मेंढ्यांच्या संगोपनाच्या पद्धती देशकाल परिस्थिती, मेंढ्यांची संख्या, जलवायुमान, चराऊ रानांची उपलब्धता यांवर अवलंबून असतात. चराऊ रानातील खुरटे गवत, लहान लुसलुशीत रसाळ तण, वाळवंटी प्रदेशात उपलब्ध होणाऱ्या कोवळ्या वनस्पती, डोंगर पठारावरील व पर्वतराजींचया उतारावर उगवणारे उंच न वाढणारे गवत, बाभळीच्या जातीच्या झाडांच्या शेंगा यांवर मेंढ्या आपली उपजीविका चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यांच्या खाद्यात १० ते १५% प्रथिनांची जरूरी असते व ती अशा चाऱ्यामधून मिळते. प्रजननासाठी व मांसोत्पादनासाठी वापरात आणावयाच्या मेंढ्यांव्यतिरिक्त इतरांना नेहमीकरिता खुराक देण्याची जरूरी नसते. मेंढ्यांच्या खुराकाला भरडा म्हणतात. मका, हरभरा, ज्वारी ही भरडलेली धान्ये, गव्हाचा भुस्सा, भुईमुगाची पेंड यांतील उपलब्ध खाद्यपदार्थ योग्य प्रमाणात मिसळून भरडा तयार करतात. मांसोत्पादनासाठी पाळलेल्या कोकरांना मेंढीला पिणे बंद झाल्यावर भरडा सुरू करतात. धान्य २ भाग, गव्हाचा भुस्सा१ भाग, पेंड १ भाग यांचे मिश्रण १०० ते ४५० ग्रॅ. वयाप्रमाणे देतात. कोकराला रोज ५ ते ७ ग्रॅ. मीठ देण्याची जरूरी असते. गाभण मेंढीला रोजी २०० ते २५० ग्रॅ. भरडा गर्भपोषणासाठी देणे जरूर आहे. प्रजननासाठी वापरल्या जाणाऱ्या मेंढ्यांस रोजी २०० ते ४५० ग्रॅ. भरडा देतात. कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, तांबे व कोबाल्ट या खनिज द्रव्यांची जरूरी असते व चाऱ्यातून ही उपलब्ध होतात. खाद्यामध्ये अस्थिपिष्टाचा समावेश केल्यास काही खनिजे उपलब्ध होऊ शकतात. मेढ्यांना अ, ड, ई या जीवनसत्त्वांची जरूरी असते व काही वेळा ती खाद्यातून पुरवावी लागतात. ‘अ’ जीवनसत्त्व हिरव्या चाऱ्यातून व ‘ड’ जीवनसत्त्व सूर्यप्रकाशातून मिळते. ब व क जीवनसत्त्वे मेंढ्या आपल्या शरीरात तयार करू शकतात. एका मेंढीला रोज ७ लिटर पाणी लागते. चरण्याच्या जागेपासून पाणी पिण्यासाठी त्यांना हिवाळ्यात ४ ते ५ किमी. व उन्हाळ्यात ३किमी.पेक्षा जास्त चालावे लागू नये, अशी व्यवस्था असणे जरूर असते. बर्फ व अती पाऊस असलेल्या किंवा कडक थंडीच्या प्रदेशातून तात्पुरते स्थलांतर करून मेंढ्यांचे कळप फिरते ठेवून त्यांचे पोषण करणे ही बऱ्याच देशांमधून रूढ असलेली संगोपन पद्धती आहे.
कोकरू जन्मल्यावर मेंढीने त्याला चाटल्यावर ते कोरडे होऊन १ ते २ तासांत उठून मेंढीला पिऊ लागते. व्याल्यानंतर २ ते ४ तासांमध्ये वार टाकली जाते. कोकराला चीक पिऊ देणे आवश्यक असते. मेंढीमध्ये मातृभाव कमी असतो त्यामुळे मेंढपाळाला कोकराची काळजी घेणे आवश्यक असते. मेंढी नीट पाजते किंवा नाही याकडे लक्ष पुरवावे लागते. कोकरू ४ ते ४.५ महिन्यांचे होईपर्यंत मेंढीला पिते. जरी २ ते ३ आठवड्यांचे झाल्यावर चरण्याला सुरुवात केली, तरी ५ ते ८ आठवड्यांचे होईपर्यंत ते फारसे खाद्य खाऊ शकत नाही. याच वेळी त्याची लोकर कातरण्याइतकी लांब होते. पहिल्या कातरणीच्या लोकरीला जावळी लोकर म्हणतात. यापुढे वर्षातून एकदा, दोनदा व काही जातींमध्ये तीन वेळा कातरणी करतात. हात कातरणीने एक मनुष्य एका दिवसात ४० ते ६० मेंढ्यांची लोकर कातरू शकतो, तर यांत्रिक कात्रीने तो २०० ते २५० मेंढ्यांची लोकर कातरतो.
अलीकडे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांना उंदराच्या लाळ ग्रंथीमधून बाह्यत्वचा वृद्धिकारक प्रथिनाचे नि:सारण करून त्याचे मेंढीला अंतःक्षेपण (इंजेक्शन) केल्यावर लोकर गळून नुसत्या हाताने ओढून ती पूर्णपणे काढता येते, असे दिसून आले आहे. जैव कातरण पद्धती अद्याप प्रयोगावस्थेत आहे.
मोठ्या प्रमाणावर मेंढ्या पाळणाऱ्या काही पुढारलेल्या देशांतही मेंढ्या उघड्यावरच राहतात. अती थंडीवाऱ्यापासून संरक्षण होइल एवढाच निवारा केव्हा केव्हा उपलब्ध करून देतात. शीत कटिबंधात मात्र हिवाळ्यातील कड थंडीपासून बचाव होण्यासाठी बंदिस्त मेंढवाडे उभारतात व तिथेच आधी साठविलेले वाळलेले गवत व मुरघास यांवर त्यांचे पोषण करतात. अगदी अलीकडे कडक हिवाळ्यात भाजीपाला उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या पॉलिथिनाच्या पादपगृहाच्या (तापमान व हवेतील आर्द्रता यांचे नियंत्रण करणाऱ्या रचनेच्या) धर्तीवर बोगद्याच्या आकाराची पॉलिथिनाची घरे मेंढ्यांसाठी बनविण्यात आली आहेत.
भारतामध्ये मेंढी पालनाचा धंदा बहुतांशी भटक्या जमातींचे धनगर लोक करतात. ते सर्वसाधारणपणे ४० ते ६० मेंढ्यांचे कळप पाळतात. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या थंड व डोंगराळ प्रदेशातील मेंढपाल उन्हाळ्यात आपल्या मेंढ्या हिमालयातील २,५०० ते ४,००० मी. उंचीवरील शिखरपठारावर चराईसाठी नेतात. बर्फ जसजसा वितळतो तसतसा तेथील जमिनीवर चांगला पौष्टिक चारा उगवतो. हिवाळ्यात सपाटीवरील प्रदेशात परतून तेथील चराऊ रानावर मेंढ्यांची उपजीविका करतात. सपाट प्रदेशातील मेंढपाळ शेतामध्ये पिके असतात त्या वेळी जवळपासच्या डोंगरावरील खुरटे गवत व तण यांवर आपल्या मेंढ्या पोसतात. पिके निघाल्यावर शेतातील उरलेसुरले खुंट, तण व गवत खाण्यासाठी शेतातून मेंढ्यांचा मुक्काम करीत फिरत राहतात. शेतात मुक्काम असतो तेव्हा तेथे लेंडीखत आपोआप पडते. यालात शेतात ‘मेंढ्या बसविणे’ असे म्हणतात. महाराष्ट्रात ही प्रथा सर्वत्र आढळते व याबद्दल मेंढपाळांना मोबदला मिळतो. मेंढ्या पाळणाऱ्या भटक्या जमातीच्या धनगर लोकांना या धंद्याच्या विकासासाठी साहाय्य देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मेष विकास महामंडळ १९७९ मध्ये स्थापन केले आहे.
