोबळी मिरचीचे पीक आहे. 

लागवड तंत्रज्ञान

  • रोपवाटिकेतून सशक्त रोपांची खरेदी करतात. या वर्षी लागवडीसाठी रोपवाटिकेतून रोपे विकत घेतली.
  • सरीतील अंतर चार फूट व दोन रोपांमध्ये एक फूट अंतर ठेवून आठ मार्चला 65 हजार रोपांची लागवड केली.
  • लागवडीपूर्वी डीएपी, एमओपी, निंबोळी पेंड व ह्युमिक ऍसिड मिसळून प्रमाणित बेसल डोस दिला जातो.
  • दोन वर्षांतून एकवेळ एकरी 15 ते 20 ट्रेलर शेणखताचा वापर करतात.
  • या संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. ठिबकमुळे कमी मजुरांत व कमी पाण्यामध्ये पिकांचे नियोजन करणे शक्‍य होत असल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले.
  • रोप लागवडीबरोबरच एकरी 30 ते 35 पिवळे चिकट सापळे लावतात, त्यामुळे किडी व फळे खाणाऱ्या माशीचा प्रार्दुभाव कमी प्रमाणात होतो.
  • पालापाचोळ्याची कुट्टी अथवा गहू, हरभरा व सोयाबीनच्या भुश्‍श्‍याचा सरीमध्ये आच्छादनासाठी वापर केल्याने शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • फळांची वाढ, फुटवे, फळांची संख्या, पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी पीक असेपर्यंत विद्राव्य खतांचा वापर सुरू ठेवतात.
  • दरवर्षी किडीमध्ये फुलकिडे, अळी, कोळी आणि रोगामध्ये करप्याचा प्रार्दुभाव अधिक प्रमाणात जाणवतो. यासाठी गरजेनुसार कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात.

'ऍग्रोवन' मुळे कळतात शेतकऱ्यांचे प्रयोग

अन्य शेतकऱ्यांचे प्रयोग पाहून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करत असतो. शेतीच्या नव्या प्रयोगांची माहिती होण्यासाठी "ऍग्रोवन'चा फायदा होतो. आपल्या शेतीमागे घरच्या लोकांचे सहकार्य मोठे आहे. सुरवातीला शेतीचा अनुभव नसताना परिसरातील कृषी विभागातील लोक आणि अनुभवी शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन मिळाल्याचे महेश यांनी आवर्जून सांगितले. 

शेतीतील धडपड

  • या वर्षी त्यांनी ऊस पिकामध्ये दोन सरींतील अंतर सहा फूट ठेवण्याचा प्रयोग केला आहे. पिकांच्या वाढीसाठी अधिक जागा ठेवल्यास उसाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होईल, असे महेश शिंदे यांनी सांगितले.
  • गेल्या तीन वर्षांत त्यांनी झेंडू, टोमॅटो, काकडी व ढोबळी मिरची ही पिके घेतली असून 60 गुंठ्यांमधील झेंडूमधून चांगला फायदा मिळाला होता.
  • त्यानंतर सहा एकरांवर टोमॅटोचे पीक घेतले होते. सुरवातीस गारपीट झाली. यातून सावरून माल हाती आल्यानंतर दर पडल्याने साडेपाच ते सहा लाखांचे नुकसान झाले.
  • त्यानंतर संपूर्ण क्षेत्रावर काकडी केली होती. त्यातून एकरी 20 टन उत्पादन मिळाले. प्रति किलोस सरासरी 13 रुपये दर मिळाल्याने चांगला फायदा शिल्लक राहिला.
  • तीन वर्षांत दोन वेळा ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. पहिल्या प्लॉटमधून एकरी 20 टनांपर्यंत सरासरी उत्पादन मिळाले, त्यास प्रति किलो 20 रुपये दर मिळाला. दुसऱ्या बहरावेळी जास्त पाऊस व बाजारपेठेत दर नसल्याने उत्पन्नातून झालेला खर्च भागवता झाला.

उत्पादन खर्च (सहा एकर क्षेत्रासाठी)

सध्या त्यांनी सहा एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे. त्याचा जमा-खर्च खालीलप्रमाणे 
  • मशागत - एक लाख रुपये
  • 65 हजार रोपांचा खर्च 1.5 रुपये प्रति रोपप्रमाणे - 97 हजार 500 रु.
  • शेणखत 100 ब्रास प्रति ब्रास 2500 प्रमाणे - दोन लाख 50 हजार रु.
  • ठिबक सिंचन - दोन लाख 25 हजार रु.
  • खते - (वरखते एक लाख व विद्राव्य खते 1,45,000 रु.) - एकूण दोन लाख 45 हजार रु.
  • कीडनाशके - एक लाख रु.
  • मजुरी (आतापर्यंत) - दोन लाख 25 हजार रु.
  • प्रतवारी, पॅकिंग खर्च एक रुपया प्रति किलोप्रमाणे (आतापर्यंत) ः 75 हजार रु.
  • एकूण खर्च - 13 लाख 17 हजार 500 रुपये
  • आतापर्यंत पहिल्या तोड्यामध्ये 24 टन माल निघाला असून, त्याला 16 रुपये दर मिळाला. दुसऱ्या तोड्यामध्ये 20 टन माल निघाला असून, त्याला 23 रुपये दर मिळाला. तिसऱ्या तोड्यात 30 टन मिरची निघाली असून त्याला 26 रुपये दर मिळाला आहे. तीन तोड्यांतून मिळालेल्या 74 टन उत्पादनातून 16 लाख 24 हजार रुपये मिळाले आहेत. आणखी साधारणपणे पाऊसमानानुसार 15 ते 18 तोडे होतील.

विक्री व्यवस्थापन

  • पुणे व मुंबई येथे उत्पादित मालाची ते विक्री करतात; परंतु आता व्यापारी शेतावरून माल नेत आहेत. दरात खूप चढ- उतार राहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
  • सध्या मजुरी व खतांवरील खर्च न झेपणारा आहे. शेतीत व्यावसायिकता आणत ते मजुरांवरील खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे कल आहे.
  • कऱ्हाड येथील बाजारपेठेत काही प्रमाणात मालाची ते विक्री करतात.
  • पूर्वी पोत्यात माल भरून विक्रीसाठी न्यायचे. त्यात बदल केला असून मालासाठी स्वतंत्र पॅकिंग करण्यास सुरवात केली आहे. माल चांगला राहिल्याने चांगला दर मिळतो. शेतालगत पॅकिंग हाऊसचीही उभारणी केली आहे. त्याठिकाणी प्रतवारी, मालाची साठवणूक, पॅकिंग व वजन करण्याची स्वतंत्र सोय केली आहे.

शेतीसाठी खेळते भांडवल आवश्‍यकच

शेतीसाठी खेळत्या भांडवलाची आवश्‍यकता असते, त्याचे नियोजन पूर्ण पिकांचा हिशेब लक्षात घेऊन केले जाते. त्यामुळे योग्य वेळी खते, कीडनाशके आणि अन्य आपत्‌कालीन खर्चामुळे नियोजित कामामध्ये अडचणी येत नाहीत. सहा एकर क्षेत्राचा विचार करून ते दरवर्षी सुमारे दहा लाख रुपयांचे खेळते भांडवल ठेवतात; मात्र भाजीपाल्याच्या शेतीसाठी कष्टाशिवाय पर्याय नसल्याचेही ते आवर्जून सांगतात. 

शेतकऱ्याकडून शिकण्यासारखे...

  • सशक्त रोपांची निवड
  • मजुरांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
  • जैविक आच्छादन पद्धतीचा वापर
  • कीड- रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चिकट सापळे आणि जाळ्यांचा वापर
  • प्रतवारी करून चांगले पॅकिंग

श्री. महेश शिंदे, मो. 9604110793

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate