मेंढी हा पोकळ शिंगे असलेला, रवंथ करणारा, समखुरी प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला गणातील बोव्हिडी कुलाच्या कॅप्रिनी या उपकुलातील प्राणी आहे. जगाच्या कृषी अर्थशास्त्रामध्ये ह्याला महत्त्वाचे स्थान आहे. मुख्यत्वे लोकर व मांस आणि काही प्रमाणात दुधाच्या उत्पादनासाठी मेंढ्या पाळल्या जातात. समशीतोष्ण प्रदेशातील कमी पाऊस असलेल्या भागातील जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) मेंढ्यांना अनुकूल असते. उंच डोंगराळ प्रदेशातील खुरटे गवत व रसाळ तण खाऊन मेंढी आपली उपजीविका उत्तम तऱ्हेने करू शकते. आकारमान, वजन, लोकर व शिंगे यांवरून त्यांचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. काही प्रकारांत नर व मादी दोहोंनाही शिंगे असतात. माद्यांची शिंगे नरापेक्षा बहुधा लहान असतात. काहींमध्ये फक्त नरांनाच शिंगे असतात, तर आणखी काही प्रकारांत ती दोघांनाही नसतात. नरांची शिंगे कोणीय असून त्यांवर आडवे कंगोरे असतात; त्यांचा रंग हिरवट किंवा तपकिरी असतो. सकृतदर्शनी काही प्रकारच्या मेंढ्या शेळ्यांसारख्या दिसतात, त्यांच्यातील फरक चटकन लक्षात येत नाही.
इतर सर्व पाळीव प्राण्यांप्रमाणे मेंढी हा प्राणी सुरुवातीस रानटी स्थितीत होता. मानवाने नवाश्म युगामये (इ.स.पू. ९००० ते ८००० वर्षे) इतर प्राण्यांबरोबर मेंढी हा प्राणी माणसाळवला असावा. मध्यपूर्वेपासून ते आयर्लंडमधील दलदलीच्या भागापर्यंतच्या प्रदेशातील मानवाच्या अस्तित्वाच्या इतर खाणाखुणांबरोबर मेंढ्यांची हाडे सापडली आहेत. ॲग्रिकल्चरल ओरिजिन्स अँड डिस्पर्सल्स या ग्रंथामध्ये कार्ल ओसॉयर यांनी मेंढ्यांच्या माणसाळण्याचा काळ माणूस शेती करून राहू लागलेल्या नवाश्म युगातील मानवाच्या काळाशी संबंधित असल्याचे व नैर्ऋत्य आशियामध्ये त्या माणसाळल्या गेल्या असाव्यात, असे प्रतिपादन केले आहे. लिओपोल्ड ॲडॅमट्झ या ऑस्ट्रियन संशोधकांच्या मते वलयाकार (वेढा असलेली) शिंगे असलेल्या माणसाळलेल्या मेंढ्यांची उत्पत्ती पंजाब ते बलुचिस्तान या भागातील उरियल प्रकारातील ओव्हिस विग्नाय या रानटी मेंढ्यापासून झाली असावी. ताम्रयुगामध्ये यूरोपात ओ. एरिस स्टुडेराय हा मेंढ्यांचा जाडजूड वलयाकार शिंगे असलेला नवीन प्रकार अस्तित्वात आला. जे.यू. ड्यूर्स्ट या स्वीडिश आनुवंशिकीशास्त्रज्ञांच्या मतानुसार हा प्रकार सार्डिनियामधील डोंगराळ प्रदेशातील ओ. म्युसिमॉन ह्या रानटी मेंढ्यांपासून उत्पन्न झाला असावा. ओ. म्युसिमॉन मेंढ्यांचा सार्डिनियातील माणसाळलेल्या मेंढ्यांशी फलदायी संयोग होऊ शकतो, हे थोरले प्लीनी (इ.स. २३ ते ७९) यांच्या वेळेपासून माहीत आहे. मेंढ्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आणि पश्चिम आशिया हे समजले जाते. अर्वाचीन पाळीव मेंढ्यांची उत्पत्ती कशी झाली याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नसली, तरी इराण, अफगाणिस्तान व तिबेट येथील उरियल (ओ. विग्नाय), दक्षिण पूर्व यूरोपमधील ओ. म्यूसिमॉन आणि मध्य आशिया या हिमालयाच्या भागातील आर्गली (ओ. ॲमॉन) या रानटी मेंढ्यांपासून झाली असावी, असे दिसते. मेष म्हणजे मेंढा हे अग्नीचे वाहन आहे, असा उल्लेख वैदिक वाङ्मयात अनेक ठिकाणी आहे. यज्ञामध्ये मेंढ्याच्या मांसाचे हवन करण्यात येत असल्याबद्दलचा उल्लेख वैदिक मंत्रामध्ये आढळतो.राजनिघंटु (इ.स. १०७५) या ग्रंथामध्ये मेंढ्याचे मांस थंड व रुचकर पण पचनास जड असते, असे लिहिले आहे. बायबलमध्ये इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा मेंढीचा उल्लेख अधिक ठिकाणी आहे. निरनिराळ्या धर्माच्या पुरातन इतिहासाच्या संदर्भात बळी देण्यासाठी मेंढा या प्राण्याचा उल्लेख सर्वत्र आढळतो. ही बळी देण्याची प्रथा अद्यापही चालू आहे.
मध्ययुगामध्ये मध्यम व लांब धाग्याची लोकर व मांस यांकरिता इंग्लंडमधील मेंढ्या प्रसिद्ध होत्या, तर तलम धाग्याची लोकर असलेल्या मेरिनो मेंढ्याबद्दल स्पेन हा देश विख्यात होता. हे दोन देश मेंढ्यांचे मांस व लोकर या बाबतींत आघाडीवर होते. सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांमध्ये मेंढ्या आयात करण्यात आल्या आणि तेथील जलवायुमान व चराऊ कुरणे यांच्या अनुकूलतेमुळे मेंढीपालनाचा धंदा वाढीस लागला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये मेंढीपालनाचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. याची कारणेही तेथील जलवायुमान आणि चराऊ कुरणांची उपलब्धता हीच होती. तथापि १९५० नंतर अमेरिकेतील मेंढ्यांच्या संख्येत घट होऊ लागली. याचे कारण अधिक किफायतशीर असलेल्या दुग्धोत्पादनाच्या व गुरांच्या मांसोत्पादनाच्या धंद्याकडे तेथील लोकांचे लक्ष गेले, हे होय. तेथे मेंढ्यांची संख्या १९४७ मध्ये५.५ कोटी होती; १९७० मध्ये २.५ कोटींवर आली. याच काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व यूरोपातील यूगोस्लाव्हिया, बल्गेरिया, रूमानिया, पोलंड, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी व पूर्व जर्मनी या देशांमध्ये लोकरीची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने मेंढ्यांच्या प्रजननाकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले. या देशांतील मेंढ्यांपासून मध्यम प्रतीची गालिच्याची लोकर मिळत असे, तर यूगोस्लाव्हिया, रूमानिया, बल्गेरिया व चेकोस्लोव्हाकिया या देशांमधील २५% दुग्धोत्पादन मेंढ्यांपासून मिळत असे. यांतील काही देशांमध्ये शेतीचे एकत्रीकरण करण्यात आले व मेंढीपालन सहकारी पद्धतीने करण्यात येऊ लागले. बल्गेरियातील स्टारा झागॉरा, रूमानियातील तुर्कांना व त्सिगाई, यूगोस्लाव्हियातील झॅकेल इ. स्थानिक जातींशी रशियन ॲस्कानियन, स्टाव्हरोपोल या मेरिनो मेंढ्यांच्या जातींचा संकर करून बल्गेरियामध्ये थ्रॅसियन मेरिनो, रूमानियामध्ये स्पान्सा व पोलंडमध्ये लोविक्का या वार्षिक ५.५ ते ७.५ किग्रॅ. तलम लोकर देणाऱ्या मेंढ्याच्या जाती निर्माण करण्यात आल्या आहेत.
