অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेशीम कीटकांचे थंडीपासून संरक्षण

सध्या थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. रेशीम कीटकांच्या वाढीच्या विविध अवस्थेत या तापमानाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वाढीच्या विविध अवस्थेत लागणारे नेमके तापमान ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. 

रेशीम कीटक संगोपनासाठी महाराष्ट्रातील हवामान पूरक असून, उष्ण व कोरडे आहे. पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास कीटक संगोपनगृहात हिवाळा व उन्हाळ्यामध्ये तापमानाचे समायोजन करावे लागते. तसेच सापेक्ष आर्द्रता वाढवावी लागते. बाल्य कीटक संगोपन काळात संगोपनगृहातील तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस आणि प्रौढ संगोपन काळात 24 ते 25 अंश सेल्सिअस व सापेक्ष आर्द्रता 85 ते 90 टक्के ठेवल्यास रेशीम कीटकांची वाढ चांगली होते. यासाठी बाल्य कीटक संगोपनगृहात तापमान मोजण्यासाठी तापमापी आणि आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटरचा वापर करावा.

बीजगुणन केंद्रातून अंडीपुंज जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांपर्यत पोचेपर्यंत 6 किंवा 7 दिवस जातात. या अंडीपुंजाच्या प्रवास काळात किंवा अंडी फुटण्यापर्यंत अंडी उबवण काळात तापमान 25 अंश सेल्सिअस व 65 टक्के आर्द्रता ठेवणे आवश्‍यक असते.

थंडीच्या लाटेत कीटक संगोपनाची काळजी

महाराष्ट्रामध्ये डिसेंबर - जानेवारी महिन्यात थंडीची तीव्रता वाढते. या काळात संगोपनगृहातील वातावरण उष्ण करण्यासाठी इलेक्‍ट्रिक शेगडी, कोळशाची शेगडी किंवा सच्छिद्र मातीचे माठ (ज्यात 2 किलो कोळसा बसेल) वापरावे. 
ग्रामीण भागातील भारनियमनामुळे इलेक्‍ट्रिक शेगडी वापरण्यामध्ये अडचणी येतात. अशा वेळी स्वस्तातील तंत्र म्हणजे शेगडी म्हणून सच्छिद्र मातीचे माठ वापरावेत. बाजारात त्याची अंदाजे किंमत रुपये 60 ते 70 आहे. संगोपनगृहाबाहेर माठात कोळशे भरून पेटवून घ्यावेत. धूर कमी झाल्यानंतर व कोळशे लाल झाल्यानंतर संगोपनगृहात झाकणीने झाकून ठेवावेत. संगोपनगृहाच्या आकारानुसार 8 ते 9 तास माठ ठेवावे. आवश्‍यकतेनुसार नंतर दुसरे कोळशे भरलेले माठ तेथे ठेवावेत. सध्या संगोपनगृहात रात्रीचे तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअस पडत असून, त्यात 10 ते 12 अंश सेल्सिअसने वाढ करायची आहे. 
ह्युमिडीफायर किंवा डेझर्ट कूलरच्या साह्याने संगोपनगृहातील आर्द्रता वाढविता येते किंवा खिडक्‍यांना गोणपाटाचे आच्छादन करून त्यावर पाणी मारून आर्द्रता वाढविता येते.

महाराष्ट्रातील परीस्थिती

देशामध्ये 80 टक्के रेशीम कीटक संगोपनगृह कच्च्या स्वरूपाचे आहेत. तसेच महाराष्ट्रात संगोपनगृहासाठी शेडनेटचा मोठा वापर होतो. अशा शेडनेटमध्ये थंडीमुळे रेशीम कोष उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. मजुरीत वाढ होते. कीटक संगोपनाचा कालावधी 25 दिवसांऐवजी 30 ते 35 दिवसांपर्यंत वाढतो.

  • विशेष करून दुबार रेशीम संकरवाण वातावरणास बळी पडत असून, कोष उत्पादनात घट येते.
  • तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली किंवा 35 अंश सेल्सिअसच्या वर असेल तर कीटकाच्या पाने खाण्याची क्रिया मंदावते व रेशीम कीटक पाने खात नाहीत. त्यासाठी रेशीम कीटक वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत लागणारे तापमान आणि आर्द्रता ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. (तक्ता पाहा.)

compose/12-1-2015/AGR.cs6 (3) 
तक्ता - रेशीम कीटक वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत लागणारे तापमान व आर्द्रता
अ.क्र. +वाढीची अवस्था +तापमान अंश से. +आर्द्रता (टक्के) +100 अंडीपुंजांसाठी तुती पाने (कि.ग्रॅ.) +संगोपन ट्रेची संख्या (2 × 3 फूट आकार) 
1 +पहिली +27-28 +85-90 +3.00 ते 3.50 +4 
2 +दुसरी + 27-28 +85-90 +8.50 ते 10.00 +8 
3 +तिसरी +25-26 +75-80 +45 ते 50 +8 ते 15 
4 +चौथी +24-25 +75-80 +100 ते 125 +15 ते 30 
5 +पाचवी +25 +65-70 +900 ते 1000 +40 ते 50
डॉ. सी. बी. लटपटे, 7588612622 
(प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

