प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांचे मृत्यू मेंढीपालन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम करतात, त्यामुळे मेंढपाळांचे अतोनात आर्थिक नुकसान होते. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
कोकरांना जन्माच्या पहिल्या पाच ते सहा तासांत दूध ओढण्यास मज्जाव केल्यास त्यांच्या शारीरिक वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. कोकरू जन्मल्यावर चारही पायांवर उभे राहण्यास लागणाऱ्या कालावधीचा उपयोग जीवनशक्तीचे मापक म्हणून करतात. उभे राहण्यास व आईचे दूध पिण्यास कोकरास 15 ते 30 मिनिटे लागतात. कोकराचा प्रतिकूल वातावरणात जन्म झाल्यास अतोनात हानी होते. पावसाळ्यात चिखलामुळे उठता येत नाही.
रुक्ष, उन्हाळी हवामानात कोकरांच्या शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन होते, निर्जलीकरणाने मृत्यू ओढवितात. थंडीमध्ये गारठून मृत्यू होतात.
प्रथम तीन दिवसांत कोकरांना दूध पुरेशा मात्रेत न मिळाल्यास मृत्यू ओढवतात. उपासमारीची नेहमी आढळणारी कारणे म्हणजे स्तनदाहाने मोठे झालेले सड, बंद झालेल्या ओव्या, दूधनिर्मितीचा अभाव, लोकर कातरताना ओव्यांस झालेली इजा. प्रथम विणाऱ्या मेंढीत मातृत्वाचा अभाव आढळतो.
व्यवस्थापन योग्य नसल्यास किंवा शारीरिक अस्वस्थता असल्यास प्रौढ मेंढ्यादेखील त्यांच्या कोकरांस सोडून देतात. विण्याची क्रिया अति जास्त लांबल्यास येणाऱ्या थकव्यामुळे मेंढ्या कोकरांकडे लक्ष पुरवीत नाहीत. गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यात मेंढ्यांना एकसारखे हाताळल्यास उदा. ः लोकर कातरताना, कोकरांचे शारीरिक आकारमान सरासरीपेक्षा कमी असल्यास, कॅल्शिअम क्षाराची आणि "अ' जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास कोकरांच्या मरतुकीचे प्रमाण वाढलेले पाहावयास मिळते. जन्मलेल्या कोकरांमध्ये लोह व तांबे आदी क्षारांची कमतरता असल्यास कोकरे माती खाऊ लागतात, जुलाब होतात, त्यांना नीट चालता येत नाही, ओव्यांतील दूध ओढता येत नाही, कोकरे भेंडाळतात व तोंडावर पडतात, वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो; परिणामी भूक मंदावते, अशक्तपणा येतो व त्यामुळेदेखील मृत्यू ओढवू शकतो.
1) मेंढ्यांना गाभणकाळात शेवटचे सहा आठवडे आणि दुग्धोत्पादन काळातील प्रथम आठ आठवडे उत्तम प्रतीचा आहार पुरविणे आवश्यक असते. गाभण कालावधीतील शेवटच्या सहा आठवड्यांत 200 ते 450 ग्रॅम खुराक मिश्रण दररोज द्यावे. यामुळे कोकरे सशक्त, वजनदार निपजतात व माता मेंढीस दूधदेखील विपुल प्रमाणात फुटते.
2) गाभणकाळाच्या शेवटच्या महिन्यापासून मेंढीच्या चाऱ्यामध्ये शतावरी वनस्पतीचा समावेश करावा. यामुळे विल्यानंतर दूधनिर्मितीस सुलभता येईल, कारण कोकराचा विकासदर हा मेंढीचे दुधाचे प्रमाण व गुणवत्ता यावर अवलंबून असतो.
3) विण्यास आलेल्या मेंढ्यांचे दिवसातून दोन ते तीनदा लक्षपूर्वक निरीक्षण करून मेंढ्यांना कमीत कमी अस्वस्थ करावे.