विदेशी मेंढ्यांच्या बाबतीत त्यांचे वयात येणे त्या त्या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या मेंढ्यांच्या सरासरी वजनाच्या ४० ते ६०% वजन होण्यावर अवलंबून आहे, वयाशी त्याचा संबंध फारसा नसावा; पण सर्वसाधारणपणे या मेंढ्या ५ ते १० महिन्यांच्या झाल्यावर वयात येतात. प्रथम माजावर येतात. तथापि मेंढी २ वर्षांची झाल्यावर व मेंढा १८ ते २० महिन्यांचा झाल्यावरच प्रजननासाठी वापरतात.
मेंढ्यांचे प्रजनन मोसमी असते. मोसमाच्या सुरुवातीच्या दिवसांत कळपामध्ये वळू मेंढा सोडल्यास व दोन आठवडे आधी मेंढ्यांच्या खाण्यामध्ये खुराक सुरू केल्यास त्या लवकर माजावर येतात. याला इंग्रजीमध्ये ‘फ्लशिंग’ म्हणतात. फ्लशिंगसाठी २०० ते २५० ग्रॅ. मका, जव व ज्वारी यांपैकी एक धान्य दिल्यास चालते. याशिवाय प्रगत देशांमध्ये प्रोजेस्टेरॉनासारख्या स्टेरॉइड औषधांचा वापर करून मेंढ्यांना विशिष्ट वेळी माजावर आणण्यात येते व कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीने अनेक मेंढ्या एकाच वेळी गाभण राहतील अशी व्यवस्था करतात. यामुळे एकाच वयाच्या कोकरांचे मोठाले कळप तयार झाल्याकारणाने त्यांचे संगोपन व व्यवस्थापन सोईचे आणि किफायतशीर होते. प्रजननासाठी उपयोगात आणावयाच्या माद्यांना भरपूर दूध असणे हे कोकरांचे पोषण होण्याच्या दृष्टीने जरूरीचे असते. भारतामध्ये मेंढ्या माजावर येण्याचे तीन मोसम आहेत. उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्याच्या सुरुवातीस (जून-जुलै) ६० ते ८०%, उन्हाळ्यात (मार्च-एप्रिल) १५ ते २०% आणि हिवाळ्यात (ऑक्टोबर-नोव्हेंबर) उरलेल्या माद्या माजावर येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीलस माजावर आलेल्या मेंढ्या गाभण राहून ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये वितात. या वेळी माद्यांना चराऊ रानात भरपूर चारा उपलब्ध असल्याने दूध भरपूर येऊन कोकरांचे पोषण चांगले होते.
मेंढीचा ऋतुकाल २० ते ४० तास (सरासरीने ३० तास) राहतो. ऋतुकालाच्या अखेरीला अंडमोचन (अंडपुटक फुटून त्यातील पक्व अंडे बाहेर पडण्याची क्रिया) होते. ऋतुमान १७ ते १९ दिवसांचे असते व गर्भावधी १४२ ते १५२ दिवसांचा असतो. बहुधा एका वेळी एकच कोकरू जन्मते; परंतु काही जातींत जुळी व क्वचित तिळी होऊ शकतात. पाच ते सहा कोकरे जन्मल्याची नोंद आहे. कॉमनवेल्थ सांयटिफिक अँड इंडिस्ट्रियल रिसर्च या संस्थेमध्ये झालेल्या संशोधनातून ‘फेकंडीन’ नावाचे रसायन शोधून काढण्यात आले आहे. याचे अंतःक्षेपण केल्यास अंडमोचनाच्या वेळी अनेक अंड्यांचे मोचन होऊन जुळी होण्याचे प्रमाण वाढून २०% अधिक कोकरांची पैदास झाल्याचे दिसून आले आहे. विण्याच्या वेळी मेंढ्यांना निवारा व आडोसा देणे जरूरीचे असते. सहसा मेंढपाळाने मदत करण्याची जरूरी पडत नाही. व्याल्यानंतर एक ते दोन दिवसांत मेंढी पुन्हा माजावर येते; पण यावेळी अंडमोचन होत नाही. माजावर आलेली मेंढी मेंढ्याच्या मदतीशिवाय ओळखणे कठीण असते. मेंढा कळपात सोडल्यावर वासामुळे तो ती ओळखू शकतो. कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीमध्ये मेंढ्याच्या साहाय्यानेच माजावर आलेली मेंढी ओळखून वीर्यसेचन करण्यात येते. ऑस्ट्रेलिया, रशिया, इंग्लंड इ. पुढारलेल्या देशांत कृत्रिम वीर्यसेचन पद्धत मोठ्या प्रमाणावर अवलंबिली जाते. भारतामध्ये मेंढ्यांच्या बाबतीत ही पद्धत अद्याप काही प्रस्थापित प्रजनन केंद्रापुरतीच मर्यादित आहे; तथापि हळूहळू या पद्धतीचा प्रसार होऊ लागला आहे. नैसर्गिक पद्धतीमध्ये एक मेंढा ३० ते ४० माद्यांसाठी पाळण्याची पद्धत आहे. मेंढा प्रजननक्षम आहे किंवा नाही हे ओळखणे सोपे नाही. यासाठी त्याने संयोग केलेल्या माद्यांवर लक्ष ठेवूनच ते समजू शकते. मोठ्या कळपामध्ये कोणत्या मेंढ्याने कोणत्या मेंढीशी संयोग केला हे समजण्यासाठी मेंढ्याच्या छातीच्या पुढील भागास ओला रंग लावतात. मेंढा दर दिवशी ५.५ अब्ज शुक्राणूंचे उत्पादन करू शकतो. त्यांच्या संयोगक्षमतेमध्ये बराच फरक आढळून येतो. काही मेंढे १० तासांहून एकदा संयोग करू शकतात, तर काही प्रत्येक तासाला करू शकतात. चांगल्या प्रतीच्या रेताच्या प्रत्येक मिलि. मध्ये २ अब्ज शुक्राणू असतात.
अलीकडे बनविलेल्या श्राव्यातील उपकरणाने [→श्राव्यातील ध्वनिकी] मेंढी गाभण आहे किंवा नाही हे तपासाण्याची सोय झाली आहे. या उपकरणाच्या साहाय्याने ६० दिवसांची गाभण मेंढी १००% अचूक ओळखता येते. तसेच ⇨हॉर्मोनांच्या साहाय्याने गर्भारपणाचे निदान करण्याची पद्धत व्यवहारामध्ये येत आहे आणि यामध्ये १८ दिवसांची गाभण मेंढी ओळखता येते.
जननिक अभियांत्रिकीतील [→रेणवीय जीवविज्ञान] कौशल्याचा वापर करून अगदी अलीकडे भ्रूण हाताळण्याचे तंत्र साध्य केले गेले आहे. जर्मन प्रजासत्ताक संघ राज्यातील गीसेन विद्यापीठामध्ये माइनेके टिलमन या स्त्री पशुवैद्यांनी अतिसूक्ष्म शस्त्रक्रियेने शेळीच्या निषेचित (फलित) अंड्यामधील कोशिकांची (पेशीची) मेंढीच्या निषेचित अंड्यातील कोशिकांशी जुळणी करून त्या भ्रूणाचे एका मेरिना मेंढीच्या गर्भाशयात प्रतिरोपण केले. गर्भाची पूर्ण वाढ होऊन मेंढीप्रमाणे शिंगे व हनुवटीखाली शेळीप्रमाणे दाढी असलेला चेहरा, तसेच काही भागावर शेळीप्रमाणे दाढी असलेला चेहरा, तसेच काही भागावर शेळीप्रमाणे केस व काही भागावर मेंढीप्रमाणे लोकर असलेले करडू/ कोकरू जन्माला आले. हा प्राणी खऱ्या अर्थाने खेचरासारखा संकरित प्राणी नव्हे. खेचराच्या प्रत्येक कोशिकेमध्ये गाढव व घोडा यांचे जीन (आनुवंशिक लक्षणांची एकके) असतात. या प्राण्याच्या मात्र काही कोशिका मेंढीच्या व काही शेळीच्या असतात. असा हा विचित्रोतकी (एकापेक्षा अधिक निषेचित अंड्यांपासून निर्माण झालेल्या कोशिकांचे मिश्रण असलेला) प्राणी निर्माण करण्याचा जगातील पहिला यशस्वी प्रयत्न आहे. केंब्रिज येथील इन्स्टिटयूट ऑफ ॲनिमल फिजिऑलॉजी या संस्थेतील शास्त्रज्ञांच्या अशाच प्रयोगातून जन्मलेला विचित्रोतकी फेब्रुवारी १९८४ मध्ये १८ महिन्यांचा झालेला होता. एका अर्थाने या प्राण्याला दोन मातापिता असतात, हा विशेष होय. मेंढी आणि शेळी यांच्या नावातील इंग्रजी अक्षरांवरून या प्राण्याला जीप (Geep) असे संबोधले आहे.
मेंढ्यांपासून लोकर, मांस, कातडी व खत हे पदार्थ मुख्यत्वे मिळतात. मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीसंबंधीची माहिती ‘लोकर’ या नोंदीत दिलेली आहे. लोकरीच्या जोडीला त्यांच्यापासून मांसही मिळते. साधारणपणे जास्त लोकर देणाऱ्या मेंढ्यांत मांसाचे प्रमाण कमी, तर कमी लोकर देणाऱ्यांमध्ये ते जास्त असते. भारतातील निरनिराळ्या राज्यांतील खाटिकखान्यात सु. पन्नास लाख मेंढ्यांची दर वर्षी कत्तल होते व त्यांपासून सु. १.५८ लाख टन मांस मिळते. [→मांस उद्योग]. भारतातील मेंढ्यांच्या कातड्याचे उत्पादन दर वर्षी सु १.५५ कोटी कातडी इतके आहे. यांपैकी सु. चौदा लाख कातडी राजस्थानातून मिळतात. त्यांपासून पाकिटे, हातपिशव्या, बूट, वाद्ये इ. बनवितात. [→चर्मोद्योग]. शेळ्यांच्या तुलनेत मेंढ्यापासून दूध जवळजवळ मिळत नाही, असे म्हटले तरी चालेल, काश्मीरमधील पूंछ, पंजाबातील लोही आणि उत्तर गुजरातमधील कच्छी मेंढ्यांपासून इतर मेंढ्यांच्या मानाने खूपच जास्त प्रमाणात दूध मिळते. मेंढीपासून लेंडी खत व मूत्र खत मिळते. एक मेंढी वर्षाला सु. ०.२५ टन खत देते. याकरिता शेतामध्ये मेंढ्या बसविण्याची पद्धत भारतभर रूढ आहे [→खत].
---------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/22/2020
हे सजीवांचे एक प्रमुख लक्षण आहे. मर्यादित आयुष्याम...
गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवर अवलंबून...
काही सजीवांमध्ये पुं.- आणि स्त्री-जननेंद्रिये एकाच...
वंश पुढे नेण्यासाठी जिवांना जन्म देणे (जनन किंवा प...