कोकणातील पर्जन्यमान, जांभा दगड आणि एकूणच हवामान फणसासाठी उपयुक्त आहे, त्यामुळे रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात फणसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. व्यावसायिक पद्धतीने नसली तरी ग्राहकांची मागणी पूर्ण करूनही फणस शिल्लक राहतात. काही वेळा केवळ दोन ते पाच रुपयांना फणस विकावा लागतो. या फणसावर प्रक्रिया केली तर आर्थिक लाभ वाढू शकतो, हे गुहागर तालुक्यातील कौंढर- काळसूर गावातील नवनिर्माण बचत गटाने दाखवून दिले आहे. त्यांनी तळलेल्या गरांचे उत्पादन करून त्याची विक्री सुरू केली आहे. त्याला मार्केटही चांगले मिळत आहे.
कोकण म्हणजे आंबा, फणस, काजू आदींचे आगरच. येथे कातळावर, उंच उंच घाटमाथ्यांवर, उतरंडीवर बागाच बागा दाटीवाटीने पसरलेल्या दिसतात. फणस तर प्रत्येकाच्या दारी असतोच.
सध्या पुणे बाजारपेठेतही फणसांची आवक झालेली दिसत आहे. आंबा, काजू यांच्या तुलनेत फणसाला तेवढे ग्लॅमर नाही, त्यामुळे अजूनही या फळाचे महत्त्व किंवा व्यावसायिक मूल्य वाढवण्याची गरज आहे, तसे प्रयत्नही काही ठिकाणी होताना दिसतात.
कोकणात फणसाला वट पौर्णिमेला मोठी मागणी असते. त्यानंतर मात्र बाजारापर्यंत फणस नेण्याचा खर्च लक्षात घेता विक्रीतून मिळणारे उत्पन्न फार कमी असते, त्यामुळे येथील शेतकरी झाडावरील फणस बरेचदा काढत देखील नाहीत. ते झाडावरच पिकून खराब होतात. रत्नागिरी जिल्ह्यातील कौंढर- काळसूर (ता. गुहागर) येथील बी.एस्सी. झालेल्या मंदार जोशी यांनी याच फणसाचा उपयोग करून त्याचे बाजारपेठेतील मूल्य प्रक्रियेद्वारे वाढवण्याचा विचार केला. बचत गटातील सदस्यांना तो बोलून दाखविला.
हा विचार त्यांनाही पटला आणि काही काळातच सुरू झाली विचारांची अंमलबजावणी. सुरू झाले तळलेल्या फणसगरांचे उत्पादन... गावातील नवनिर्माण बचत गट हा कृषी विभागाच्या सहकार्याने गेल्याच वर्षी सुरू करण्यात आला. सात पुरुष आणि चार महिला असे एकूण 11 सदस्य असलेल्या या गटाने भाजीपाला उत्पादनाकडे लक्ष दिले. गटाच्या माध्यमातून चांगली वितरण साखळी निर्माण करण्यात त्यांना यश आले.
गटाला चिपळूणचे उपविभागीय कृषी अधिकारी आरिफ शाह, कृषी विस्तार अधिकारी आर. बी. शिंदे आणि कृषी सहायक आर. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. दोन हेक्टर जमिनीत भेंडी, वांगी, मिरची, माठ आदी भाजीपाला पिकांचे चांगले उत्पादन होऊ लागले. गटाच्या काही सदस्यांकडे फणसाची झाडेदेखील आहेत. त्यांचा उपयोग करून घेण्याचा नवा व्यवसाय प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. त्याला यश आल्यानंतर काही दिवसांनी शेजारील गावातूनही फणस विकत घेण्यात येऊ लागले.
सर्व फणस एकत्रित केल्यावर ते फोडले जातात. त्याच्या आतील पाव (गऱ्यांना घट्ट पकडून ठेवणारा मधला पांढरा भाग) विळीने काढली जाते. त्यानंतर त्यातील गर काढले जातात. गरांवरची पाती वाळवून त्याचा म्हशींना खुराक म्हणून उपयोग केला जातो. ओले गर ठरावीक आकारात कापण्यासाठी सर्व सदस्य एकत्रित बसतात. साधारण एक किलो गर कापण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो.
आठवड्यातून दोन वेळा हे काम केले जाते. मागणी वाढल्यास त्यानुसार दिवस वाढविले जातात. गरांचे बारीक उभे तुकडे केल्यावर ते खोबरेल तेलात तळले जातात. शेंगदाणा तेलात तळल्यास ते दोन महिन्यांनंतर खराब होण्याची शक्यता असते. खोबरेल तेलात तळलेले गर वर्षभर चांगले राहतात अशी माहिती गटाचे अध्यक्ष विश्वास भिडे यांनी दिली. गर बऱ्यापैकी तळले गेल्यावर मिठाचे पाणी टाकून आणखी तळले जातात, त्यामुळे गरांना कुरकुरीतपणा येतो. 75 टक्के पिकलेल्या फणसाचा उपयोग केल्यास गरांमध्ये खुसखुशीतपणा अधिक येतो.
साधारणपणे मध्यम आकाराच्या दोन फणसांपासून तीन ते चार किलो गर मिळतात. एका फणसाची किंमत साधारण वीस रुपये किंवा उतरत्या काळात तीन रुपयांपर्यंतदेखील खाली येते. याच फणसापासून तळलेले गरे बनविल्यास प्रति नग सव्वा किलो गर मिळतात. 300 रुपये प्रति किलोप्रमाणे ते बाजारात विकले जातात. अर्थात, एका फणसामागे 80 ते 90 रुपये अधिक मिळतात. या अर्थकारणामुळे तळलेल्या गरांचे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न नवनिर्माण बचत गटाचे सहकारी करीत आहेत.
नवनिर्माण बचत गटाने खासगी ओळखीतून वितरण प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईच्या मॉलमधूनही गर विक्रीस ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता पॅकेजिंग अधिक आकर्षक करण्याबरोबरच ब्रॅंडिंगही करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभागाने नाचणीचे पदार्थ करण्यासाठी आवश्यक यंत्र भरड धान्य विकास कार्यक्रमातून गटाला मंजूर केले आहे. ग्रामीण भागात प्रयोगशीलतेने आर्थिक विकास साधता येतो हे या बचत गटाने दाखवून दिले आहे.
- डॉ. किरण मोघे,
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
(9404670887)
नवनिर्माण बचत गटाचे सचिव मंदार जोशी म्हणाले, की आमच्या भागातील काही शेतकरी वैयक्तिकरीत्या तळलेले गरे तयार करतात; मात्र बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आल्यास ही प्रक्रिया अधिक सुलभ होईल, खर्च कमी होईल व बाजारपेठ मिळवणे सुकर जाईल या हेतूने आम्ही एकत्र आलो.
आमचे गरे लोकल मार्केटला विक्रीस ठेवतो. सध्या उन्हाळ्यात या भागात येणारे पर्यटक आमचे मुख्य ग्राहक आहेत. स्थानिक लोकही उपवासाला हे गरे खातात. शंभर ग्रॅमचे पॅकिंग असते; मात्र प्रति किलो 300 रुपयांनी विक्री होते. महिन्याला सुमारे सहाशे किलो गरांची विक्री शक्य होत आहे. पूर्वी वैयक्तिक स्तरावर हेच गर सुमारे दोनशे किलोपर्यंतच विकले जायचे.
पुणे, मुंबई येथील आमच्या परिचित व्यक्तींनाही गरे पाठवतो, ते देखील आमचे विश्वासाचे ग्राहक आहेत.
आमची खरी अडचण म्हणजे एप्रिल-मेमध्ये गरांचे उत्पादन होते. पुढे ते खऱ्या अर्थाने तीन महिन्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे टिकतात. त्यानंतर त्यांची प्रत थोडी कमी होऊ लागते. अर्थात, योग्य पॅकिंग केल्यास त्यांची प्रत अधिक काळ टिकून राहते. गरांची टिकवणक्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे अधिक काळ मार्केट मिळू शकेल.
गऱ्यांसाठी फणस अधिक उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कोकण प्रॉलिफीकसारख्या जातींची लागवड करण्याचा विचार आहे. तळलेल्या गरनिर्मितीसाठी जाड व लांबट आकाराचे गर लागतात. गटाचे सदस्य व परिसरातही अशा फणसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढवण्यावर भर देणार आहोत.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...