पशुखाद्य, जनावरांच्या वाढत्या किमती आणि त्या मानाने दुधाला अपेक्षेनुसार दर मिळत नसल्याने, खानदेशात दुग्ध व्यवसायात अनेक आव्हाने आहेत. मात्र नंदुरबार येथील जितेंद्र रंगराव पाटील यांनी दुग्ध व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी उत्पादनखर्च कमी केला, गोठ्यात जनावरांची पैदास वाढवली. स्वतःच ग्राहकांना थेट दूधविक्री सुरू केली. गुणवत्तापूर्ण ताज्या दुधाच्या माध्यमातून ग्राहक वर्ग जोडत हा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या सक्षम केला.
खानदेशात जळगाव जिल्हा वगळता, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सहकारी पातळीवर एकही दूध संघ गेल्या अनेक वर्षांत उभा राहू शकलेला नाही. शासकीय दूध योजना नावालाच सुरू आहेत. दूध उत्पादकांना उत्पादनखर्चाच्या तुलनेत दुधाचे दर मिळत नाही, तर पैसे मोजूनही दर्जेदार दूध मिळत नाही, म्हणून ग्राहकांची मोठी पंचाईत होते. अशा स्थितीत नंदुरबार येथील जितेंद्र पाटील यांनी दुग्धव्यवसायाचा चांगला आदर्श अन्य शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
बी.कॉम.चे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता रस्ते बांधकाम व्यवसायात (सरकारी कंत्राटदार) पाय रोवण्यासाठी जितेंद्र यांनी सुरवातीला प्रयत्न केले. सात वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर त्यात पाय रोवलेदेखील. दरम्यान 2010 मध्ये घरच्या दुधाची सोय व्हावी म्हणून चार गाईंची खरेदी केली. व्यवसाय सांभाळून देखभाल सुरू असताना गाईंचा लळा लागला. त्यातूनच एक दिवस दुग्ध व्यवसायाच्या संकल्पनेने मनात घर केले. कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यानंतर हळूहळू गोठ्यात होल्स्टिन फ्रिजियन (एचएफ) गाईंची संख्या वाढवत नेली. पुढे प्रसिद्ध जाफराबादी, मुऱ्हा जातीच्या म्हशी आणल्या.
सुरवातीच्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र नाउमेद न होता प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. हळूहळू जनावरांची संख्या वाढू लागली. बॅंक ऑफ महाराष्ट्राकडून 50 लाख रुपयांचे कर्ज घेऊन 30 फूट रुंद व 90 फूट लांबीच्या तीन शेड बांधल्या. आज त्याद्वारा सुमारे साठ म्हशी तर 40 गायींचा सांभाळ होतो.
पाटील यांची खोंडामळी येथे 25 एकर शेती आहे. मात्र शंभराहून अधिक जनावरांसाठी लागणारा हिरवा व कोरडा चारा विकत घेतला जातो. जळगाव जिल्ह्यातील पारोळा, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून हिरवा ऊस मागविला जातो. 2500 ते 2800 रुपये प्रतिटनाप्रमाणे हिरवा ऊस मिळतो. हिरव्या चाऱ्याची कुट्टी करण्यासाठी चाफ कटरचा वापर होतो. ज्वारीचा कडबा तीनहजार रुपये प्रति एकरांप्रमाणे शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. त्याची कुट्टी करून उन्हाळ्यात त्याची साठवणूक केली जाते. त्यासाठी 25 फूट रुंद व 100 फूट लांब मोठी शेड उभारली आहे. जनावरांना दररोज सुमारे दोन टन हिरवा व कोरडा चारा खाण्यास दिला जातो. शिवाय सकाळी व सायंकाळी सहा पोती सरकी पेंड, सहा पोती तुरीची चुनी व एक पोते गव्हाचा कोंडा भिजवून दुधाळ व गाभण जनावरांना खाण्यास दिला जातो. खाद्यात खनिज मिश्रणाचा आवर्जून वापर होतो. गोठ्यात चारा व पाणी एकत्रितपणे देण्याची सोय असलेल्या गव्हाणींची रचना केली आहे. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्यासाठी मूरघास युनिटचे बांधकामही केले आहे.
दररोज विक्रीसाठी पुरेसे दूध उपलब्ध होण्यासाठी दुधाळ जनावरांचे योग्य नियोजन केले आहे. जनावरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने, खेळते भांडवल म्हणून पुरेशा रकमेची तरतूद केली आहे. मात्र गोठ्यातच जनावरांची पैदास करणे व त्यांची काळजीपूर्वक जोपासना करण्यावर अधिक भर दिला आहे. कालवडींना भरपूर दूध पाजण्यासह जनावरांना योग्य समतोल आहार, जंतनिर्मूलन, लसीकरणाकडे जातीने लक्ष दिले जाते. सध्या 40 पैकी 10 गायींची पैदास गोठ्यातच केली आहे. जनावरांच्या खरेदीवरील खर्चात बचत करण्याचे प्रयत्न आहेत. पशुवैद्यक डॉ. किशोर पाटील, डॉ. राजेंद्र गुजराथी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभते. नाशिक विभागाचे तत्कालीन प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. एस. पी. सावंत, नंदुरबारचे तत्कालीन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एच. टी. रावटे यांनीही पाटील यांच्या दुग्ध व्यवसायास भेट देऊन त्यांच्या व्यवस्थापनकौशल्याचे कौतुक केले आहे.
नंदुरबार शहरातील कोरीट नाका परिसरात "सारंग डेअरी फार्म' नावाने जितेंद्र यांनी दूधविक्री केंद्र सुरू केले आहे. सकाळी व सायंकाळी तासाभराच्या कालावधीत दूध विकले जाते. दररोज एकूण सुमारे सातशे लिटर दुधाची ग्राहकांना थेट विक्री होते. ताज्या, गुणवत्तापूर्ण दुधाच्या खरेदीसाठी ग्राहक अक्षरशः रांगा लावतात.
दर असे असतात. (प्रति लिटर)म्हैस दूध- 55 रुपये
गाय दूध- 40 रु.
दैनंदिन दूधविक्रीतून चारा, सरकी पेंड, चुनी, गहू कोंडा, औषधे, मजुरी व अन्य मिळून जो खर्च होतो तो वजा जाता सुमारे 20 ते 30 टक्क्यापर्यंत नफा मिळतो.
वर्षाकाठी सुमारे 300 ट्रॉली शेणखत मिळते. 1500 रुपये प्रतिब्रासप्रमाणे त्या विक्रीतून वर्षाला आत्तापर्यंत तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. घरच्या 25 एकरांवरील शेतीतही पाच वर्षांआड शेणखताचा वापर करण्याचे नियोजन आहे.
संपर्क - जितेंद्र पाटील 982259258
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...