पुणे जिल्ह्यात मलठण येथील अंकुश सूर्यवंशी यांनी ऐन दुष्काळातही तुती बाग व रेशीम कीटक संगोपनातून चांगल्या उत्पादनाची व उत्पन्नाची किमया केली आहे. प्रतिकूल परिस्थिती आली तरी निराश न होता चांगले व्यवस्थापन करून यशस्वी होता येते याचे उदाहरण त्यांनी शेतकऱ्यांपुढे ठेवले आहे. संजय फुले
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील मलठण येथील अंकुश श्यामराव सूर्यवंशी यांची शेती आणि रेशीम शेतीतील जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. सर्वत्र पाण्याची वणवण सुरू झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच शेतातील पिकांना पाणी देण्याची मारामार सहन करावी लागत आहे. त्यातच विजेच्या लपंडावाची भर पडलेली असल्याने पाणी देण्यासाठी रोजची कसरत करावी लागत आहे.
विहिरीला अपुरे पाणी, अनियमित वीजपुरवठा, हलकी जमीन, दुष्काळी परिस्थिती त्यातच पाण्याअभावी चार एकरांतील शेतातील उभे उसाचे पीक सोडावे लागले. अशी सर्व परिस्थिती एकाचवेळी झेलत अंकुश सूर्यवंशी आर्थिक हानीही सहन करीत होते. मात्र अशातही मनावर नैराश्य न घेता सर्व प्रकारच्या संकटांचा त्यांनी धैर्याने सामना केला. सूर्यवंशी यांचे वय 57 वर्षे आहे. सूर्यवंशी कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यांच्याकडे एकूण सात एकर क्षेत्र आहे. जमीन हलकीच आहे. शेतीमध्ये मुख्यत्वे कांदा पीक ते घेतात.
घरामध्ये एक मुलगा, तीन मुली, एक भाऊ व भावास दोन मुले असा एकूण परिवार आहे. तिन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. मुलगा गावातच जनावरांचा डॉक्टरी पेशा सांभाळीत शेतीकडे लक्ष देतो. भाऊ यामराव गावापासून 15 किलोमीटर अंतरावरील बोरीबेल गावात माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. घरातच बऱ्यापैकी मनुष्यबळ उपलब्धता असल्याने शेतात कमीत कमी मजूर वापरण्याकडे सूर्यवंशी कुटुंबाचा कल असतो. जेणेकरून मजुरीवरील खर्च कमी करून उत्पादनखर्च कमी होईल.
पाच वर्षांपूर्वी शेजारच्या देऊळगावराजे गावातील काही शेतकरी रेशीम शेतीतून चांगले अर्थार्जन करीत असल्याचे पाहून सूर्यवंशी यांनीही सन 2008-09 मध्ये सुमारे अडीच एकर क्षेत्रात एस-1635 या तुतीच्या वाणाची लागवड केली. त्यामध्ये पट्टा पद्धतीचा वापर केला.
पाणी अपुरे असल्याने तुती बागेला पाणी देण्यासाठी ठिबक संच बसविला. बागेतील पाल्याचा वापर करून रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी 72 फूट लांब व 24 फूट रुंदीच्या कीटक संगोपनगृहाची उभारणी केली. संगोपनासाठी लागणारे साहित्य, औषधे आदी बाबींचीही तजवीज केली.
सूर्यवंशी यांची शेतीतील आवड व ती प्रगत करण्यासाठी होत असलेले प्रयत्न पाहून शासनाने त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान दिले. याशिवाय साहित्य खरेदी करण्याकरिताही अनुदानाचा लाभ त्यांना मिळाला. शासनाचे अनुदान, शेजारील गावातील रेशीम शेतकऱ्यांची प्रेरणा, जिद्द व घरच्यांची साथ यातून सूर्यवंशी यांचा उत्साह दुणावला. सर्व बाजूंची योग्यरीत्या सांगड त्यांनी बसवली.
सूर्यवंशी माती परीक्षण करूनच आवश्यकतेप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा देतात. दरवर्षी उन्हाळ्यात तुती बागेची तळ छाटणी झाल्यावर बागेला सहा ते आठ ट्रॉली शेणखत द्यायला अजिबात विसरत नाहीत. याशिवाय फवारणीद्वारेदेखील बागेला सूक्ष्म अन्नद्रव्ये देतात. त्यामुळे तुतीचा पाला हिरवागार, लुसलुशीत व दर्जेदार होण्यास मदत होतेच. असा पाला रेशीम कीटकांना मिळाल्यामुळे त्यांची निरोगी, सुदृढ वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे कोषांचे भरघोस उत्पादन मिळण्यास हातभार लागतो.
जाणकार शेतकऱ्याची नेहमीची सवय म्हणजे दररोज आपल्या शेताचे सूक्ष्म निरीक्षण करणे.
सूर्यवंशीही आपल्या तुती बागेत फेरफटका मारत असतात. त्या वेळी बागेतील प्रत्येक झाडाचे बारकाईने निरीक्षण करतात. त्यामुळे वेळच्या वेळी तुतीच्या गळफांद्या काढणे, प्रति झुडपास जास्तीत जास्त आठ ते 10 पर्यंतच फांद्या ठेवणे, किडी-रोग आदी वेळीच दृष्टीस पडल्याने त्यांचा वेळीच बंदोबस्त करणे शक्य होते.
फेरफटका मारल्याचा आणखी मिळणारा फायदा म्हणजे या वयात आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. त्याशिवाय तुती बागेत असलेली जिवंत झाडे व उत्पादित होणारा पाला यामुळे किती अंडीपुंज घ्यावेत याचादेखील अंदाज येतो. सूर्यवंशी म्हणतात, की रेशीम कीटकांच्या संगोपनकाळात तुती बागेतील फांद्या कापणे, कीटकांना खाद्य देणे, रेशीम कोष सोडविणे या सर्व कामांमध्ये घरातील सर्वांची मोठी मदत होते.
कॉलेजमध्ये जाण्याआधी मुलेही बागेतील तुतीच्या फांद्या कापून आणतात, त्यानंतरच आपल्या कामास जाण्यास निघतात. आम्ही वयस्कर माणसं कीटक संगोपनगृहातील कीटकांना त्या फांद्यांचे खाद्य देतो. कॉलेजमधून मुलं आली की संध्याकाळच्या खाद्यासाठीही तुती बागेतून फांद्या कापून आणतात. त्यांनी आणलेला पाला आम्ही कीटकांना देतो. याशिवाय बागेतील खुरपणी, खत देणे, गळफांद्या काढणे ही कामेदेखील आम्ही घरातील मंडळीच करत असतो.
गळफांद्या, कीटकांनी खाऊन शिल्लक राहिलेला पाला, फांद्या घरातील चार दुभत्या जनावरांना उन्हाळ्यात खाऊ घातल्याने काही प्रमाणात चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. दुधाचे प्रमाणही काही प्रमाणात वाढले आहे. दुष्काळात चार एकरांवरील ऊस पाण्याअभावी सोडून द्यावा लागला होता. त्यामुळे कमी पाण्यातील हमखास बाजारपेठ व हमीभाव असलेल्या रेशीम शेती उद्योगाकडेच सूर्यवंशी यांनी लक्ष देण्याचे ठरवले होते.
फेब्रुवारी 2013 मध्ये सी.एस.आर. डबल हायब्रीड जातीच्या रेशीम कीटकांच्या 600 अंडीपुंजाचे संगोपन त्यांनी केले. त्यापासून सुमारे 25 ते 30 दिवसांच्या कालावधीत सुमारे 400 किलो कोषांचे उत्पादन झाले. कर्नाटकातील व्यापाऱ्यांनी घरी येऊन कोषांची खरेदी केली. 360 रुपये प्रति किलो असा दर दिला.अशा प्रकारे कमी कालावधीत रेशीम शेतीतून सूर्यवंशी यांच्या हाती समाधानकारक उत्पन्न हाती लागले आहे.
यामध्ये उत्पादन खर्च सुमारे 25 हजार रुपयांपर्यंत आला. यामध्ये अंडीपुंजाची किंमत, तुती बागेची नांगरट, मशागत, कीटकसंगोपन मजुरी, औषधे, बागेची जोपासना आदी बाबींचा समावेश होतो. कारण तुतीची लागवड एकदाच करावी लागते व एकदा लावलेली बाग सुमारे 15 वर्षे टिकते. त्यामुळे दरवर्षीचा लागवडीवरील खर्च वाचतो.
सूर्यवंशी म्हणतात, की शासन कोषांची खरेदी करते. त्याचबरोबर राज्याबाहेरील व्यापारीदेखील कोषांची खरेदी करतात. त्यांनादेखील कोषविक्री करण्याची मुभा शासनाने शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यास उत्पादित कोष विक्रीस अधिकचे पर्याय खुले झाले आहेत. तुती वाणाबाबत आपला अनुभव कथन करताना ते म्हणतात, की एस-1635 तुती वाणमध्ये रोगाला, दुष्काळी परिस्थितीला सामना देण्याची क्षमता चांगली आहे.
वाढीचा वेगही जास्त आहे. त्यामुळे खतांवरील खर्च कमी होतो. पाणीदेखील वाचते. त्यामुळे यापुढील काळात शेतकऱ्यांनी या जातीचा विचार करण्यास हरकत नाही.
सूर्यवंशी यांनी चालू महिन्यात सीएसआर जातीच्या 600 अंडीपुंजांचे कीटकसंगोपन घेतले आहे. त्यापासून सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी वर्षभरात एकूण चार पिके घेतली. त्यातून सुमारे 2550 अंडीपुंजाचे संगोपन करून 1283.000 कोषांचे उत्पादन घेतले आहे. त्यापासून दोन लाख 23 हजार 350 रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. त्यांना वेळोवेळी तालुका व जिल्हा रेशीम कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
सूर्यवंशी यांचा सन 2010-11 मध्ये शासनाने आदर्श रेशीम उद्योजक पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
अंकुश सूर्यवंशी नावाप्रमाणेच सूर्यासारखे चमकले आहेत. रेशीम शेतीत त्यांनी निर्माण केलेल्या प्रकाशामुळे या दुष्काळातदेखील राज्यातील शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे जरूर वळावे. मी मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
सूर्यवंशी म्हणतात की शासनाकडून रेशीम कोषांना अत्यंत कमी दर मिळतो. सध्या महागाई वाढली आहे. खर्च वाढले आहेत. शासनाच्या दरात शेतकऱ्यांना रेशीम शेती परवडत नाही. आमच्या घरी मनुष्यबळ चांगले असल्याने मजुरीवरील खर्चात बचत होते. केवळ रेशीम कीटक संगोपनासाठी खर्च येतो असे नाही तर तुतीच्या बागेचा व्यवस्थापन खर्चही मोठा असतो. तो जमेत धरला पाहिजे.
खाजगी व्यापारी रेशीम कोषांना चांगला दर देतात. त्यामुळे ही शेती परवडू शकते. पण मग त्यांच्यावरच अवलंबून राहावे लागते. यंदा तर पाऊस खूप कमी पडला. तरीही उपलब्ध पाणी, विहीर, ठिबक सिंचन यां माध्यमातून पाण्याचे काटेकोर नियोजन करीत तुतीची बाग जगविली.
संपर्कः अंकुश सूर्यवंशी, 9970517587.
(लेखक जिल्हा रेशीम कार्यालय, पुणे येथे प्रकल्प अधिकारी आहेत.)
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...