अनपटवाडीतील जलक्रांती सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील अवघ्या 1 हजार 785 लोकसंख्येचं गाव अनपटवाडी ! गाव एकत्र आल्यानंतर कशाप्रकारे जलक्रांती साकारली जाते याचे उत्तम उदाहरण अनपटवाडीकरांनी दाखवून दिले आहे. सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत या गावाने 10 लाख रुपयांचे बक्षिस मिळवून अन्य गावांसाठी प्रेरणा दिली आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत गावासाठी टँकर लागायचे. परंतु जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गाव एकत्र झाला आणि माथा ते पायथा जलसंधारणाची कामे करुन भूईवर पडणारा प्रत्येक थेंब या माध्यमातून अडविला. सध्या झालेल्या पावसामुळे गावात जलक्रांती झालेली दिसून येत आहे. तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
कांदा बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांना अंदाजे 15 ते 16 लाख चे एकूण उत्पन्न झाले आहे.
झालेल्या कामातून 263.71 टीसीएम पाण्याची उपलब्धता झालेली आहे. त्यामुळे सध्या 91573 लिटर प्रती वर्षी दरडोई पाण्याची उपलब्धता झाली आहे. मागील दोन वर्षापर्यंत गावामध्ये नोंव्हेबर महिन्यात टँकरची गरज भासत असे परंतु मागील वर्षी 120.00 मिमी इतका कमी पाऊस पडून सुद्धा 15 एप्रिल 2016 पर्यंत टँकरची गरज भासली नाही. तसेच मे 2016 महिन्यात गावामधे 2 कुपनलिका घेतल्या असता 2 इंची पाणी भरपूर प्रमाणात लागले. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत 40 एकरावर मका हिरवा चारा उत्पादन केलेमुळे चारा टंचाई जाणवली नाही.
पुर्वीची पाण्याची पातळी सरासरी 15.00 मीटर होती. सध्याची सरासरी प्रकल्पानंतर पाण्याची पातळी 9.00 मीटर आहे.
30 ते 40 कोटी लिटर वाहून जाणारे पाणी आता गावामध्ये अडविले आहे. शेतकरी वर्षातून दोन पिके घ्यायचा, आता तीन पिके घेऊ शकतो. यापुढे 100 टक्के ठिबकवर शेती करायचा निर्णय झाला आहे. जलसंधारणाची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:हून 60 एकर जमीन गावाला दिली. चारकोपचे आमदार योगेश सागर आणि निलकमल कंपनी शरद पारिख यांनी मोठी मदत केली. त्याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केल्यामुळेच गावाने 10 लाखाचे बक्षिस मिळविले, अशी भावना सरपंच मनोज अनपट यांनी बोलून दाखवली. नंदकुमार कदम (ग्रामस्थ)- ग्रामस्थांच्या श्रमशक्तीपुढे जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे गावात चार पटीने पाणीसाठा वाढला आहे. ज्ञानोबा अनपट (शेतकरी)- गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे, नालाबंडींगमुळे विहिरीला भरपूर पाणी वाढले आहे. भरत मुळीक (ग्रामस्थ)- दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात सीसीटी, डीप सीसीटी, तलाव रुंदीकरण, खोलीकरण आदी कामे झाल्याने गावामध्ये मोठया प्रमाणात पाणीसाठा दिसतोय. गावाची पाणी समस्या मिटली आहे. सुलोचना अनपट (शेतकरी)- गावात जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. आता वर्षातून तीन पिके घेता येतील. ग्रामस्थांची श्रमशक्ती एकत्रित आल्यानंतर गावात जलक्रांती होऊ शकते याचे उत्तम उदाहरण अनपटवाडीकरांनी या निमित्ताने दाखवून दिले आहे. त्याचे फळही त्यांना सत्यमेव जयते वॉटरकपच्या माध्यमातून 10 लाखाचे बक्षिसाने मिळाले आहे.
लेखक - प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 9/8/2023
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये जलय...
राज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी विविध कारणां...
गावाने लोकसहभागातून विविध विभागांच्या योजना राबवत ...