बटाट्यावरील कीड, रोगांचे नियंत्रण
बटाटा पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, कोळी, तसेच स्पोडेप्टेरा, हेलीकोव्हर्पा, देठ कुरतडणारी अळी, बटाट्यावरील पाकोळी आणि हुमणी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे तपासून, तातडीने नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
मावा
- ही कीड पानांच्या खालच्या बाजूवर राहून रस शोषून घेतात.
- प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने खाली मुरडतात, पिवळी पडून गळून जातात.
- या किडींद्वारा विषाणू व विषाणूजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो.
- मावा किडीच्या शरीरातून चिकट स्राव पानांवर पसरून त्यावर बुरशी वाढते. प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो.
तुडतुडे
- तुडतुडे पानातील शिरेच्या जवळ रस शोषण करतात. त्यामुळे पाने वाकडी होऊन पिवळी पडतात.
- हवेत आर्द्रता जास्त असल्यास या किडीचे प्रमाण वाढते.
फुलकिडे
- प्रौढ, तसेच पिल्ले झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर विशेषतः न उमललेल्या पानात आढळतात.
- फुलकिडे पानांचा पृष्ठभाग खरडून निघणारा अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पानांवरील भागावर पिक्कट पिवळसर हिरवे, तर खालील बाजूस तांबडे चट्टे पडतात.
- नुकसानग्रस्त पाने जाडसर आणि वक्र होतात.
- तीव्र प्रादुर्भावाने झाडांची वाढ खुंटते व कधी कधी झाडे पूर्णपणे वाळतात.
पांढरी माशी
- प्रौढ तसेच पिल्ले पानातील अन्नरस शोषण करतात.
- या किडीच्या शरीरातून चिकट स्राव पानांवर पसरून त्यावर बुरशी वाढते, प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो.
कोळी
- कोळी ही कीड अतिशय सूक्ष्म असून, ती पानांचा पृष्ठभाग खरवडून वर येणारा रस शोषण करतात. त्यामुळे पानावर पांढुरके चट्टे पडतात.
- प्रादुर्भावग्रस्त शेंडे काळपट पडून चकाकतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो.
पाने खाणारी स्पोडोप्टेरा अळी
- अळ्या दिवसा जमिनीत लपून राहतात, रात्रीच्या वेळी बटाटा पिकाची पाने खाऊन फस्त करतात.
- अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.
- काही वेळेस या अळ्या जमिनीत पोसणारे बटाटेदेखील पोखरून खातात. त्यामुळे उत्पादनात घट येते.
देठ कुरतडणारी अळी
- अळी काळपट रंगाची असून, तिला स्पर्श होताच वेटोळे करून मातीत पडते.
- अळी रात्रीच्या वेळी रोपांचे देठ जमिनीजवळ कुरतडून टाकते, कोवळी पाने खाते. त्यामुळे रोपे मोठ्या प्रमाणावर मरतात.
बटाटा पोखरणारी अळी
- अळ्या पानात, देठात तसेच कोवळ्या खोडात शिरून ते पोखरतात.
- जमिनीतील उघड्या पडलेल्या बटाट्यांवर मादी अंडी घालते, अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या बटाट्याच्या डोळ्यातून आत शिरतात व बटाटे पोखरतात.
- अळ्या गराच्या आत किंवा खाली बोगदे पाडतात. त्यांची विष्टा डोळे व अंकुराजवळ दिसते. त्यामुळे बटाट्याचे वजन घटते, प्रतही खराब होते.
हुमणी
- अळी अवस्था ही पिकास अत्यंक हानीकारक आहे.
- अळ्या जमिनीत राहून पोसणाऱ्या बटाट्यांवर, तसेच बटाट्यांच्या मुळांवर आपली उपजीविका करतात. पिकांच्या मुळांचा नाश झाल्यामुळे पीक सुकू लागते व नंतर वाळून जाते.
- प्रादुर्भावग्रस्त बटाटे सडतात.
रोगांचा प्रादुर्भाव
लवकर येणारा करपा
- पीक 5 ते 6 आठवड्यांचे झाल्यावर या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.
- पानांच्या पृष्ठभागावर तांबडे काळसर गोल ठिपके आढळून येतात. कालांतराने ते ठिपके एकमेकांत मिसळून अनियमित आकाराचे काळसर मोठे होतात.
- पाने पिवळी पडतात, झाडांची वाढ खुंटते.
उशिरा येणारा करपा
- रोगाची लक्षणे झाडाच्या खालील पानांवर दिसतात. प्रथम पानांवर फिक्कट तपकिरी रंगाचे व्रण तयार होतात. कालांतराने ते काळपट पडतात. व्रणांची सुरवात पानाच्या टोकांपासून व कडांपासून होते.
- रोगट पानाच्या खालच्या बाजूवर पांढरट बुरशी वाढते. रोगट भाग सडून त्यास उग्र वास येतो. 3) पानाबरोबर खोड आणि बटाट्यांवरही हा रोग दिसून येतो. या रोगामुळे बटाटे सडून दुर्गंध सुटतो.
