कोरतड (जि. ठाणे) येथील रघुनाथ पाडवी यांनी महूच्या बियांपासून तेल काढून देण्याचा व्यवसाय वाढवला आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या या भागांतील ग्रामस्थांना त्यामुळे आपल्याच भागातील झाडांपासून खाद्यतेल उपलब्ध झाले. शिवाय पाडवीदेखील या व्यवसायातून आर्थिक स्वावलंबी झाले.
ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुका म्हटले, की डोळ्यांसमोर येते ती डोंगरउतारावरील भातशेती आणि आदिवासींचा आर्थिक मागासलेपणा. तालुक्यात कोरतड नावाचे गाव आहे. खरिपात भात हे इथले महत्त्वाचे पीक. यासह नागली, वरई, चवळी, वाल तसेच रब्बीत काही भागांत खुरासणीचे पीक घेतले जाते. उन्हाळ्यातील पाणीटंचाईमुळे दिवाळीनंतर बहुतेक ग्रामस्थ मुंबई भागात कामधंद्यासाठी स्थलांतरित होतात. या भागात ऐन, साग, बांबू आणि जंगली झाडांच्या मधल्या जागेत भातशेती केली जाते. येथे नैसर्गिकरीत्या वाढलेली मोहाची भरपूर झाडे आहेत. उन्हाळ्यात लोक मोहाच्या झाडाच्या बिया गोळा करून त्याची स्थानिक पातळीवर विक्री करतात किंवा त्यापासून तेल काढतात. येथील लोकांचा आहार म्हणजे डाळभात, नागलीची भाकरी यासोबत थोडेसे कडधान्य. जेवण बनविण्यासाठी मोहाच्या बियांपासूनचे आणि खुरासणीचे तेल वापरले जाते. दोन्ही तेले येथील शेतकरी स्थानिक पातळीवर तेलाच्या घाणीतून काढून घेतात. आज आपल्या देशातच नव्हे तर जगभरात खाद्यतेलाची टंचाई जाणवत आहे. त्याचे दर गगनाला भिडत चालले आहेत. अशा परिस्थितीत जव्हार भागातील शेतकऱ्यांनी आपली तेलाची गरज मोहाच्या बियांपासून निघणाऱ्या तेलाने पूर्ण केली आहे.
कोरतड गावातील शेतकरी रघुनाथ पांडुरंग पाडवी यांची तेलघाणी (ऑइल मिल) आहे. पती-पत्नी दोघे मिळून ती चालवतात. रघुनाथरावांचे सहा भावांचे कुटुंब. वाटणीअंती त्यांच्या वाट्याला तीन एकर जमीन आली. त्यात भात घेतला जातो. सन 1972 मध्ये रघुनाथरावांच्या वडिलांनी स्टेट बॅंकेकडून साडेतीन हजार रुपयांचे कर्ज घेऊन "ऑइल मिल मशीन' घेतले. रघुनाथरावांनी वडिलांचा वारसा पुढे चालवला. कामाची व्याप्ती वाढत गेली. पुढे 2007 ला जव्हारमधील पतपेढीतून कर्जरूपाने 50 हजार रुपये घेतले. त्यातून तेल गाळण्याची दुसरी मिल खरेदी केली. आज दोन मिल चालविण्यासाठी पाडवी पती-पत्नी व दोन मजूर असतात.
गावातील लोक मोहाच्या बिया गोळा करतात. आपल्या कुटुंबाच्या गरजेएवढे तेल ते रघुनाथ यांच्या मिलमधून काढून नेतात. शंभर किलो मोहिटीपासून सुमारे 45 किलो तेल तयार होते. रघुनाथरावांच्या म्हणण्यानुसार मागे उरलेल्या पेंडीत काही प्रमाणात अजून तेल शिल्लक राहते. व्यापाऱ्यांना ती सात रुपये किलो दराने विकली जाते. तिथून ती उच्चक्षमतेच्या ऑइल मिलमध्ये जाऊन तेथे पुन्हा तेल काढले जाते. रघुनाथरावांच्या मिलमध्ये मे व जून या काळात मोहिटीचे तेल काढून दिले जाते. डिसेंबर- जानेवारीत खुरासणी व भुईमुगाचे तेलही काढले जाते. तीन किलो खुरासणीपासून एक किलो तेल मिळते. रघुनाथरावांकडे पिठाच्या दोन चक्क्याही असून तीन रुपये किलो दराने गहू, तांदूळ, नागली अशी धान्ये दळून दिली जातात.
रघुनाथरावांच्या तेलघाणीमध्ये हंगामात 20 ते 25 टन मोहिटीचे गाळप होते. त्यापासून 12 टनांच्या आसपास पेंड मिळते. सुमारे 15 टन खुरासणीचे गाळप होते. यातून 10 ते 11 टन खुरासणी पेंड मिळते. मोहिटी तेल काढण्याचा दर तीन रुपये प्रति किलो आहे. मोहिटीची पेंड सहा रुपये प्रति किलोप्रमाणे विकली जाते. खुरासणी व शेंगदाणा तेल काढण्यासाठी ग्रामस्थांकडून पैसे घेतले जात नाहीत. त्यांच्या पेंडीचा विक्री भाव किलोला 13 ते 14 रुपये आहे. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. एकूण उद्योगातून रघुनाथरावांना वर्षाकाठी दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. त्यातून 60 ते 70 हजार रुपये मजुरीवर, लाइट बिलासाठी 25 हजार व 10 हजार रुपये बिघाड दुरुस्ती व किरकोळ खर्च येतो. अशा प्रकारे सर्व खर्च जाता हाती एक लाख रुपयांपर्यंत नफा उरतो.
रघुनाथराव मोहिटीची पेंड व्यापाऱ्याला विकतात. मात्र त्यातील काही पेंड आपल्या घरच्या भातशेतीत चिखलणीवेळी टाकतात. त्यांच्या अनुभवाप्रमाणे 20 ते 25 किलो मोहाची पेंड सहा गुंठ्यांच्या भातखाचराला वापरल्याने खोडकिड्याचा प्रादुर्भाव होत नाही, त्यामुळे खोडकिडीपासून होणारे भातपिकाचे मोठे नुकसान टळते. त्याचबरोबर पेंडीचे खत दिल्याने भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते. रघुनाथरावांची ही पद्धत पाहून गावातील अन्य शेतकरीही मोहिटीची पेंड भातखाचरात वापरू लागले आहेत.
आम्ही दर वर्षी मे व जून महिन्यात शेताच्या बांधावरील किंवा जंगलातील मोहाच्या झाडांखाली पडलेल्या बिया म्हणजे मोहिटी गोळा करतो. येथील प्रत्येक कुटुंब सत्तर ते शंभर किलोच्या आसपास मोहिटी गोळा करतात. त्यापासून घाणीतून 30 ते 40 किलो तेल मिळते. ते आम्ही दिवाळीपर्यंत खाण्यासाठी वापरतो. त्यानंतर शेतात पिकवलेल्या खुरासणीचे तेल वापरतो. अशा प्रकारे आमची तेलाची गरज गावातल्या गावातच भागविली जाते.
विलास पाडवी- 9260627095
दर वर्षी मे-जून मध्ये सकाळच्या वेळी मोहाच्या झाडांखालून बिया गोळा करतो. त्याचे तेल घरी वापरतो. तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेली पेंड भातशेतीत वापरतो, त्यामुळे भातामध्ये किडींचा शिरकाव होत नाही. पिकाला खत उपलब्ध होते.
दिलीप पाडवी- 9226802288
मोहाचे झाड फुलांपासून मद्य बनविण्याच्या पद्धतीमुळे बदनाम झाले होते; परंतु त्याच्या बियांपासून जे खाद्यतेल मिळते, त्याचे महत्त्व लक्षात घेऊन कृषी विद्यापीठात यावर संशोधन होणे गरजेचे आहे. जेणे करून कमी दिवसांत तयार होणाऱ्या व जास्त तेल देणाऱ्या जाती मिळतील. या पिकामुळे जव्हारसारख्या दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान बदलू शकते.
डॉ. संभाजी नालकर- 9890577525
कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील
प्रा. उत्तम सहाणे- 8087985890.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील, ता. डहाणू, जि. ठाणे येथे विषय विषेतज्ज्ञ (पीक संरक्षण) आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...