महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथील सुनील बबनराव पाटील यांनी बटाट्याच्या करार शेतीतून आपली प्रगती साधली आहे. सुमारे 70 ते 80 दिवसांत तयार होणाऱ्या बटाट्यास बांधीव दर असल्याने "पेमेंट' वेळीच हाती मिळते. उसात हे आंतरपीक असल्याने उसाचे उत्पन्न हे बोनस ठरते.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव दुष्काळी तालुका आहे; परंतु मोठमोठ्या सिंचन योजनांचे पाणी सर्वदूर फिरल्याने हा भाग बऱ्यापैकी ओलिताखाली आला आहे. येथील जिद्दी शेतकऱ्यांनी कष्टाला कल्पकतेची जोड दिल्याने ते शेतीत यशस्वी होऊ लागले आहेत. यापैकीच एक सुनील पाटील. त्यांची वडिलोपार्जित 15 एकर शेती. सिंचन योजनांचे पाणी आल्याने 2005 - 06 पासून शेतीकडे त्यांनी अधिक लक्ष द्यायला सुरवात केली. पूर्वी पोल्ट्री व्यवसायही ते सांभाळायचे.त्यांची कांदा त्याचबरोबर द्राक्षबागही होती.
कडेगाव तालुक्यात बटाटा चिप्स निर्मितीमधील खासगी कंपनी शेतकऱ्यांना करार शेतीसाठी प्रोत्साहित करीत होती. अनेक शेतकरी त्याकडे वळलेही होते. गावोगावी संबंधित कंपनीचे "फिल्ड ऑफिसर' शेतकऱ्यांना याबाबत सुचवित होते. त्यातून 2010 मध्ये सुनील या शेतीकडे वळले. त्यांनी दोन एकरांवर बटाट्याची लागवड केली. पहिल्याच वर्षी एकरी नऊ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. सुमारे 75 ते 80 दिवसांत बटाटा काढणीयोग्य झाला. उत्कृष्ट प्रकारचा बटाटा तयार झाला. कंपनीने ठरलेल्या दराप्रमाणे तो खरेदी केला. या करार शेतीत आपण यशस्वी होऊ शकतो, असा सुनील यांना विश्वास आला.
सुनील यांनी दर वर्षी बटाटा क्षेत्र वाढवित नेले. वर्षाला चार ते पाच एकरांवर हे पीक होऊ लागले. या वर्षी तब्बल 11 एकरांवर त्यांनी हे पीक घेतले आहे. लागवड व्यवस्थापनाबाबत कंपनीचे अधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
कृषी विभागाने पुढाकार घेऊन चिप्सनिर्मिती कंपनी व शेतकरी यांच्याशी संवाद घडवून आणला. शेतकऱ्यांना करार-शेतीबाबत विश्वास दिला. त्यामुळे तालुक्यातील हिंगणगाव खुर्द, हिंगणगाव बुद्रुक, नेवरी, येतगाव, खेराडे वांही, खेराडे विटा, चिखली, अमरापूर, येडे, उपाळेमायणी या गावांतील मोठ्या प्रमाणात शेतकरी बटाटा करार शेतीकडे वळले आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी एन. टी. पिंजारी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
सुनील सांगतात, की मुख्यतः खरिपात आडसाली उसातच आंतरपीक म्हणून मी बटाटा पीक घेतो. लागवडीआधी चार टन कंपोस्ट विस्कटले जाते. एक जुलै ते ऑगस्टपर्यंत लागवड केली जाते. साडेचार फुटांची सरी सोडून बेड तयार केले जातात. गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूला दोन बियाण्यामध्ये सहा ते सात इंच अंतर ठेवत लागवड केली जाते.
सुनील यांना उसात आंतरपीक बटाट्यापासून एकरी आठ ते नऊ टन उत्पादन मिळते. ते म्हणाले, की केवळ बटाटा मुख्य पीक ठेवल्यास हे उत्पादन 12 टनांपर्यंतही जाते. जसे उत्पादन घ्याल त्या पद्धतीने बटाटा शेतीचा एकरी खर्च 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत जातो. संबंधित कंपनीने मला मागील वर्षी बांधीव दर किलोला 12 रुपये दिला, प्रत्यक्षात बाजारातील स्थितीनुसार हा दर 21 रुपये मिळाला. यंदा 14 रुपये बांधीव दर असताना प्रत्यक्षात तो 30 रूपये मिळाला. भुईमुग, सोयाबीनपेक्षा हे आंतरपीक परवडते. या पिकाचा बेवडही चांगला असल्याचे ते म्हणतात.
बटाटा चिप्सनिर्मिती करणारी कंपनी शेतकऱ्यांना बटाटा लागवडीसाठी प्रोत्साहित करते. क्रेडिटवर बियाणेपुरवठा करते. प्रति किलो बांधीव दर निश्चित केला जातो. 100 रुपये मुद्रांकावर करार केला जातो.शेतकऱयांकडून दोन कोरे चेक कंपनी घेते. काढणी झाली की बांधावर येऊन कंपनी माल घेऊन जाते. पेमेंट करताना कोरे चेक शेतकऱ्याला परत केले जातात. बांधीव दरापेक्षा कमी दर दिला जात नाही. बाजारपेठेत बटाट्याचे दर वाढले तर चढ्या भावाने बटाटा शेतकऱ्याकडून खरेदी केला जातो. या वर्षी शेतकऱ्यांना प्रति किलो 25 ते 32 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
कडेगाव तालुक्यात नेवरी येतगाव, भिलवडी, खेराडेवांगी, हिंगणगाव खुर्द, बुद्रुक, येडे, उपाळे या गावांत मोठ्या प्रमाणात बटाट्याची करार-शेती केली जाते. एकरी उत्पादन सुमारे सात ते दहा टनांपर्यंत मिळते. काही शेतकऱ्यांना त्याहून अधिक उत्पादन मिळते. कंपनीबरोबर "बॉंड' (करार) तयार केला की बांधीव दर मिळतो. तो 12 ते 14 रुपये प्रति किलोपर्यंत असतो. बाजारपेठेतील दरांप्रमाणे त्यात बदलही होतो. ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यांना प्रोत्साहनात्मक दर वाढवून दिला जातो. करार शेतीत सुधारित तंत्रज्ञानाचा फायदा मिळतो.
अवर्षणग्रस्त असणाऱ्या कडेगाव तालुक्यात बटाटा लागवडीत वाढ होत आहे. या वर्षी तालुक्यात सुमारे तीनशे एकरांवर बटाट्याची लागवड झाली आहे. नगदी पीक म्हणून हे पीक भागात पुढे येत आहे ही समाधानकारक बाब आहे.
रवींद्र कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी, विटा.
सुनील पाटील-9545119385, 9970587805
रवींद्र कांबळे - 940396445.....?
स्त्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...