बांगडी रोग
- झाडाची वाढ खुंटते व कालांतराने पाने पिनळसर, तांबूस होऊन मलूल होतात. एकदम मरतात.
- रोगग्रस्त झाडाचे बटाटे कापल्यास आतील भागात बांगडीसारखी वर्तुळाकार तपकिरी काळसर सूक्ष्म जंतूंची वाढ झालेली दिसते. असे बटाटे दाबल्यास त्यातून दुर्गंधीयुक्त पिवळसर द्रावण बाहेर पडते.
- रोगट बटाट्याचे डोळे काळपट पडतात.
विषाणूजन्य रोग
- बटाट्यावर होणाऱ्या जखमा अथवा रोगट स्पर्शाने पोटॅटो व्हायरस एक्स आणि एम हे रोग होतात.
- मावा, पांढरीमाशी, फुलकिडे या किडींमार्फत पोटॅटो वाय व इतर विषाणूजन्य रोग पसरतात.
बटाटा पिकातील एकात्मिक कीड व रोग नियंत्रण
- निरोगी बटाटा बेणे वापरावे.
- बटाटा बियाणास बीज प्रक्रिया करावी. प्रक्रियेसाठी 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बटाटा बेणे 15 ते 20 मिनिटे बुडवून घ्यावे.
- उगवणीनंतर येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी बटाटे बियाणे लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड (200 एस.एल. 0.04 टक्के) चार मि.लि. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 10 मिनिटे प्रक्रिया करावी.
- लागवडीसाठी योग्य अंतर ठेवावे. (60 सें.मी. बाय 20 सें.मी.)
- रोग प्रतिकारक (कुफरी ज्योती, पुखराज, सूर्या) या जातींची लागवड करावी.
- आठवड्यातून 2 ते 3 दिवसांतून पिकाचे सर्वेक्षण करावे.
- पिकांमध्ये तसेच कडेने सापळा पिके लावावीत.
- रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
- पोकोळी , स्पोडेप्टेरा, देठ कुरतडणारी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी पिकास वेळेवर भर द्यावी.
- कामगंध सापळ्यांचा वापर करावा. उदा. पाकोळी, स्पोडोप्टेरा, देठ कुरतडणारी अळी.
- रस शोषणाऱ्या किडी विषाणुजन्य रोगांचा प्रसार करीत असतात. त्यामुळे पीक उगवणीनंतर झाडांची कोवळी पाने आणि शेंडे यांवर वेळेवर लक्ष ठेवून शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी.
- पिकावर रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी पीक उगवल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव आणि आर्थिक नुकसान पातळीनुसार स्पायरोमायसीफेन (240 एससी) 10 मि.लि.किंवा थायामेथोक्झाम (25 ईसी) 8 मि.लि. किंवा ऍसिटामीप्रीड तीन ग्रॅम किंवा डायमिथोएट (30 टक्के) 15 मि.लि. यांपैकी एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून 15 ते 20 दिवसांच्या अंतराने गरज भासल्यास आलटून पालटून फवारणी करावी.
- बटाट्यावरील अळीवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये एकरी 6 ते 7 पक्षी थांबे उभारावेत.
- पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा आणि देठ कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतात गवताचे लहान लहान ढीग रात्रभर ठेवावेत. आणि सकाळी अळ्यांसह गवताचे ढीग नष्ट करावेत.
- पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा अळींचे अंडीपुंज दिसल्यास नष्ट करावेत.
- पाने पिवळी पडल्यास अथवा पाने जाळीदार धरलेली असल्यास अशा पानांवर अळीपुंज असतात. ते नष्ट करावेत.
- पाने खाणाऱ्या स्पोडेप्टेरा अळीसाठी बुरशीजन्य कीटकनाशक न्यूमोरिया रायली 5 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस (20 इसी) दोन मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 इसी) दोन मि.लि. किंवा लॅम्बडा सायलोथ्रीन (5 इसी) एक मि.लि. यांपैकी एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून 15 ते 20 दिवसांच्या अंतराने गरजेनुसार आलटूनपालटून फवारणी करावी.
- मर रोगाच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरिडी 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- जिवाणुजन्य मर रोगासाठी स्ट्रेप्टामायसीन 20 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पावसामुळे मर रोगाचे प्रमाण वाढल्यास पाण्यात मिसळणारी मॅन्कोझेब भुकटी (75 टक्के )25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
- लवकर येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाण्यात मिसळणारी मॅंकोझेब भुकटी (75 टक्के) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- उशिरा येणाऱ्या करपा रोगासाठी पाण्यात मिसळणारी मॅन्कोझेब भुकटी (75 टक्के) 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड (50 टक्के) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त आढळून आल्यास मेटॅलॅक्झिल (8 टक्के) अधिक मॅन्कोझेब (64 टक्के) हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी.
डॉ. एस. ए. मोरे : 7588955501
डॉ. एस. आर. लोहाटे : 9422071028
( लेखक राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.