4) परित्यागीत कोकरांना पालक माता उपलब्ध करून द्यावी.
5) गरज लागल्यास विणाऱ्या मेंढीस तत्काळ व कौशल्यपूर्ण मदत देणे अपरिहार्य असते, तसेच या वेळेस जंतुसंसर्ग होऊ नये याकरिता स्वच्छता बाळगावी.
6) मरण पावलेल्या कोकरास योग्य पद्धतीने मातीत पुरावे, जेणेकरून सांसर्गिक रोगास आळा घालणे सोपे होईल.
7) मेंढ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व सावलीचा पुरवठा विपुल प्रमाणात उपलब्ध असावा.
8) आपल्याकडे आजतागायत लोकर कातरणी ही कात्रीच्या साह्याने केली जाते, त्यामुळे लोकर कातरणी करताना ओव्यांस इजा होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. परभक्षींचा प्रतिबंध करावा.
9) उणीव सड असणाऱ्या मेंढ्या कळपातून काढून टाकल्यास मरणप्रमाण कमी करणे शक्य होते.
10) कोकरू जन्मल्यावर त्याची नाळ शरीरापासून पाच सें.मी. दुरून कापून काढावी, त्यास टिंक्चर आयोडीन लावावे.
11) अशक्त कोकरास मेंढीचे ....................नाळ सापडत नसल्यास त्यास मदत करावी. कोकरू तीन ते चार महिन्यांचे झाल्यानंतर पशुवैद्याच्या सल्ल्यानुसार जंतनिर्मूलन करावे.
12) कोकरू सहा महिन्यांचे झाल्यानंतर आंत्रविषार रोगाविरुद्ध लसीकरण करून घ्यावे व 14 दिवसांनंतर याच लसीचा बूस्टर द्यावा. औषधोपचार आणि लसीकरणापूर्वी पशुवैद्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
दोन खुरांमध्ये निमुळती जागा असणारी जनावरे (शेळ्या-मेंढ्या) पायलाग आजारास लवकर बळी पडतात. पायलाग हा मुख्यतः दोन प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो, आर्द्र हवामान व ओलसर माती प्रसारास कारणीभूत ठरते.
रोगाची लक्षणे
खुरे मऊ होणे, खुरांना सूज येणे, दुर्गंधी येणे, खुरांतून रक्त येणे, खुरांत खपल्या होणे, मेंढी लंगडणे, ताप येणे, वजन कमी होणे, खूर गळून पडणे, काळजी न घेतल्यास खुरांत अळ्या पडणे, भूक नाहीशी होणे, अशक्तपणा येणे.
1) वाढलेली खुरे कापून योग्य निगा राखावी.
2) दररोज लेंडी लोटून वाडग्याची स्वच्छता राखावी.
3) 15 दिवसांतून एकदा वाडग्यात चुन्याचा सडा द्यावा.
4) मेंढ्यांना मूत्र व लेंड्या साठलेल्या जागी ठेवणे टाळावे.
5) लंगडणाऱ्या मेंढ्या कोरड्या जागेत इतर मेंढ्यांपासून वेगळ्या ठेवाव्यात.
6) मेंढ्यांना दररोज दहा टक्के झिंक सल्फेटच्या द्रावणातून चालत घेऊन जावे.
7) कायम लंगडणाऱ्या मेंढ्या विकून टाकाव्यात.
8) लंगडणाऱ्या मेंढ्यांच्या विक्रीनंतर तीन आठवड्यांनंतर नवीन मेंढ्या कळपात समाविष्ट कराव्यात.
9) प्रादुर्भाव झालेली खुरे पोटॅशिअम परमॅंगनेटच्या पाण्याने स्वच्छ धुवावीत. वनौषधीचा वापर करावा.
(लेखक अंतरा संस्था, पुणे येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
गोठ्याचे व्यवस्थापन ठेवण्याच्या पद्धती विषयीची माह...