हरिणाप्रमाणे मेंढ्यांच्या डोळ्याच्या खालच्या बाजूस कातड्याखाली एक ग्रंथी असते व तिचा स्त्राव बाहेर येण्यासाठी एक छिद्रअसते. बऱ्याच जातींमध्ये ती अल्पविकसित असते, तर काहींमध्ये ती अस्तित्वातही नसते. खुराच्या बेचक्यात पिशवीसारखी एक ग्रंथी असून तिच्यातून उग्र वास असलेला तेलकट पदार्थ स्त्रवत राहातो. चालताना गवताला किंवा वाटेवरील दगडाला हा स्त्राव लागतो. मेंढ्यांचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्यामुहे स्त्रावाच्या वासावरून आसपासच्या इतर मेंढ्यांची त्यांना चाहूल लागते. काही मेंढ्यांच्या गळ्यावर पुढच्या बाजूस केसांचा झुबका दिसून येतो; पण त्यांना दाढी नसते. शेळ्यांप्रमाणे मेंढ्यांच्या शरीराला उग्र वास येत नाही. मेंढ्यांना वरच्या जबड्यात पुढील बाजूस कृंतक दंत (कुरतडण्याच्या कामी उपयोगी पडणारे पटाशीसारखे दात) नसतात. त्या ठिकाणी उपास्थींचा (कूर्चाचा) जाड पुठ्ठ्यासारखा भाग असतो. खालच्या जबड्यात पुढील बाजूस आठ कृंतक दंत असतात. खालच्या जबड्यातील कृंतक व वरच्या जबड्यातील पुठ्ठ्यासारखा भाग यामध्ये गवत धरून डोक्याला हिसके देऊन ते तोडले जाते. खालच्या व वरच्या जबड्यात प्रत्येक बाजूस सहा सहा दाढा असतात. मेंढ्यांना ओठांची पुष्कळच स्वैर हालचाल करता येत असल्यामुळे हवे तेच नेमके खुडून जमिनीलगत चरता येते. इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांप्रमाणे मेंढ्यांचे पोट चार कप्प्यांचे असते. दुपारचा थोडा विश्रांतीचा वेळ सोडल्यास त्या दिवसभर चरत असतात. त्यांचे जवळ जवळ अर्धे आयुष्य चरण्यात जाते.
मेंढ्याच्या त्वचेची जाडी २ मिमी. असते. व तीत कमीधिक प्रमाणात रंगद्रव्य असते. त्वचेमध्ये धर्म ग्रंथी, त्वक्-स्नेह ग्रंथी (तेलकट पदार्थ स्त्रवणाऱ्या ग्रंथी), लोम व लोकर उगविणारे तंतुपुटक असतात व त्यांची एक विशिष्ट रचना सर्वसाधारणपणे अस्तित्वात असते. जन्माच्या वेळी जे पुटक अस्तित्वात असतात त्यांना मूलपुटक म्हणतात. प्रत्येक पुटकाशी एकेके त्वक्-स्नेह ग्रंथी, धर्म ग्रंथी व अरेखित स्नायू (उभे तंतू असलेला अनैच्छिक स्नायू) संलग्न असतात. दुय्यम पुटक नंतर तयार होतात व त्यांच्याशी फकत एक त्वक्-स्नेह ग्रंथी संलग्न असते. मूलपुटक तीन तीनच्या समूहामध्ये असतात व त्याबरोबर काही दुय्यम तंतुपुटक असतात. हे तंतू निरनिराळ्या जातीनुसार कमी अधिक असतात व त्यांची संख्या द. चौ. सेंमी.मध्ये ७७५ ते ९,३०० असू शकते. बहुतेक मेंढ्यांच्या अंगावर लोकर असते; परंतु काही जातींच्या मेंढ्यांच्या अंगावर आखूड केस असतात, तर आणखी काहींच्या अंगावर लोकर व केस यांचे मिश्रण असते.
लोकरीचा धागा बहुतांशी अविद्राव्य (न विरघळणाऱ्या) ⇨केराटिनाचा बनलेला असतो. धाग्याचा व्यास १० ते ७० मायक्रोमीटर (१मायक्रोमीटर=१०-६ मी) असतो व मेंढ्यांच्या अंगावर एक वर्ष वाढलेल्यसा धाग्याची लांबी २.५ ते १५ सेंमी. किंवा थोडी अधिक असते. धाग्याचा व्यास व लांबी यांचा मेंढ्यांची जात, पोषण व पर्यावरण यांचा अन्योन्य संबंध आहे. धाग्याचा एका सेंमी. लांबीमध्ये १ ते १० किंवा थोड्या अधिक मळसूत्री वळ्या दिसून येतात. या वळ्यांमुळे धाग्याला लवचिकपणा येतो. मेंढ्यांची लोकर जर कापली नाही, तर आयुष्यभर ती ठराविक प्रमाणात वाढत असते.
मेंढ्या जात्याच भित्र्या असतात. त्यातल्या त्यात धीट मेंढीच्या पाठीमागे जाण्याची व कळपात राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते. सामान्यतः त्यांना बुद्धी कमी असते, असे मानले जाते; तथापि हवामानासंबंधीची त्यांना चांगली जाण असते, असे दिसून येते. त्यांची आयुर्मर्यादा ७ ते १०वर्षे असते; पण २० वर्षेपर्यंत जगल्याची उदाहरणे आहेत. सपाटीपेक्षा उंच पठारावर चरणे त्यांना अधिक आवडते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/23/2020
एखाद्या गावाचा इतिहास पूर्णपणे पुसला गेला असला तरी...
इतिहासातील अनेक पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असतात...
पुरंदर गडकिल्याच्या गिरीशिखरावर महाराणी सईबाई व यु...
आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळ...