बिहारमधील सूरजगाव (जि. नालंदा) बनलेय अळिंबी व गांडूळ खताचे गाव
बिहारमधील सूरजपूर गावामध्ये 200 पैकी 140 घरांमध्ये अळिंबीचे, तर 80 घरांमध्ये गांडूळ खताचे उत्पादन घेतले जाते. या गावातील महिलांनी अळिंबी उत्पादनातून आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार हलका केला आहे.
सूरजपूर हे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील 200 कुटुंबांचे छोटेसे गाव. पूर्वी सर्वसाधारण बिहारमधील खेड्यासारखीच आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती असलेले हे गाव. मात्र आज महिलांनी अळिंबी आणि गांडूळ खताच्या छोट्या छोट्या प्रकल्पातून गावांची आर्थिक स्थिती बदलून टाकली आहे. आज या गावामध्ये 200 पैकी 140 घरांमध्ये अळिंबीचे, तर 80 घरामध्ये गांडूळ खताचे उत्पादन घेतले जाते. गावामध्ये 89 बचत गट असून, त्या मार्फत महिलांचे सबलीकरण होत आहे. हे बचत गट कार्यरत ठेवण्यासाठी विषय विशेषज्ञ श्री. कुंदनकुमार, प्रकल्प संचालक सुदामा महातो व ऐ. सी. जैन यांचे विशेष मार्गदर्शन होत असते. कृषी विभागाच्या "आत्मा' या योजनेअंतर्गत महिला बचत गटासाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाते.
घर तेथे अळिंबी
सूरजपूर गावामध्ये तसे म्हटले तर महिलांचेच राज्य आहे. अगदी लहान मुलींपासून तर वयोवृद्ध महिलेपर्यंत सर्वजणी कष्ट करत आपल्या कुटुंबाचा भार उचलत असतात. महिलांच्या बचत गटामध्ये जास्त अळिंबी उत्पादनाची जणू स्पर्धाच लागलेली असते. अळिंबी उत्पादनासाठी विशिष्ट जागा आहे असे नाही. उपलब्ध जागेनुसार अळिंबीचे बेड ठेवलेले आहेत. अगदी पायऱ्यांच्या खाली, पलंगाखाली, हॉलमध्ये एखाद्या छोट्या खोलीत अथवा बेडरूममध्येही अळिंबीचे बेड व्यवस्थितरीत्या ठेवलेले असतात. या विषयी विषयविशेषज्ञ कुंदनकुमार म्हणाले, की प्रत्येकाकडे घरामध्ये जागा कमी असल्याने उपलब्ध जागेचा उपयोग करण्यात येतो. उत्तम प्रतीची अळिंबी उत्पादनासाठी चांगले व्यवस्थापन या महिला योग्य प्रकारे करतात.
बचत गटाद्वारे उघडले प्रगतीचे दार
हा भाग भात उत्पादक असल्याने बहुतेक महिला भात शेतीत काम करतात. या महिलांमध्ये सातत्याने बैठका घेत बचत गटासाठी प्रोत्साहित केले. प्रत्येक गल्लीमध्ये किमान एक बचत गट स्थापण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. सुरवातीला 50 रु. प्रति महिनाप्रमाणे बचतीला सुरवात केली. या बचत गटांना कार्यरत ठेवण्यासाठी ठोस कार्यक्रम देण्याची आवश्यकता होती. हा भाग भातशेतीचा असल्याने भाताचे काड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. पशुखाद्य किंवा कंपोस्ट इतकाच त्याचा उपयोग होत असे. या काडावर अळिंबी चांगल्या प्रकारे उगवू शकते, हे लक्षात घेऊन अळिंबी उत्पादनाचे प्रशिक्षण काही महिलांना दिले. आत्मा योजनेमार्फत त्यांना अळिंबीचे बियाणे (स्पॉंज) मोफत देण्यात आले. तसेच इतरही काही साहित्य मोफत देण्यात आले आणि अळिंबी उत्पादनास सुरवात झाली. बघता बघता केवळ दोनच वर्षांत गावातील 70 टक्के कुटुंब अळिंबीचे उत्पादन घेऊ लागले.
धिंगरी अळिंबी उत्पादनाची प्रक्रिया
- भाताचे किंवा गव्हाचे काड 24 तास स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवतात. नंतर सर्व काड एका बारदान्यावर घेऊन पाणी निथळले जाते.
- 50 ते 60 टक्के कमी झाल्यानंतर हे काड निर्जंतुकीकरणासाठी उकळत्या पाण्यात टाकले जाते. निर्जंतुक झालेल्या काडातील पाणी निथळले जाते.
- काडाचे तापमान कमी झाल्यानंतर विशिष्ट आकाराच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत काडाचे चार ते पाच इंचाचे थर रचले जातात. प्रत्येक थरावर अळिंबीचे बियाणे. म्हणजेच स्पॉंज टाकले जातात. असे पाच ते सहा थर भरून पिशवीचे वरील तोंड बांधून ठेवले जाते.
- बियाणे उगवण्यास सुरवात होऊन पांढऱ्या रंगाची अळिंबी वाढू लागते. तेव्हा प्लॅस्टिकची पिशवी काढून घेतली जाते. त्यावर दिवसातून दोन वेळा पाणी फवारले जाते. 25 ते 30 दिवसांच्या अंतराने मशरूम (अळिंबी) काढण्यास तयार होते.
- एका बेडपासून दोन महिन्यांच्या कालावधीत पाच ते सहा वेळा अळिंबी काढली जाते.
- एका वेळेस 1 ते 1.250 किलो अळिंबी निघते.
- एका बेडपासून 60 दिवसांमध्ये किमान सहा ते सात किलो उत्पादन हमखास निघते.
- ही उत्पादित अळिंबी वाळवली जाते व नंतर त्याची विक्री केली जाते. कधी कधी ताजीच अळिंबी ही विकली जाते.
बटन मशरूम उत्पादनास सुरवात
धिंगरी अळिंबी सोबतच आता बटन अळिंबीच्या उत्पादनास प्रायोगिक तत्त्वावर सुरवात झाली आहे. बटन अळिंबीसाठी प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी ट्रेचा वापर केला जातो. त्याचे माध्यमही वेगळे आहे. ट्रे ठेवण्यासाठी लाकडी रॅकही आहेत. उत्पादनाची प्रक्रिया जवळपास सारखी असली तरी बटन अळिंबीला मागणी जास्त असून दरही थोडा जास्त मिळतो.
अळिंबी उत्पादनाचे अर्थशास्त्र
- बिहारमधील नालंदा हे प्राचीन विद्यापीठ व पर्यटनस्थळ 12 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच गया हे शहरही जवळ असल्याने अळिंबीला मोठी मागणी असते. या ठिकाणचे व्यापारी स्वतः गावात येऊन अळिंबी खरेदी करतात. तर काहीजण स्वतः शहरामध्ये ठराविक हॉटेलला आपला माल पुरवतात.
- तापमानानुसार धिंगरी अळिंबीचे उत्पादन हे ऑक्टोबर ते मार्च, बटन अळिंबीचे उत्पादन डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे येते. मिल्की व्हाइट या अळिंबीचे उन्हाळ्यामध्ये मे ते जुलै कालावधीत उत्पादन घेता येते.
- पर्यटकांच्या हंगामामध्ये प्रति किलो 100 ते 125 रु. दर मिळत असला तरी सरासरी 60 रुपये दर मिळून जातो. प्रत्येक कुटुंबात किमान 50 बेड लावलेले आहेत. एका बेडपासून सरासरी दोन ते तीन किलो अळिंबी मिळते. 50 बेडपासून सात हजार पाचशे रु. प्रत्येक दोन महिन्यांत मिळतात. उत्पादन खर्च प्रति बेड 25 रुपये प्रमाणे 1250 रुपये होतो.
- गावात एकूण 10 हजार अळिंबीचे बेड आहेत. त्यापासून किमान 15 लाख रु.चे उत्पन्न प्रत्येक दोन महिन्याला मिळते. त्यासाठी दोन लाख 50 हजार रु. खर्च येतो. सर्व खर्च वजा जाता 12 लाख 50 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न प्रति दोन महिने गावामध्ये येते.
गांडूळ खतनिर्मिती केंद्र
गांडूळ खतनिर्मिती हे या गावचे आणखी एक वैशिष्ट्य. गावातील 40 टक्के कुटुंबाकडे गांडूळ खताचे उत्पादन घेतले जाते. घराच्या समोरच अथवा शेतात अनेक ठिकाणी गांडूळ खताचे बेड केलेले आहेत. अनेक जणांनी विटांचे पक्के हौद बांधले आहेत, तर काही जणांनी टेट्रा पॉलिथिनच्या व्हर्मीबेडचा वापर केला आहे. अळिंबी उत्पादनानंतर शिल्लक राहिलेले भाताचे काडाचे थर गांडूळ खतासाठी वापरले जातात. प्रत्येक कुटुंबाकडे किमान एक तरी दुधाळ जनावर असल्याने शेणही उपलब्ध असते. हे शेण गांडूळ खतासाठी वापरले जाते. टेट्रा पॉलिथिनचे 90 बेड येथे असून वार्षिक साधारणतः 300 टन गांडूळ खताची निर्मिती केली जाते. खताचा वापर स्वतःच्या शेतीसाठी केला जातो.
विस्तारासाठी प्रशिक्षणार्थी झाल्या प्रशिक्षक
- नालंदा कृषी विभागामार्फत महिलांचे बचत गट स्थापन करण्यात आले. बचत गटांना सतत कार्यरत ठेवण्यासाठी मशरूम उत्पादन व विक्रीसाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. महिलांना "आत्मा' योजनेच्या माध्यमातून अळिंबी प्रशिक्षण दिले गेले. मशरूम उत्पादनासाठी लागणारे साहित्य उदा. स्पॉंज तसेच फवारणी पंपाचा पुरवठाही करण्यात आला.
- गांडूळ खतनिर्मितीसाठी अनुदान देण्यात आले.
- भात व गहू शेतीमध्ये एसआरआय या सुधारित पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पद्धतीनेच परिसरामध्ये भाताची व काही प्रमाणात गव्हाची लागवड केली जाते. या पद्धतीने लागवड करण्यामध्ये महिला शिकल्या असून, अनेक ठिकाणी त्यांनाच प्रशिक्षण देण्यासाठी नेले जाते. त्याही आत्मविश्वासाने लोकांना प्रशिक्षण देतात.
संपर्क - श्री. कुंदनकुमार, नालंदा, बिहार मो. 09973021279
सुदामा महंतो, कृषी विभाग, नालंदा 09431818731
अळिंबी उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी
अळिंबी प्रकल्प, कृषी महाविद्यालय, पुणे. संपर्क - 020-25537033 किंवा 25537038 विस्तारित क्र. 220
(लेखक औरंगाबाद येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ : अॅग्रोवन