गुहा (ता. राहुरी, जि. नगर) - गावात काही भागांत पाणीटंचाईची मोठी समस्या जाणवते. रब्बीत हरभऱ्यासारखे पीक अर्थशास्त्राच्या दृष्टीने फारसे लाभदायक ठरत नव्हते. अशा वेळी कमी पाण्यात रब्बी बटाटा पिकाचा पर्याय गावातील अशोक आंबेकर यांना मिळाला. गेल्या पंधरा वर्षांपासून या पिकात त्यांचा अनुभव तयार झाला आहे. एकरी 11 ते 12 टन उत्पादन ते घेतात. अन्य शेतकऱ्यांनाही या पिकाची प्रेरणा त्यांच्यापासून मिळाली आहे. केवळ पाण्याचे काटेकोर नियोजन हवे हेच आपल्या शेतीचे खरे रहस्य असल्याचे ते मानतात.
आपल्या यशस्वी बटाटा शेतीमागे पाण्याचे नियोजन हेच महत्त्वाचे कारण असल्याचे आंबेकर म्हणतात. पाणीटंचाईच्या भागात केवळ दोन महिन्यांत पाण्याच्या पाच पाळ्यांवर त्यांनी बटाट्याचे उत्पादन वाढवले आहे. केवळ रब्बी हंगामाचा विचार न करता अन्य कोणत्याही हंगामात कोणत्याही पिकात पाण्याच्या नियोजनाला सर्वाधिक महत्त्व दिल्यास शेती यशस्वी होऊ शकते, असेच आंबेकर यांनी आपल्या प्रयोगातून सुचवले आहे.
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात गुहा गाव परिसरात जिथे कॅनॉल आहे, तेथे पाण्याची समस्या जाणवत नाही. मात्र उर्वरित भागात पाण्याची मोठी समस्या जाणवते. भागातील अनेक शेतकरी मका, हरभऱ्यासारखी पिके घेतात. हरभऱ्याला चार ते पाच पाणी देण्याची सोय करावी लागते, तरीही उत्पादन व जमाखर्च विचारात घेता या पिकातून मोठे अर्थार्जन होईलच, याची शाश्वती नाही, असे गावातील अशोक आंबेकर यांचा अनुभव होता. साहजिकच पर्यायी पिकांच्या शोधात ते होते. त्यातून त्यांना बटाटा पिकाचा सक्षम पर्याय मिळाला. त्यांचे एमएबीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. आपले बंधू सुभाष यांच्यासोबत ते गेल्या पंधरा वर्षांपासून बटाट्याची यशस्वी शेती करीत आहेत.
आंबेकर बंधूंनी बटाटा लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे ठरवले. सुरवातीला पिकाच्या लागवडीविषयी काही माहिती नव्हती. मात्र अन्य शेतकऱ्यांकडून माहिती घेत सुरवात केली. उत्पादन खर्च, पाणी, पीक कालावधी यांचा विचार करता हे पीक उत्पादनक्षम वाटले. यातून पुढील वर्षी क्षेत्र वाढविण्याचे ठरविले. अशा रितीने अलीकडील काळात एक एकर ते अडीच एकरांपर्यंत पाण्याची उपलब्धता पाहून ते क्षेत्राचे नियोजन करतात.
लागवड कालावधी- लागवड प्रामुख्याने थंडीस सुरवात झाल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर किवा नोव्हेंबरमध्ये केली जाते. त्यासाठी मंचर (जि. पुणे) येथून बटाटा बियाणे पारखून आणले जाते. वाणांची माहिती घेऊन कालावधीप्रमाणे लागवडीची वेळ साधली जाते. बटाट्याला बीजप्रक्रिया करून सरीमध्ये ठेवून त्यावर माती टाकून पाणी दिले जाते.
गुहा परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर ते करतात. एकूण पीक कालावधीत पाण्याच्या पाळ्यांचा अभ्यास त्यांनी केला. पाच पाण्याच्या पाळ्या व कालावधी दोन ते अडीच महिन्यांत भरघोस बटाट्याचे उत्पादन घेतले जाते.
