विहे (ता. पाटण, जि. सातारा) येथील राजेंद्र देशमुख यांनी केवळ 50 गुंठ्यांतून आर्थिक उत्पन्न वाढविताना कमी कालावधीत येणाऱ्या पिकांचा आधार घेतला आहे. शून्य मशागत तंत्र व पिकांचे अवशेष यांचा वापर करीत उत्पादन खर्चातही बचत करण्याचा प्रयत्न केला आहे.
कऱ्हाड ते चिपळूण मार्गावर कऱ्हाडपासून पंधरा किलोमीटरवर विहे हे पाटण तालुक्यातील (जि. सातारा) गाव आहे. तालुका दुर्गम व डोंगराळ क्षेत्रात गणला जातो. कोयना नदीवरील सिंचनावर या गावातील बागायत शेती पिकते. गावातील राजेंद्र देशमुख हे प्रगतशील शेतकरी. बारावीनंतर "आयटीआय'चे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी "इलेक्ट्रिक' क्षेत्रातील कंपन्यांत नोकरी केली. परंतु नोकरीत आश्वासक चित्र दिसत नसल्याचे जाणवल्यानंतर ते शेतीकडे वळले. त्यांची वडिलोपार्जित शेती निचऱ्याची, काळी कसदार व तांबरान स्वरूपाची आहे. सार्वजनिक सिंचन योजनेवर शेती पिकते. 50 गुंठे व दीड एकर अशी दोन ठिकाणी त्यांची शेती आहे. दीड एकर पट्ट्यात ऊस, भात आदी पिके असतात. 50 गुंठे क्षेत्रात कमी कालावधीची पिके घेतली जातात.
अभ्यासातून होते विविध पिकांचे नियोजन
बाजारभाव, आवक-जावक, सण समारंभाचा अंदाज घेऊन भाजीपाला व फूल पिके लागवडीचे नियोजन असते. आतापर्यंत कोबी, फ्लॉवर, दोडका, कारली, दुधी, काकडी, टोमॅटो, भेंडी, वरुण घेवडा, गवार, झेंडू अशी विविध पिके देशमुख यांनी घेतली आहेत. दर व सोय पाहून कराड, पाटण, चिपळूण, कोल्हापूर, बेळगाव, पुणे व मुंबई येथे मालाची विक्री ते करतात. मार्केटमध्ये कोणत्या भाजीपाल्याची मागणी घटली वा वाढली त्याचे कारण शोधून तसे पिकाचे नियोजन ते करतात. काही वेळा किडी-रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनही पिकात बदल केला जातो. मालासाठी मागणीचे वातावरण अनुकूल नसेल त्या वेळी अधिक उत्पादन घेतल्याने आर्थिक नफ्याचे गणित चांगले राहते, असे त्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी त्यांनी राबविलेली पीक पद्धती थोडक्यात अशी.
झेंडूचा प्रयोग
20 फेब्रुवारी 2012 मध्ये पूर्वमशागतीनंतर सात फुटांच्या सरीवर बेड तयार केला. 10 हजार रोपांची लागवड केली. बेडच्या दुबाजूला नागमोडी पद्धतीने दोन रोपांत दोन फूट अंतर राखले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तोडा सुरू झाला. प्रत्येक तोड्यास 400 ते 500 किलो माल उत्पादित झाला. एकूण पीक कालावधीत सुमारे 20 ते 22 टन माल निघाला. वळीव व गारपिटीच्या संकटामुळे उत्पादनावर काहीसा परिणाम झाला. सुरवातीपासून प्रति किलो 30 ते 60 रुपयांपर्यंत दर मिळाला. सरासरी 30 रुपयांप्रमाणे उत्पादित मालापासून सहा लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मेहनती, रोपे, खते, कीडनाशके, मजुरी, वाहतूक, बारदान या कामी खर्च वजा जाता सुमारे पाच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न हाती आले.
झेंडूनंतर काकडी
जुलैमध्ये प्लॉट संपलेल्या झेंडू पिकाचे अवशेष सरीमध्ये वापरले. त्यानंतर एका महिन्यानंतर त्याच क्षेत्रात काकडीची 10 हजार रोपे लावली. आठ ते दहा दिवसांनंतर वेल चढविण्यासाठी मंडपाची उभारणी केली. ठिबक सिंचन केले. सुमारे महिन्यानंतर तोडा सुरू झाला. पावणेदोन ते दोन महिन्यांपर्यंत तोडे चालले. उत्पादित एकूण 80 टन मालाची बाजारपेठेत विक्री केली. तोडणी हंगामात परतीच्या पावसाने मालाची नासाडी झाली. हाती आलेल्या उत्पादनास प्रति किलोस चार, दहा ते वीस रुपयांप्रमाणे दर मिळाला. लावणीपासून ते काढणीपर्यंत खर्च वजा जाता दोन लाख रुपयांचे उत्पन्न शिल्लक राहिले.
काकडीनंतर दुधी भोपळा
काकडीचा प्लॉट संपल्यानंतर दुधी भोपळ्याची टोकणी केली. दुधीचे वेल पूर्वीच्या मंडपावर चढल्यानंतर वेलाच्या बाजूचे फुटवे काढून घेतले. तारेवर वेल आडवे जाऊ न देता सरळ ठेवले. यामागे तोडणी, फवारणी व वाहतूक सुलभ करण्याचा हेतू ठेवला. सुमारे दोन महिन्यांनी तोडणी सुरू झाली. सुरवातीला 200 किलो मालापासून सुरवात झाली. माल विक्रीवेळी दोन ते तीन वेळा बाजारपेठेतील चढ-उताराचा फटका बसला. एकूण 50 टनांपर्यंत मिळालेल्या उत्पादनास सरासरी 150 रुपये ते कमाल 200 रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळाला.
बियाणे, खते, कीडनाशके, मजुरी, वाहतूक, पॅकिंग या सर्व कामी दोन ते अडीच लाख रुपये खर्च वजा जाता साडेपाच ते सहा लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले.
पुन्हा झेंडूची लागवड
त्यानंतर या शेतात झेंडूची सप्टेंबर 2013 मध्ये लागवड केली. दीड महिन्यानंतर तोडे सुरू झाले. आतापर्यंत सहा ते सात टन मालाची विक्री झाली आहे. प्रति किलो सुरवातीला 40 ते 50 रुपये तर सध्या हेच दर 15 ते 20 रुपये याप्रमाणे मिळत आहेत. मध्यंतरी ऊस दर आंदोलनाचाही झेंडू विक्रीत अडथळा आला.
अजून तोडे सुरू राहतील. देशमुख यांनी शेतीतील उत्पन्नाच्या जोरावर घरी सर्व सुखसोयी निर्माण केल्या आहेत. देशमुख यांना आई श्रीमती हौसाबाई व पत्नी सौ. रेखा यांची मदत मिळते.
देशमुख यांच्या शेतीची काही वैशिष्ट्ये
- शेतीतील खर्च कमी करण्याचा होतो प्रयत्न. शून्य मशागत तंत्राचा केला वापर.
- सेंद्रिय पद्धतीच्या वापरावर भर देऊन एकरी 50 टनांपर्यंत उत्पादन घेतले.
- मुख्य अन्नद्रव्ययुक्त खतांव्यतिरिक्त गंधकाचाही वापर होतो.
- शेतातील पिकांचे अवशेष, पाला-पाचोळा शेतातच गाडला जातो. त्याचे शेतात आच्छादन केल्यामुळे जमिनीची प्रत सुधारण्याचा प्रयत्न.
- बाजारपेठेत चढ-उतार राहिला तरी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न.
- प्रायोगिक तत्त्वावर पिके घेऊन पाहतात.
- फळमाशीसाठी कामगंध सापळ्याचा वापर. यातून किडींवर देखरेख ठेवून ती आटोक्यात आणणे शक्य.
राजेंद्र देशमुख - 9860697488.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन