सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा डोंगराळ भाग. पावसाळ्यात अति पाऊस असला तरी उन्हाळ्यात शेतीसाठी पाणीटंचाई ठरलेली, त्यामुळे येथील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले. या पैकीच एक आहेत बहुले येथील श्रीरंग पानस्कर. चिकाटीने एका गाईपासून सुरू केलेला गोठा आता 22 दुधाळ जातिवंत गायींनी भरला आहे. योग्य व्यवस्थापनातून आर्थिक नफा वाढविण्याचा पानस्करांचा प्रयत्न असतो.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र उन्हाळ्यात पाणीटंचाईला समोरे जावे लागते, त्यामुळे शेतीतील उत्पन्न जेमतेम. हे लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. यापैकीच एक आहेत बहुले येथील श्रीरंग आबासाहेब पानस्कर. शेती बरोबरीने दुग्ध व्यवसायही ते यशस्वीपणे करतात.
पानस्कर मुंबई महानगरपालिका नोकरीस होते; परंतु नोकरीत भवितव्य वाटत नसल्यामुळे त्यांनी 15 वर्षे नोकरी करून 1993 मध्ये गावाचा रस्ता धरला. त्यांनतर त्यांनी शेती करण्यास सुरवात केली. दोन वर्षे शेती करत असताना पाणीटंचाईमुळे अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेती तोट्यात जाऊ लागली. यामुळे कुटुंबाची अर्थिक परिस्थिती बिघडली, यामुळे हातउसणे घेण्याची वेळ आली. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत होता. या काळात त्यांचे मित्र नितीन कुलकर्णी यांनी आधार देत गायी संगोपनाचा सल्ला दिला. त्यांचा सल्ला ऐकत पानस्कर यांनी इंदोली येथील शेतकऱ्याकडून जर्सी गाय घेतली.
पानस्करांकडे सात एकर शेती आहे, यापैकी तीन एकर बागायत आहे. यामध्ये दीड एकर ऊस व दीड एकर चाऱ्यासाठी मका, यशवंत गवताची लागवड आहे. खरिपात सोयाबीन, ज्वारी लागवड असते. रब्बी, उन्हाळी हंगामात विहिरीचे पाणी कमी होत असल्याने दीड एकरावर चारापिकांची लागवड केली जाते.
पानस्कर यांनी पहिल्यांदा घराशेजारी साध्या पद्धतीने गोठा करून जर्सी गायीचे संगोपन सुरू केले. या गाईपासून दररोज आठ लिटर दूध मिळत होते. यातून पैसे साठवत गोठ्यात गायी वाढवण्याची त्यांची इच्छा होत होती. मात्र भाडंवल कमी असल्यामुळे हे शक्य होत नव्हते. या वेळी डॉ. अविनाश साळुंखे यांच्या मदतीने जातिवंत होल्स्टिन फ्रिजियन भाकड गायींची कमी दरात खेरदी केली. या गायींचे चांगले संगोपन केले. या गायी दुधात आल्यावर दूध विक्रीतून चांगले उत्पन्न मिळू लागले, त्यामुळे टप्प्याटप्प्याने गायींची खरेदी सुरू केली.
1) गायींच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने 2009 मध्ये अडीच लाख रुपये खर्च करून 60 फूट बाय 40 फूट आकाराचा हवेशीर गोठा बांधला. या गोठ्याची उभारणी करताना मुक्त संचार गोठा करता, यावा या पद्धतीने आखणी केली. या गोठ्याच्या चारही बाजूने तारेची जाळी लावली. गायींना फिरण्यास पुरेशी जागा मिळेल याचे नियोजन केले.
2) गोठ्यात सध्या 21 होल्स्टिन फ्रिजीयन आणि एक जर्सी गाय आहे.
3) वर्षभर दूध उत्पादनात सातत्य राहावे, यासाठी रोटेशन पद्धतीने गायींच्या गर्भधारणेचे नियोजन केले जाते. गायींना तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून कृत्रिम रेतन केले जाते.
4) सध्या 20 लिटर दूध देणाऱ्या गायीला प्रति दिन नऊ किलो पशुखाद्य दिले जाते. यामध्ये गहू भुसा, गोळी पेंड, मका चुणी, उडीद चुणी असते, तर 15 लिटर दूध देणाऱ्या गायीस सहा किलो पशुखाद्य दिले जाते. शिफारशीत प्रमाणात खनिज मिश्रणही आहारात दिले जाते.
