वंश पुढे नेण्यासाठी जिवांना जन्म देणे (जनन किंवा पुनरुत्पादन) हे सगळयांच प्राण्यांत आणि वनस्पतींत दिसून येते. वंशवाढीचे प्रकार खूप आहेत. अगदी एकपेशीय जिवांमध्ये त्याच एका पेशीचे दोन भाग होऊन ते वेगवेगळे वाढतात. उत्क्रांतीत जास्त प्रगत पक्षी, मासे, सरपटणारे प्राणी, गाईगुरे, माणूस वगैरेंमध्ये नर-मादी एकत्र आल्याने नवीन जीव तयार होतो. काही प्रजातीत हा जीव अंडयांमध्ये आधी वाढून नंतर बाहेर येतो. सस्तन प्राण्यांमध्ये तो मादीच्या पोटात वाढून जन्माला येतो.
नवीन जीव तयार होण्याची माहिती थोडक्यात अशी. स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन स्त्रीबीजग्रंथी असतात. मुलगी वयात आल्यानंतर दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. कोठल्यातरी एका स्त्रीबीजग्रंथीतून एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते गर्भनलिकेत येते. स्त्रीबीज गर्भनलिकेत (बीजनलिकेत) असताना जर पुरुषाशी लैंगिक समागम झाला तर पुरुषबीज स्त्रीबीजाशी जुळून गर्भधारणा होते. याआधी आपण शिकल्याप्रमाणे गर्भपेशींमध्ये निम्मा भाग स्त्रीचा व निम्मा भाग पुरुषाचा असतो. मुलगा होणार की मुलगी होणार हे पुरुषाकडून 'वाय'(Y) येणार किंवा एक्स (X) यावरच अवलंबून असते. बाकीचे बहुतेक गुणधर्म दोघांकडून येतात. गर्भधारणा झाल्यावर वेगाने पेशींचे विभाजन होते. मासिक पाळी बंद होते. गर्भाशयात गर्भ रुजून वार, नाळ तयार होतात. पुढे हळूहळू गर्भाचा विकास व वाढ होते.
मात्र, स्त्रीबीज गर्भनलिकेत आल्यानंतर एक-दोन दिवसांत पुरुषाकडून शुक्रपेशी मिळाली नाही तर हे स्त्रीबीज मरते. वेळेत गर्भधारणा न झाल्यामुळे गर्भाशयात तयार झालेले आतील मऊ आवरण दहा बारा दिवसानंतर गळून पडते व रक्तस्राव होतो. यालाच आपण मासिक पाळी (मासिक स्राव) म्हणतो. या पाळीनंतर दहा बारा दिवसांनंतरगर्भाशयात परत नवीन आवरण तयार होते, म्हणजेच गर्भधारणेची तयारी होते.
हे चक्र स्त्रीच्या पंधराव्या वर्षापासून 45-50 या वयापर्यंत चालू असते. प्रथम रजोदर्शन (पाळी येणे) होते तेव्हा मुलगी वयात आली किंवा 'नहाण' आले असे आपण म्हणतो. 45-50 वयात पाळी थांबली की आपण त्याला 'पाळी गेली' असे म्हणतो. यानंतर स्त्रीबीज तयार होत नसल्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही.
पुरुषांच्या अंडकोषात पंधरा-सोळा वर्षे वयानंतर पुरेशा पुरुषबीजपेशी निर्माण होतात. पुरुषाच्या जननसंस्थेतील या शुक्रपेशी आणि काही द्रव मिळून वीर्य तयार होते. स्त्री-पुरुष संबंधाच्या वेळी सुमारे दोन-तीन मि.ली. वीर्य बाहेर फेकले जाते. त्यात लक्षावधी शुक्रपेशी असतात. शुक्रपेशींना सूक्ष्म शेपटयांमुळे 'हालचाल' करता येते. ज्या वीर्य पेशींची हालचाल कमी किंवा बंद झालेली असते त्याच्याकडून गर्भधारणा होत नाही. यासाठी वीर्याचा नमुना सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासता येतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
स्वत:चे सुख अधिक महत्वाचे की, नव्याने या जगात प्रव...
राज्यातील किशोरवयीन मुला मुलींची संख्या (वय वर्ष...
काही सजीवांमध्ये पुं.- आणि स्त्री-जननेंद्रिये एकाच...
गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवर अवलंबून...