ग्रामीण भागातील अनेक तरूण रोजगारासाठी महानगर गाठतात. त्यामुळे गांव ओस पडत असून महानगरांमध्ये बेरोजगार तरूणांचे लोंढे वाढत चालले आहेत. बेरोजगार तरूणानी स्वत: रोजगाराची निर्मिती करावी म्हणून विविध योजना शासकीय पातळीवर राबविले जात असून देखील तरूणाच्या मानसिकतेत फारसा बदल झालेला दिसून येत नाही. आज ही तरूण स्वत:च्या व्यवसायापेक्षा नोकरीलाच प्रधान्य देत आहे. आपल्या गावातच रोजगाराची निर्मिती होऊ शकते याची कल्पना देखील त्यांना नसते. कल्पकतेला प्रयत्नाची जोड मिळाली तर निश्चितच बेरोजगारीवर मात करता येते याची प्रचिती चाळीसगांव तालुक्यातील वाघळी येथील दिनेश पाटील या होतकरू तरूणाने चालू केलेल्या केळी वेफर्सच्या व्यवसायातून दिसून येते.
वाघळी गांवा जवळ रस्त्याच्या कडेला कच्च्या केळीचे वेफर्स तळून विक्री करणारा दिनेश पाटील परिसरातील तरूणांसाठी आदर्शवत ठरत आहे. दिनेशचे शिक्षण परिस्थितीमुळे 12 वी पर्यंत होऊ शकले. आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागावा म्हणून काही काळ खाजगी ठिकाणी नोकरी केली. नोकरीत मनासारखा पगार मिळत नसल्यामुळे अनेकदा आर्थिक ओढाताण होत असे. त्यामुळे खाजगी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु करावा असा विचार मनात येत होता. अशातच यावल तालुक्यातील मनूमाता मंदीराचे दर्शन घेण्यासाठी गेले असता यावल रस्त्यावरील आडगांव गांवाजवळ कच्च्या केळी पासून वेफर्स तयार करताना काही जण दिनेशला दिसून आले. उत्सुकता म्हणून त्याने विचारपुस सूरू केली. त्यातील बारकाव्यांची माहिती मिळविली. आणि आपल्या गावाताच हा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
दिनेशने या धंद्यातील काही जाणकार व्यक्तींना भेटून अधिक माहिती जाणून घेतली. व्यावसायिक दृष्टी ठेवत योग्य नियोजन करत वाघळी या गावातच कच्च्या केळीपासुन वेफर्स तयार करून ती विकण्याचा व्यवसाय सुरु केला. ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे दिनेशने आपले सर्व लक्ष या व्यवसायाकडे केंद्रित केले. त्याचा व्यवसाय आता प्रगती कडे झेप घेत आहे. या व्यवसायासाठी लागणारी कच्ची केळी वाघळी व वाघळी लगतच्या गावांमधून खरेदी केली जाते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना देखील त्यांच्या शेत मालाला योग्य मोबदला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी देखील आनंदाने त्याकडे कच्ची केळी विक्रीसाठी आणतात. एक किलो केळीचे साधारण पणे 200 ग्राम वेफर्स तयार होतात. 120 किलो दराने वेफर्स विकली जातात. कच्ची विकत घेण्यापासून ते वेफर्स तयार करून विकण्यापर्यंत येणारा खर्च वजा जाता मिळणारा नफा समाधानकारक मिळत असल्याचे दिनेश आनंदाने सांगतो.
गुणवत्तापूर्ण वेफर्स ग्राहकांच्या पसंतीला उतरल्यामुळे रोज 15 ते 20 किलो वेफर्सची विक्री होते. विक्री वाढल्यामुळे या व्यवसायात मदतीसाठी गावातील आणखी तीन तरूणाना त्याने रोजंदारीवर ठेवले आहे. या व्यवसायामुळे दिनेश पाटील आपला कुटूंबाचा चरितार्थ उत्तमरित्या चालवत आहे. आपल्या या व्यवसायामुळे आणखी तीन लोकांना रोजगार मिळाल्याचे तो अभिमानाने सांगतो.
लेखक - निलेश किसनराव परदेशी
चाळीसगांव. मो. ७५८८६४६७५०
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/30/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...