5) दररोज प्रति गायीस सकाळी 12 किलो आणि संध्याकाळी 12 किलो हिरवा आणि सुक्या चाऱ्याची कुट्टी करून दिली जाते.
6) गव्हाणीजवळच गायींना दिवसभर गरजेनुसार पाणी पिता येईल, अशी सोय केली आहे. गोठ्याजवळ टाकी बांधली आहे. सायफन पद्धतीने गव्हाणीजवळ पाणी जाते. गायी गरजेनुसार पाणी पितात.
7) उन्हाळ्यात गोठ्याच्या पत्र्यावर पाचटाचे आच्छादन केले जाते, त्यामुळे गोठ्यात गारवा राहतो.
8) गोठा आणि गोठ्यातील जमीन स्वच्छ ठेवली जाते, त्यामुळे गायींचे आरोग्य चांगले राहते.
9) गायींची संख्या वाढल्याने धार काढण्याऱ्या यंत्राची खरेदी केली.
1) गोठ्यातील काम पहाटे साडेपाचला सुरू होते. श्रीरंग पानस्कर व त्याच्या पत्नी सुवर्णा दोघे मिळून गोठ्यातील शेण बाहेर काढून गोठा स्वच्छ करतात.
2) त्यानंतर गायींना पशुखाद्य देऊन यंत्राद्वारा धारा काढल्या जातात. त्यानंतर चाराकुट्टी दिली जाते.
त्यानंतर गायींना मोकळे सोडले जाते. गायी गरजेनुसार गोठ्यात येऊन बसतात.
3) संध्याकाळी सहा वाजता दूध काढले जाते. पशुखाद्य व चाराकुट्टी दिली जाते.
1) वेळोवेळी गायींची आरोग्य तपासणी केली जाते. वर्षातून दोनदा म्हणजेच डिसेंबर आणि मार्चमध्ये लसीकरण केले जाते.
2) गायींच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवल्या जातात.
3) सर्व प्रकारचा चाराकुट्टी करून दिला जात असल्यामुळे चारा वाया जात नाही.
4) धारा काढल्यानंतर गायींना मुक्त संचार गोठ्यात फिरायला सोडले जाते, त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहिले आहे.
5) गोठ्याची दररोज स्वच्छता ठेवली जाते. एक ते दीड महिन्याने सर्व गोठा निजंर्तुक केला जातो.
6) गायींना गोठ्यात बसण्यासाठी मॅटचा वापर केला असल्याने त्यांच्या गुडघ्यांना व नख्यांना दुखापत होत नाही.
7) उन्हाळ्यात गायींना बंदिस्त न ठेवता खुले ठेवले जाते.
8) कुटुंबातील सर्व सदस्य गायींचे व्यवस्थापन करतात, त्यामुळे मजुरांची गरज नाही.
9) गायीच्या धारा यंत्राने काढल्या जातात.
10) गोठ्यातच जातिवंत दुधाळ कालवडी तयार केल्या जातात, त्यामुळे खरेदीचा खर्च वाचतो.
1) पानस्कर यांना गायींच्या व्यवस्थापनात पत्नी सुवर्णा, आई सुभ्रदा आणि दोन मुले रोहित आणि राहुल यांची मदत होत असल्यामुळे मजुरांची गरज लागत नाही, त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते. गोठ्याच्या व्यवस्थापनाची सर्व कामे वेळेवर होतात.
2) सध्या पानस्करांच्या गोठ्यातील 14 गायी दुधात आहेत. दिवसाला दोन वेळ 165 ते 170 लिटर दूध मिळते. प्रति लिटर 24 रुपये दर मिळतो आहे. दूध खासगी डेअरीला पाठविले जाते. रोजचा चारा, पशुखाद्य, औषधोपचार, स्वतःची मजुरी, वीज बील, इतर उद्भवणारा खर्च लक्षात घेता दररोजच्या दूध विक्रीतून सध्या दररोज 1700 रुपये निव्वळ नफा हाती राहतो. सध्या पशुखाद्य, औषधोपचाराचे दर वाढत असल्याने काटेकोर नियोजन ठेवले जाते.
3) वर्षाकाठी 25 ट्रेलर शेणखत मिळते. त्यातील 10 ट्रेलर शेणखत स्वतःच्या शेतीला वापरले जाते, तर उरलेले शेणखत दोन हजार रुपये ट्रेलर या दराने विकले जाते. यातून वर्षभरात 20 ते 25 हजार रुपये मिळतात.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...