बाल्य कीटक संगोपनगृहात घ्यावयाची काळजी

  • संगोपनगृह व संगोपन साहित्याचे पूर्णतः निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक.
  • अंडीपुंजाची वाहतूक सकाळी किंवा सायंकाळी बाष्पयुक्त (फोम कोटेड) पिशवीतून करावी.
  • अंडी ऊबवण काळात संगोपनगृहात 25 अंश सेल्सिअस तापमान व 75 ते 80 टक्के आर्द्रता आणि ब्लू अंडे अवस्थेपर्यंत 16 तास प्रकाश असावा. अंडीपुंजाची ब्लॅकबॉक्‍सिंग पीन हेड स्टेजमध्ये करावी.
  • दुसऱ्या अवस्थेपर्यंत संगोपनगृहात 27 ते 28 अंश सेल्सिअस तापमान व 80 ते 90 टक्के सापेक्ष आर्द्रता मर्यादित ठेवावी.
  • बाल्य रेशीम कीटकांना उच्च प्रतीची 80 टक्के आर्द्रता असलेली कोवळी तुती पाने खाद्य म्हणून द्यावीत.
  • प्रत्येक दिवशी संगोपन ट्रेमध्ये रेशीम कीटकांना आवश्‍यक तेवढे अंतर द्यावे.
  • बाल्य कीटक संगोपनगृहाबाहेर/ आत स्वच्छता ठेवावी.
  • बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना प्रवेश बंद करावा. बाल्य कीटक संगोपनगृहात प्रवेश करतेवेळी पादत्राणे बाहेर ठेवून हात 1 टक्का ब्लिचिंग पावडरमध्ये धुऊन आत जावे.
  • कीटक संगोपनगृहात आत/बाहेर 5 टक्के ब्लिचिंग पावडरसोबत चुन्याची निवळी मिसळून (1ः19 या प्रमाणात) 200 ग्रॅम/ चौरस मीटर याप्रमाणे 5 दिवसांच्या अंतराने शिंपडत राहावे.
  • रोगट व मृत रेशीम कीटक प्लॅस्टिकच्या घमेल्यात 5 टक्के ब्लिचिंग पावडरच्या द्रावणात निवडून घेऊन टाकावेत. संगोपनगृहापासून लांब अंतरावर जमिनीत गाडून टाकावे.
  • प्रत्येक दिवशी संगोपन ट्रे स्वच्छतेनंतर 2 टक्के ब्लिचिंग पावडरने जमिनीवर शिंपडणी करावी किंवा फरशी पुसून घ्यावी.
  • चौथी कात अवस्था पूर्ण केलेल्या रेशीम कीटकांना संगोपन रॅकमध्ये व्यवस्थित सारख्या प्रमाणात दररोज दोन वेळा फांद्या खाद्य द्यावे.
  • खाद्य देत असताना जास्त परिपक्व, रोगट किंवा धुळीने माखलेल्या फांद्या/पाने खाद्य म्हणून देणे टाळावे.

रेशीम कीटकाची कात अवस्थेत घ्यावयाची काळजी

  • कात अवस्थेत पाने/ फांद्या खाद्य 90 टक्के रेशीम कीटक कातीवर बसल्यानंतर पूर्णतः बंद करावे. संगोपन रॅक कोरडे ठेवावे आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
  • दुसऱ्या दिवशी 24 तासांपर्यंत 95 टक्के रेशीम कीटक कात अवस्थेतून बाहेर आल्यानंतर पाने/ फांद्या खाद्य द्यावे. कात अवस्थेतून उठल्यानंतर खाद्य देणे अगोदर अर्धा तास शिफारशीत निर्जंतुक पावडर किंवा चुना सच्छिद्र कापडाची पुरचुंडीच्या साह्याने सम प्रमाणात रेशीम कीटकवर धुरळणी करावी. नंतर खाद्य द्यावे.
  • पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या कात अवस्थेतून बाहेर आलेल्या रेशीम कीटकांना कोवळा तुती पाला बतईच्या साह्याने पाट्यावर कापून 0.5, 2.5 ते 3 चौरस सें.मी. आकाराचे तुकडे करून खाद्य द्यावे. संगोपन ट्रे स्वच्छतेच्या वेळी नायलॉन/ सुती जाळीचा वापर करावा.
  • संगोपन ट्रे स्वच्छतेनंतर रेशीम कीटकांची विष्ठा, शिल्लक राहिलेली पाने इत्यादी कंपोस्ट खड्ड्यात संगोपनगृहापासून दूर अंतरावर गाडून टाकण्याची व्यवस्था करावी.

रेशीम कीटकाच्या कोष बांधणीच्या वेळी घ्यावयाची काळजी

  • प्लॅस्टिकचे दुमडणारे नेत्रीकांचा वापर रेशीम कीटकांना कोष बांधणीसाठी करावा.
  • नेत्रीका अगोदर दुमडून 75 टक्के रेशीम कोष बांधणीला सुरवात केल्यानंतर रॅकवर पसराव्यात.
  • कोष बांधणीच्या काळात संगोपनगृहात 24 ते 25 अंश सेल्सिअस तापमान आणि 60 ते 65 टक्के आर्द्रता राहील याची काळजी घ्यावी.
  • एका नेत्रीकेवर 45 ते 50 रेशीम कीटक प्रतिचौरस फूटप्रमाणे कोष बांधणीसाठी रेशीम कीटक सोडावेत किंवा 900 रेशीम कीटक 6 बाय 4 फूट बांबू चंद्रीकेवर सोडावेत.
  • कोष बांधणीसाठी वेगळ्या संगोपनगृहात चंद्रीका किंवा नेत्रीका रॅकवर ठेवावेत किंवा व्हरांड्यात सावलीत ठेवण्याची व्यवस्था करावी. त्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार नाही, हे पाहावे.
  • रेशीम कीटक कोष बांधणीवर गेल्यापासून 5 व्या दिवशी कोषाची काढणी करावी.
  • सहाव्या दिवशी रेशीम कोष बाजारपेठेत न्यावयाच्या अगोदर डागाळलेले, पोचट कोष, वाकड्या आकाराचे किंवा डबल कोष निवडून वेगळे करावेत.

compose/12-1-2015/agr.cs6 (3) 
तक्ता क्र. 2 - रेशीम कीटक कात अवस्थेतून बाहेर आल्यानंतर निर्जंतुक धुरळीचे प्रमाण -
अ.क्र. +कात अवस्था +निर्जंतुकी पावडर (ग्रॅम) 
1 +पहिल्या अवस्थेतून +50 
2 +दुसऱ्या अवस्थेतून +100 
3 +तिसऱ्या अवस्थेतून +600 
4 +चौथ्या अवस्थेतून +1250 
5 +पाचव्या अवस्थेतून +2000
केंद्रीय रेशीम मंडळ बंगळूर तथा संचालक रेशीम संचालनालय यांच्या शिफारशीप्रमाणे कीटक संगोपनगृह पक्‍क्‍या सिमेंट कॉंक्रीटमध्ये बांधलेले असावेत किंवा सिमेंट पत्रे असलेले असावेत. जेणेकरून त्यामध्ये तापमान व आर्द्रता मर्यादित करता येईल.

दुबार रेशीम कीटक संकरवाण संगोपनगृहाची आवश्‍यकता

  • दुबार रेशीम कीटक संकरवाण संगोपनासाठी स्वतंत्र संगोपनगृह असणे आवश्‍यक आहे, त्यामुळे निर्जंतुकीकरण, स्वच्छता राखणे किंवा संगोपनाचे वातावरण उपलब्ध होईल.
  • संगोपनगृहास व्हरांडा दोन्ही बाजूस असावा, खिडक्‍यांना पक्की तावदाने असावीत. खिडक्‍यांच्या खाली आणि वरच्या बाजूस झरोका खिडक्‍या असाव्यात, त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते.
  • खिडक्‍यांना वायरमेश किंवा जीआय वायरच्या जाळ्या बसवून घेतल्यास ऊजी माशीचा प्रादुर्भाव टाळता येतो.
  • तुती पाने/फांद्या खाद्य साठवणीसाठी स्वतंत्र अंधार खोलीची व्यवस्था असावी. ऊजी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासोबतच तुती पानाची प्रत व त्यातील पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवता येईल.
  • छतावर गवत, काडीकचरा किंवा नारळाच्या झावळ्यांचा वापर आच्छादन म्हणून करावा. त्याने संगोपनगृहाचे तापमान मर्यादित ठेवण्यास मदत होते.
  • छतावर कुलगार्ड पेंट कोटिंग केले तर 3 ते 4 अंश सेल्सिअस तापमान कमी होते.
  • संगोपनगृहाच्या आजूबाजूस उंच झाडांची लागवड केल्यास उन्हाळ्यात तापमान व आर्द्रता मर्यादेत राखण्यास मदत होते.
  • 100 अंडीपुंजांच्या संगोपनासाठी संगोपन रॅकमध्ये 750 ते 800 चौ. फूट चटई क्षेत्र असणे आवश्‍यक असते.


डॉ. सी. बी. लटपटे, 7588612622 
(प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate