महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आहेत. त्यामुळेच एकमेकांना आधार, पाठबळ देत येथील शेतकरी विविध पिकांत सुधारित तंत्रज्ञान वापरताना विक्री व्यवस्थाही भक्कम करू लागले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या कृषक आश्रम गटाच्या "मॉडेल'मुळे शेती शाश्वत होण्यास मदत मिळत आहे.
शेतीतून उत्पादनवाढ महत्त्वाची आहेच, पण विक्री व्यवस्थेची "प्रणाली" (सिस्टीम) भक्कम झाली तरच शेतकऱ्याच्या हाती दोन पैसे अधिक पडतात. त्याच्या श्रमांचे चीज होते. पुणेस्थित श्रीरंग सुपनेकर यांचा सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी (ता. फलटण) येथे "कृषक आश्रम' असून, 15 एकरांवर जिरायती शेती आहे. त्यांनी शाश्वत शेतीतून शाश्वत बाजारपेठ या सिद्धान्तावर आधारित उत्पादन व विक्रीचे 'कृषक आश्रम मॉडेल' तयार केले. पत्नी सौ. नीता व मुलगा अमेय यांनीही त्यासाठी परिश्रम घेतले. "मॉडेल'ला चांगले यश मिळाले. यात त्यांना सर्वांत मोठी साथ मिळाली ती गटशेतीची. म्हणजे निनामसह परिसरातील खामगाव, मुरूम, होळ, साखरवाडी या परिसरातील गावच्या भाजीपाला उत्पादकांची. या सर्वांचा मिळून संकलित झालेला माल पुण्यात विक्री केंद्र व सुमारे 20 निवासी सोसायट्यांना थेट विकण्यात येऊ लागला. प्रत्येक सोसायटीसाठी आठवड्यातील वार निश्चित करून सुमारे पाचशे किलो ते एक टन मालाची विक्री होऊ लागली.
ग्राहकांना भाज्यांमध्ये विविधता हवी असते. त्या दृष्टीने गटातील शेतकरी थोड्या थोड्या गुंठ्यांवर विविध भाजीपाला घेऊ लागले. कोणी काय लावायचे, याचे नियोजन बैठकांद्वारे व्हायचे. या पद्धतीतून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे निवासी सोसायट्यांकडून मागणी प्रचंड आहे, पण ती पुरवण्यात शेतकऱ्यांची संख्या व पर्यायाने शेतमालाचा "व्हॉल्युम' कमी पडतो आहे. त्यामुळे ही "सिस्टीम' अजून कार्यक्षम व भक्कम करण्याचे प्रयत्न सुपनेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केले. पुण्यातील थेट विक्री त्यासाठी तूर्त स्थगित ठेवली. त्याच वेळी दुसरी जबाबदारी खांद्यावर येऊन पडली, ती म्हणजे गोवा राज्यातील जनतेला दैनंदिन भाजीपाला पुरवण्याची.
कृषक आश्रमाला जोडलेले शेतकरी निवासी सोसायट्यांच्या ठिकाणी विक्रीवेळी प्रत्यक्ष उपस्थित असायचे. हा माल विकणारे व्यापारी नाहीत, हा विश्वास त्यामुळे ग्राहकांत तयार झाला. ग्राहकांनाही थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणे शक्य झाले.
गोव्यात मोठ्या प्रमाणात बेळगावातून (जि. कर्नाटक) भाजीपाला जातो, याची माहिती मिळाल्यानंतर सुपनेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे भेट दिली. तेथील भाजीपाल्याची मागणी, दर यांचा अभ्यास केला. गोवा फलोत्पादन विभागाशी संपर्क साधण्यात आला. ऑगस्ट 2013 मध्ये गोवा फलोत्पादन विभागासोबत गटशेतीतील शेतकऱ्यांची कृषक आश्रमात बैठक झाली. तेथील अधिकाऱ्यांनी "मॉडेल' अभ्यासले. त्यांच्या मागणीनुसार आपण भाजीपाला पुरवू शकतो, दरही चांगला मिळू शकतो, याचा अंदाज शेतकऱ्यांना आला. मागणी मोठी आहे, यामुळे भाजीपाला तेवढ्या प्रमाणात लागणार. यासाठी शेतकऱ्यांच्या संख्येतही वाढ करणे गरजेचे होते. दररोज 30 टन मालाची गोवा सरकारची "ऑर्डर' आहे. सर्व भाजीपाला त्वरित उपलब्ध करणे सोपी गोष्ट नव्हती. त्या दृष्टीने टोमॅटो व भेंडी या दोनच पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मालाची उपलब्धता, वाहतूक, विक्री ही एकूणच पद्धत कसे काम करते आहे, याची चाचणी घेण्यात आली. त्या वेळी कोबी, फ्लॉवर आदी माल पाठवण्यात आला.