लागवडीवेळेस पहिले पाणी दिले जाते.
दुसऱ्या आठवड्यात खांदणी केली जाते. यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पीक दिसण्यास सुरवात झाल्यानंतर दुसरे पाणी दिले जाते.
या महिन्यात पाण्याच्या तीन पाळ्या प्रत्येक आठवड्यात दिल्या जातात.
अशा रितीने दोन महिन्यांत पाण्याच्या एकूण पाच पाळ्या महत्त्वाच्या ठरतात.
खांदणीच्या वेळेस डीएपी खताचा वापर केला जातो. तिसऱ्या पाण्यावेळी अमोनिअम सल्फेट व पोटॅशचा वापर केला जातो, त्यामुळे बटाट्यास चमक चांगल्या प्रकारे येऊ शकते. शेणखताचाही चांगला वापर करण्यात येतो.
तिसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बटाटा काढणीस सुरवात केली जाते. प्रत्येक दिवशी काढलेला बटाटा दुसऱ्या दिवशी मार्केटला पाठवला जातो. बटाट्याची प्रतवारी सर्वांत महत्त्वाची ठरते, त्यामुळे चांगला दर मिळण्यास मदत होते.
बटाट्याचा उत्पादनखर्च एकरी सुमारे 16 हजार रुपये येतो. मुळा, कोथिंबीर, पालक यासारखी आंतरपिके घेतल्यामुळे उत्पादन खर्च निम्म्यापर्यंत कमी होतो. घरचेच सदस्य काम करीत असल्याने मजुरांची गरज कमी भासते. खर्चातही कपात होते. मागील वर्षी मुळा व कोथिंबिरीतून मागील वर्षी सुमारे पाच ते सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
बटाट्याची शेती अधिकाधिक चांगली व्हावी यासाठी आंबेकर बंधू हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बटाटा पीक तज्ज्ञ डॉ. आनंद सोळंकी यांचे मार्गदर्शन घेतात. अलीकडील वर्षांत त्यांनी एकरी 11 ते 12 टनांपर्यंत बटाट्याची उत्पादकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
बटाट्याची श्रीरामपूर, राहुरी, स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जाते. एकरी सुमारे 16 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. सुमारे तीन महिन्यांत 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. मागील वर्षी त्यांना एकरी 11 टन उत्पादन मिळाले. त्याला मार्केटमध्ये क्विंटलला 1100 रुपये दर मिळाला. दर वर्षी सरासरी 800, 900 रुपये ते त्यापुढे दर मिळतो. आंबेकर यांचा अनुभव लक्षात घेऊन परिसरातील इतर शेतकरी बटाट्याचे पीक घेऊ लागले आहेत.
बटाटाच्या बियाणे खरेदीसाठी मंचर येथे दर वर्षी जावे लागत असल्यामुळे आंबेकर यांचा संपर्क वाढीस लागला. त्यातून एकत्रित बियाणे खरेदी करण्यासाठी त्यांनी शेतकरी गटाची संकल्पना मांडली. त्यातून पुढे त्यांनी योगेश्वर मका व कांदा उत्पादक कृषी समूह शेतकरी गटाची 2011 मध्ये स्थापना केली. गटामध्ये प्रामुख्याने वीस शेतकरी आहेत. गटाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होण्यास अधिक मदत झाली आहे. त्यातून प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव लक्षात घेऊन लागवड तंत्रामध्ये बदल करणे शक्य झाले आहे. कमी पाण्याचा वापर करून अधिक उत्पादन घेणे शक्य होत आहे. अन्य पारंपरिक पिकांना पर्यायी पीक म्हणून भागात बटाटा पिकाला महत्त्व येऊ लागले आहे, त्यामुळे गावात बटाट्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे.
अशोक आंबेकर- 9657632723
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...