साकळी (जि. जळगाव, ता. यावल) येथील शोभा वाणी यांनी केळीपासून चिप्स, चिवडा, शेव, बिस्किटे, लाडू, गुलाबजाम आदी नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करून यशस्वी प्रक्रिया उद्योजक म्हणून नाव कमावले आहे. केळीला समाधानकारक दर मिळत नसल्याने प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन हा त्यावर पर्याय असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे.
यावल तालुक्यातील (जि. जळगाव) साकळी गाव केळी शेतीसाठी खानदेशात नावाजलेले आहे. येथील उमेश व शोभा या वाणी दांपत्याने केळी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून देशभर गावाचा नावलौकिक वाढविला आहे. वाणींचीही घरची केळी शेती आहे. मात्र केळीला बाजारात चांगले दर मिळत नसल्याने चिप्सनिर्मिती करून केळीची किंमत वाढविण्याचे त्यांनी ठरवले.
शोभाताईंनी 1999 च्या सुमारास केळी चिप्स तयार केले. पिकते तेथे विकत नाही म्हणतात त्याचा अनुभव त्यांना आला. मात्र खचून जाण्याऐवजी परिसरातील कॉलन्यांमधून चिप्स अक्षरशः मोफत वाटले. त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी उंबरठे झिजवले. त्यांची मुलगी जळगावात सातवीत शिकत असताना डब्यात खाऊ म्हणून केळीचे चिप्स देताना विद्यार्थिनींच्या रूपाने नवीन ग्राहक जोडले. शाळेत भरलेल्या एका प्रदर्शनात सहभागी होऊन शोभाताईंनी दोनच तासांत सर्व चिप्स विकून 300 रुपयांचा नफा कमावला. त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी पती उमेश यांच्याशी चर्चा केली. त्यातून साकळीत उभा राहिला निर्मल महिला गृह उद्योग.
प्रक्रियेसाठी बाराही महिने कच्ची केळी लागतात.
स्वतःच्या 13 एकरांतील शेतातील केळी अपुरी पडतात. त्यामुळे परिसरातील शेतकरी, व्यापाऱ्यांकडून केळी घेतली जातात. केळीचे दर स्थिर नसतात. हवामान, उत्पादन, मागणी यांचा परिणाम त्यावर होत असतो. शोभाताई मात्र प्रक्रियायुक्त पदार्थांच्या किमती नेहमी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतात. केळीचे दर आवाक्याबाहेर गेल्यावर नुकसान सोसण्याची तयार ठेवतात. त्यामुळे त्यांचा ग्राहकवर्ग कायम टिकून आहे.
-ब्रॅंडचे नाव- निर्मल महिला गृह उद्योग
-वर्षभरात सुमारे 10 ते 15 टन चिप्स, 15 टन चिवडा, शेव, बिस्कीट, लाडू, पीठ यांची विक्री
-एक किलो चिप्स तयार करण्यासाठी पाच किलो कच्च्या केळीची गरज भासते.
-सुरवातीला पाच- दहा किलो पदार्थांची निर्मिती व्हायची. आज दैनंदिन पाच क्विंटल, तर वर्षभरात सरासरी 150 टन कच्च्या केळीवर प्रक्रिया होते.
-मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, धुळे, जळगावात मोठ्या प्रमाणावर ग्राहक
-सुमारे 25 लाख रुपयांची वार्षिक उलाढाल
चिप्स - 200 ते 250 रु.
शेव - 250 रु.
चिवडा - 300 रु.
बिस्कीट - 250 रु.
पावडर- 200 ग्रॅम- 45 रु.
-उपवासाची तसेच मुले, गर्भवती महिलांसाठी पोषक बिस्किटे तयार केली आहेत. मागणीनुसार गुलाबजामही तयार करून दिले जातात.
जळगावसह अन्य ठिकाणच्या प्रदर्शनांत सहभागी झाल्याने पदार्थांचे मार्केटिंग सोपे झाले. सह्याद्री वाहिनीसह आकाशवाणीवर मुलाखत प्रसारित झाल्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक येथून चिप्स, शेव, चिवडा, लाडू आदी पदार्थांना मागणी वाढली. जळगावातील अखिल भारतीय केळी प्रदर्शनाने प्रक्रियायुक्त पदार्थांना आणखी कवाडे खुली केली. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शोभाताईंनी उत्पादनाचा वेग वाढविला. मुलगा पराग बी.कॉम.चे शिक्षण घेऊन आईला मदत करू लागला.
मुंबईसह पुणे, नागपूर येथील सुशिक्षित बेरोजगार युवती शोभाताईंच्या संपर्कात आल्या. ठोक भावात माल विकत घेऊन शहरातील कॉलन्यांमध्ये त्या विकू लागल्या. त्यातून मोठ्या शहरांत ग्राहकांचे जाळे तयार झाले. बॅंकेत पैसे जमा झाल्यानंतरच मालाचा पुरवठा केला जात असल्याने सहसा फसवणूक होत नाही. जळगाव शहर परिसरातील काही औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या कॅंटीनसाठी शोभाताईंकडून आठवड्याला 150 ते 200 किलो केळी चिप्स खरेदी करतात.
शोभाताईंनी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा बचत गट स्थापन केला. बिग बझारकडून या गटाला 650 किलो केळी बिस्किटांची मोठी ऑर्डर मिळाली. दोनशे किलो मालही पुरविला. काही तांत्रिक मुद्याच्या कारणामुळे सध्या माल पाठवला जात नाही. शोभाताईंना आपल्या उद्योगात पती उमेश यांची मोठी साथ मिळाली आहे.
संपर्क - शोभा वाणी ९३७३९०३९२९ लेखक : जितेंद्र पाटील
माहिती संदर्भ :अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...