श्रीरंग सुपनेकर यांच्या कृषक आश्रमाची यशकथा ऍग्रोवनमध्ये 2013 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर राज्यभरातील विविध एक हजार शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून गटात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. गोवा फलोत्पादन विभागासोबतच्या बैठकीची बातमीही प्रसिद्ध झाली. यातून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात संपर्क केल्याने पुढील यंत्रणा सुरळीत झाली. आमची गटशेती यशस्वी होण्यात ऍग्रोवनचा मोठा हात असल्याचे सुपनेकर सांगतात.
फलटण तालुक्यातील खामगावात पाण्याची उपलब्धता असल्याने फळपिके, भाजीपाला मोठ्या प्रमाणात होतो. गावात सुमारे सात शेतकरी गट कार्यरत आहेत. 'अजिंक्यतारा', 'भैरवनाथ', 'गुरुदेव दत्त', 'मोरया', 'सद्गुरू', 'मयूरेश्वर', 'सेवागिरी' अशी त्यांची नावे आहेत. रावसाहेब वैद्य, समीर शिंदे, हणमंत भोसले, शशिकांत झाडकर, विकास भोजने, उस्मान पठाण, तय्यब मुजावर, संतोष सावळकर ही गटांतील काही प्रमुख मंडळी. प्रत्येक गटात सुमारे 18 ते 20 शेतकरी असून, एकूण संख्येचा विचार केल्यास सव्वाशेहून अधिक शेतकरी परस्परांच्या पाठबळावर शेतीतील आव्हाने पेलण्यास समर्थ झाले आहेत. टोमॅटो, भेंडी, झेंडू, केळी ही गटसदस्यांची काही मुख्य पिके आहेत. शेतकरीनिहाय दोन एकर ते 15 एकरांपर्यंत क्षेत्र आहे.
श्रावणकाळात केळी, लग्नसराईत झेंडू, मे-जूनमध्ये टोमॅटोचे उत्पादन सुरू व्हावे, असे पीक लागवडीचे नियोजन असते. भेंडीची लागवड संक्रांतीदरम्यान होते- जेणेकरून कडक उन्हाळ्यापूर्वी फळधारणेस सुरवात व्हावी. कोबी- फ्लॉवर लागवड जून-जुलैत होते. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने ही आंतरपिके घेण्यावर भर असतो. केळीचे किमान दोन हंगाम मिळवण्याचा प्रयत्न असतो.
गणपती मंदिरात गटातील शेतीमालाला अधिक दर मिळावा, उत्पादित माल जागेवरून नेला जावा, यासाठी घंटानाद करून बैठकीद्वारा दर गणपती मंदिरात ठरवण्याची प्रथा आहे. या वेळी गुजरात, नांदेड किंवा अन्य ठिकाणचे व्यापारी उपस्थित असतात. शेतकरी व व्यापाऱ्यांतील चर्चेतून दरनिश्चिती होते. त्यामुळे दरांबाबत पारदर्शकता राहते. कमी क्षेत्रधारकांचा मालही जागेवरून विक्री झाल्याने त्यांचा फायदा होतो. शेतमाल एकाच जागेवर मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने विविध ठिकाणचे व्यापारीही थेट गटांना संपर्क करून माल बांधावरून वजन करून घेऊन जातात.
गटशेतीमुळे भांडवली खर्चात सुमारे 30-35 टक्के बचत झाली आहे. टोमॅटोचे मी चांगले पीक घेतो. शेतातील नफ्याचे प्रमाण वाढले आहे. आता नवीन जीपही खरेदी केली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...