विदर्भातील प्रसन्ना देशपांडे यांची पूरक व्यवसायाला गती
मोडलो जरी पाठीत तरी मोडला नाही कणा, पाठीवर थाप देत नुसते लढ म्हणा ! अशाच दुर्दम्य आशावादाच्या बळावर अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प्रसन्न देशपांडे यांनी शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. आज गोठा संगोपन व दुग्ध व्यवसायातून त्यांनी विदर्भात चांगली वाटचाल सुरू ठेवली आहे.
राजकारणात सक्रिय असलेल्या तांदळी (ता. पातूर, जि. अकोला) येथील देशपांडे कुटुंबीयांची वडिलोपार्जित 28 एकर शेती. या शेतीत सोयाबीन, कपाशी, संकरित ज्वारी, हरभरा, रब्बी हंगामात गहू यांसारखी पारंपरिक पिके घेण्यावर त्यांचा भर राहतो. पिकांच्या पाणी व्यवस्थापनासाठी चार विहिरी असून त्यातील तीन विहिरींतील पाण्याचा उपयोग होतो. देशपांडे कुटुंबीयांकडे 52 गावांची वतनदारी होती. संस्थान खालसा झाली. ------रसूल 1963 साली-----
शेतीला दिली पूरक व्यवसायाची जोड
कुटुंबात वडील लक्ष्मणराव देशपांडे यांच्यासह त्यांची चार मुले, सुना, नातवंडं असा नऊ जणांचा समावेश आहे. 28 एकर शेतीत पारंपरिक पीक पद्धतीच्या बळावर या सदस्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे शक्य नसल्याच्या जाणिवेतून त्यांनी 2009-10 या वर्षात दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता लागणारी तांत्रिक माहिती त्यांना पिंपळखुटा येथील दुग्ध व्यावसायिक डॉ. अरविंद देशमुख व खेट्री येथील आसिफभाई यांच्याकडून मिळाली. त्यानंतर गाईंची खरेदी नगर जिल्ह्यातील लोणी व शेलगाव बाजार (जि. बुलडाणा) येथून करण्यात आली. 60 ते 70 हजार रुपये प्रति गाय याप्रमाणे 12 गाईंची टप्प्याटप्याने खरेदी केली.
गोठा व संगोपनगृहाची रचना
बारा जनावरांसाठी असलेला गोठा 30 फूट लांब व 15 फूट रुंद अशा रचनेत आहे. जुना गोठ्यावर पूर्वी कौले होती, त्याऐवजी आता पत्र्यांचे आच्छादन केले आहे. सन 2005 साली उभारण्यात आलेल्या या गोठ्याकरिता 60 हजारांपर्यंत खर्च आला.
जनावरांचे व्यवस्थापन
देशपांडे कुटुंबातील प्रसन्ना यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. उच्च शिक्षणानंतरही नोकरी मिळत नसली तरी निराश न होता त्यांनी शेती व्यवसायातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. सन 1987 मध्ये एका भीषण अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातामुळे त्यांच्यावर कायम अपंगत्वाची वेळ आली. तब्बल साडेचार महिने त्यांना बेडवर काढावे लागले. या अपघातानंतरही निराश न होता त्यांनी शेती व पूरक व्यवसायातून आशावादी जीवन जगण्याचा पर्याय शोधला. सकाळी चार वाजता उठून गोठ्याचे व्यवस्थापन व त्यानंतर दूध काढले जाते. सायंकाळी चार वाजता पुन्हा दूध काढले जाते. जनावरांचे आरोग्य जपण्याकरिता गोठ्यात पंखे बसविले आहेत. गोठ्याच्या परिसरात श्लोक व धार्मिक संगीताचे सूर गुंजतात. जनावरांना चांगल्या प्रसन्न वातावरणात राहता यावे व त्या अनुषंगाने त्यांची वाढ व दुधाचे प्रमाण वाढावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. जनावरांकडून मिळणाऱ्या दुधाच्या प्रमाणात आहाराचे नियोजन करण्यात आले आहे. दहा लिटर दूध देण्याची क्षमता असेल तर पाच किलो आहार दिला जातो. त्यामध्ये ढेप तीन किलो, मक्यावर आधारित खाद्य दोन किलो, मिनरल मिक्श्चर आदींचा यात समावेश आहे.
वासरांची विक्री केली जात नाही. उपलब्ध शेणखत व मलमूत्राचा वापर आपल्या शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी केला जातो.
दूध नाशवंत असल्याने त्याच्या रोजच्या विक्रीची जबाबदारी राहते. यामुळे अनेक कौटुंबिक सोहळ्यांना मुकावे लागण्याची वेळ प्रसन्ना यांच्यावर येते. अपंगत्व असल्याने त्यांना जमिनीवर थेट बसता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी छोटेसे लोखंडी स्टूल तयार करून घेतले आहे. जनावरांचे आरोग्य जपले तरच त्यांच्याकडून दुधाचे उत्पादनही वाढीव मिळते. त्यादृष्टीने त्यांनी नियोजन केले आहे.
जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन
जनावरांच्या शरीरावर गोचीड होतात. त्यांच्याद्वारे जनावरांचे रक्त शोषले जाते. गोचिडांच्या नियंत्रणाकरिता तज्ज्ञांनी शिफारस केल्याप्रमाणे औषधोपचार केले जातात. दर दोन दिवसांआड पाण्याचा वापर करून जनावरांची स्वच्छता करण्यावरही भर राहतो. फऱ्या, तोंडखुरी, पायखुरीसारख्या रोगांसाठी वेळोवेळी शासकीय शिबिरातून लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय दवाखान्यातही जनावरांची आरोग्य तपासणी करून आणली जाते. जनावरांच्या कासेवर सूज आल्यास हळद आणि एरंडी तेल लावले जाते. जनावरांसाठी पिण्याचा हौद गोठा परिसरातच आहे. यातील पाणी दर दोन दिवसाआड बदलण्यावर भर राहतो.
व्यवसायात आणला फायदा
शासकीय दुग्ध योजनेद्वारे गाईंच्या दुधाची खरेदी होत नाही. म्हशीच्या दुधालाही अत्यल्प दर मिळतो. यावर उपाय म्हणून प्रसन्न देशपांडे यांनी खासगी खरेदीदार शोधले. तालुक्याचे ठिकाण पातूर येथील हॉटेल व्यावसायिकाची भेट घेतली. "बिकानेर' या हॉटेल व्यावसायिकाने 24 ते 25 रुपये प्रति लिटर दराने दुधाची खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने याच व्यावसायिकाकडे दुधाचा रतीब घातला जातो. सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळचे मिळून संकलित झालेले दूध दुसऱ्या दिवशी दुचाकीने हॉटेल व्यावसायिकाकडे पोचते केले जाते. तांदळापासून पातूर हे तालुक्याचे ठिकाण तेरा किलोमीटर अंतरावर आहे.
दूध संकलनाचा ताळेबंद
गाय व्याल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीत प्रति दिन तेरा लिटर दूध मिळते. त्यानंतर दूध संकलन कमी होत ते दहा लिटरवर पोचते. वातावरणाचा परिणामही जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाच्या उत्पादकतेवर होतो. त्यामुळे कधी कधी हे संकलन सहा ते सात लिटरवरही पोचते. बारा जनावरांपासून दोन्ही वेळचे मिळून सरासरी 105 लिटर दुधाचे संकलन होते. प्रति लिटर 24 रुपयांचा दर अपेक्षित धरल्यास 2520 रुपयांचे अर्थार्जन दिवसाला, तर महिन्याकाठी 75 हजार 600 रुपये या व्यवसायातून मिळतात. त्यातील 50 टक्के रक्कम ही जनावराचे आरोग्य, गोठ्याचे व्यवस्थापन, आहार व मजुरी यावर खर्च होते.
व्यवसायातील धोके
डासांचा प्रादुर्भाव तसेच जनावरांना होणारी दगदग यामुळे आजार होण्याची शक्यता बळावते. होल्स्टिन फ्रिजियन जातीच्या गाईंची खरेदी करण्याचा हंगाम हिवाळा असल्याचे प्रसन्ना सांगतात. उन्हाळ्यात जनावरांची खरेदी शक्यतो टाळावी असे ते म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रात वातावरण थंड तर विदर्भाचा उन्हाळा त्या तुलनेत कडाक्याचा असतो. त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढते असे ते म्हणतात.
"कामधेनू'द्वारे गौरव
दुग्ध व्यवसायात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या देशपांडे यांच्या कार्याची दखल पशुसंवर्धन विभागाकडून घेण्यात आली. "कामधेनू' योजनेअंतर्गत सर्वाधिक दूध संकलक म्हणून त्यांना तालुकास्तरावर पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन