सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये जलयुक्त शिवार अभियानाने जलसमृद्धी निर्माण झाली आहे. मिरजपासून 30 किलोमीटर दूर कर्नाटकच्या सीमेवरील हे गाव. जलदेवतेच्या कृपेने आज समृद्ध, सुबत्त आणि संपन्नतेकडे प्रवास सुरू असलेल्या या गावाची परिस्थिती दोन वर्षांपूर्वी मनाला अगदीच निराश करून टाकणारी होती. गावावर पाऊस कायम रुसलेलाच. त्यामुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. भूजलपातळी 38 फुटांपर्यंत होती. परिणामी पिके पण जिरायतीच. एक वेळ अशी आली की पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागले. त्यामुळे दुष्काळी गाव अशीच खटावची ओळख होती.
खटावसारखी परिस्थिती राज्यातील अनेक गावा-गावांमध्ये होतीच. वारंवार येणारी दुष्काळी परिस्थिती थांबवणे गरजेचे होते व आहे. राज्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी होती. यासाठी 5 डिसेंबर 2014 रोजी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 हे ध्येय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाने आकार घेतला. पहिल्या वर्षी सांगली जिल्ह्यात 141 गावे या अभियानात समाविष्ट करण्यात आली. मिरज तालुक्यातील खटाव त्यापैकीच एक.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील यांच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार अभियानात खटावमध्ये प्रशासनाने अनेक उपक्रम राबवले. या अभियानातून खटावमध्ये 6 काँक्रिट, सिमेंट नालाबांध, 893 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंग, 21 गटांमध्ये नाला खोलीकरण व सरळीकरण करण्यात आले. रोपे लावण्यात आली.
कृषि विभागासह पाटबंधारे विभाग आणि कोल्हापूरच्या यांत्रिकीकरण विभागाने यामध्ये सक्रिय योगदान दिले. शिवार फेरी, विशेष ग्रामसभा, शेतकरी मेळावे, बैठका, चर्चासत्रे, क्षेत्र भेटी, विहीर पुनर्भरणाचे प्रात्यक्षिक असे अनेक उपक्रमांच्या फैरी झडल्या. या उपक्रमाला लोकांचीही भरभरून साथ चांगली मिळाली, ही बाब प्रेरणा देणारी. तत्कालीन उपविभागीय कृषि अधिकारी एम. डी. वेताळ आणि तालुका कृषि अधिकारी एच. एस. मेडीदार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि सहाय्यक अमित सूर्यवंशी यांनीही ग्रामस्थांचे मनपरिवर्तन केले. परिणामी गावकऱ्यांनी अभियानात स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन गाव करील ते राव काय करील, याची प्रचिती दिली. गावात लोकसहभागातून ओढापात्रातील गाळ काढला. कच्चे वनराई बंधारे बांधले. झाडे व फळबागा लावल्या. विहीर पुनर्भरणही केले. अशा अनेक कामांमधून गावकऱ्यांनी आपला खारीचा वाटा उचलला.
राज्य शासनाचे दुष्काळमुक्तीचे स्वप्न खटावमध्ये सांगली जिल्हा प्रशासन आणि जनतेने हातात हात घालून पूर्ण केले. परिणामी आज गाव परिसरात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिराईतीबरोबरच आता बागायती शेती फुलायला सुरवात झाली आहे. बागायती क्षेत्र 93 हेक्टरने वाढले आहे. शेतकऱ्यांनी 57 हेक्टरवर गाळ पसरल्याने जमिनीची सुपीकता वाढली आहे. चारा वैरण वाढल्याने जनावरांत वाढ झाली. परिणामी गावात दुधदुभत्याची रेलचेल झाली आहे. पूर्वी गावात फक्त 2 दुध डेअऱ्या होत्या. आता ही संख्या सहापर्यंत वाढली आहे. गावात जलक्रांती झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जलयुक्त शिवार अभियानामुळे आज खटावचे ग्रामस्थ समाधानी आहेत. शासनाच्या या योजनेमुळे आमच्या गावाचा कायापालट झाला आहे, असे खटावमधील एक शेतकरी शिवलिंग नाईक सांगतात. गावात आज पाण्याची मुबलकता आहे. पण, म्हणून आधीच्या दुष्काळी परिस्थितीला लोक विसरले नाहीत. त्यामुळे पाणी हे जीवन हा मूलमंत्र, जीवनाचे सार हे त्यांच्या मनात पक्के बिंबले आहे. पाणी वाचवा, पाणी जिरवा हे आज ते सांगत आहेत.
लेखक - संप्रदा द. बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/28/2023
राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक...
गावाने लोकसहभागातून विविध विभागांच्या योजना राबवत ...
अनपटवाडीतील जलक्रांती सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव ...
महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी असणाऱ्या ...