অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एस... माय नांदेड इज सेफ..!

एस... माय नांदेड इज सेफ..!

'नांदेड सेफ सिटी' या प्रोजेक्टद्वारे शहरातील महत्त्वाचे चौक आणि रस्ते यावर नांदेड पोलिसांची आता अहोरात्र करडी नजर राहते आहे. हे यश आहे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड पोलिस दल आणि नांदेड महापालिकेच्या लोकाभिमुख दृष्टिकोनाचे. या प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी प्रशासन कशा प्रकारे करत आहे याचा पुन्हा प्रत्यय आला.
पर्यटन आणि शैक्षणिकदृष्या . महत्त्वपूर्ण असल्याने नांदेड शहरात गर्दी वाढते आहे. लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे शहरातील रस्ते आणि चौक यावर वाहतूक शीस्त तसेच शांतता-सुव्यवस्थेच्या दृष्टीने नजर ठेवणे आवश्यक ठरते. त्यातूनच या सेफ सिटी प्रोजेक्टचा विचार सुरु झाला. पोलिस, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयांनी समन्वयाने काम केले. 
नांदेड जिल्हा हा आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांशी संलग्न आहे. नांदेड जिल्ह्याचा विस्तार जसा मोठा आहे, तसाच नांदेड शहराचाही विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे. नांदेड शहर हे देश आणि जगभरात विखुरलेल्या शिख बांधवांसाठी श्रद्धास्थान आहे. नांदेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी शिखांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंदसिंघ यांची समाधी आहे. शहर व परिसरात या मुख्य गुरुव्दारासह अन्य ठिकाणी गुरुव्दारा आहेत. याठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने शिख भाविक व यात्रेकरु येत असतात. नांदेड शहराची लोकवस्तीही आता बहुधर्मीय अशी झाली आहे. शहरात शैक्षणिक सुविधा वाढताहेत. वैद्यकीय आणि नागरी सुविधा वाढताहेत. त्यामुळे नागरी वस्तीही मोठी झाली आहे. या गोष्टींमुळे शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्याही वाढते आहे. 
वाढत्या वाहन संख्येमुळे शहरातील वाहतूक शिस्तीला वळण लावणे, तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवणे, सण-उत्सव, जयंती, मिरवणुका काळात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर येते. या सगळ्यांत घटनास्थळ नजरेच्या टप्प्यात असणे, नेमकी तेथील परिस्थिती जाणून घेणे या गोष्टी अत्यावश्यक ठरतात. त्यासाठी या `नांदेड सेफ सिटी प्रोजेक्ट` ची संकल्पना दृढ केली गेली. त्यामुळेच आता नांदेड शहरातील चौक अन् चौक आता पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात आहे. वाहतुकीची कोंडी झाली आहे, इथपासून ते नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, बेवारस वाहन, एकेरी वाहतुकीत घुसखोरी, दुचाकीवरून ट्रीपलसीट, ओव्हरस्पिडींग किंवा इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने भरधाव वाहन हाकणे किंवा चौकातल्या गर्दीचा फायदा घेऊन गैरकृत्याच्या हालचाली अशा अनेक गोष्टी टिपल्या जात आहेत. तेही सुस्पष्ट आणि ठळकपणे रेकार्डही केल्या जात आहेत. स्थीर, सभोवताली फिरणारे आणि वाहनांवर लावलेले मोबाईल कॅमेरे यामुळे नांदेड पोलिसांची `सी-क्यूब` नांदेडच्या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणांवर नजर ठेवून असते. घटनास्थळाचे सुस्पष्ट चित्रण करण्याबरोबरच पोलिसांची कूमक वेळेत आणि नेमक्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी या सेफ सिटी प्रोजेक्टची उपयुक्तता सिद्धही झाली आहे. गैरकृत्य करून निसटून जाणाऱ्यांचे वाहन पोलिसांना नेमकेपणाने टिपता येऊ लागले आहे, तसेच ते कोणत्या दिशेला जात आहे याद्वारे प्रत्यक्ष घटनास्थळाच्या मार्गावर असणाऱ्या यंत्रणेला `सी-क्यूब`मधूनच सांगता येऊ लागले आहे. 
बंदोबस्तावरील सहकाऱ्यांना तात्काळ संदेश देण्यासाठी, त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या सेफ सिटी प्रोजेक्टची पोलिस यंत्रणेला मोठी मदत होते आहे. गुन्ह्याला प्रतिबंध करणे, गुन्ह्याचा तपास लावणे आणि गैरकृत्यांचे थेट चित्रणच जतन करण्याने सक्षमपणे दोषारोप सिद्ध करण्यासाठी देखील नांदेड पोलिसांना सेफ सिटी प्रोजेक्टची मदत होते आहे. 
जिल्हा नियोजन समितीने नावीन्यपूर्ण योजनेतून घ्यावयाच्या उपाययोजनेत नांदेड महापालिकेला या प्रोजेक्टसाठी 4 कोटी 23 लाख 85 हजार मंजूर केले. नांदेड महापालिकेने यातून पोलिसांसाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या पायाभूत सुविधा म्हणजे अत्याधुनिक आणि उच्च क्षमतेचे कॅमेरे आणि त्यांच्या नेटवर्कींगसाठीची जबाबदारी उचलली. ज्यातून ऑप्टिकल फायबर्सचे जाळे निर्माण झाले. शहरातील महत्त्वाचे चौक थेट नांदेड पोलिसांच्या या `सी-क्यूब` या नियंत्रण कक्षासी जोडले गेले. ज्याद्वारे नांदेड शहरात एकूण 47 ठिकाणी, 97 कॅमेरे लागले गेले. त्यापैकी 24 पीटीझेड कॅमेरे व 73 फिक्स कॅमेरे आहेत. सोबतच या चौकात ध्वनीक्षेपक संच (PA SYSTEM) व आपत्कालीन बटन (Panic button) बसविण्यात आले.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील या सीसीटीव्ही कंट्रोल रुम अर्थात `सी-क्यूब`मध्येही उच्च क्षमतेचा सर्व्हर, 42 इंची नऊ टीव्ही, अत्याधुनिक संगणक संच, अखंडित वीजपुरवठ्यासाठी 10 केव्हीचे युपीएस, सर्व्हर रुम व कॉन्फरन्स रुम अशी अद्ययावत यंत्रणा उभी करण्यात आली आहे. मुंबईच्या समर्थ सेक्युरीटी इंडिया प्रा.लि. हे या सेफ सिटी प्रोजेक्टसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम करत आहेत. `सी-क्यूब` म्हणजेच नियंत्रण कक्षातील कामकाजासाठी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षितही करण्यात आले आहे. असे आठ कर्मचारी या `सी-क्यूब`मध्ये कार्यरत आहेत. शहरात 47 महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. अजूनही काही महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच वसंतराव नाईक, गोवर्धन घाट, लातूर फाटा येथे कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. 
या प्रकल्पाविषयी बोलताना नांदेड पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया म्हणाले, नांदेड सेफ सिटीचा हा प्रोजेक्ट पोलिस, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी आहे. नांदेड शहरातील नागरिकांना कायदा-सुव्यवस्थेची हमी देण्याचा हा प्रयत्न आहे. यात नांदेड जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस दल समन्वयाने काम करत आहेत. या प्रोजेक्टद्वारे आणखी काही अत्याधुनिक उपाययोजना करण्याचाही प्रयत्न आहे.
नांदेड सेफ सिटी प्रोजेक्टमुळे नांदेडवासियांचा सुरक्षिततेचा आत्मविश्वाकस दुणावला आहे. भयमुक्त संचार हा नागरी हक्कच नांदेड जिल्ह्यातल्या लोकाभिमुख प्रशासनाने सेफ सिटी प्रोजेक्टमधून अधोरेखित केला आहे. त्याला बळकटी दिली आहे. त्यामुळे नांदेडवासियही नक्कीच म्हणतील... एस..माय नांदेड इज नाऊ सेफ नांदेड...!
निशिकांत तोडकर, प्र. जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate