दुष्काळ हटविण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात व त्यातून पाणलोट विकासाचे लाखो उपचार हाती घेण्यात येतात. दुर्दैवाने गुणवत्तेच्या नावाने तीन-तेराच वाजलेले असतात. शिकल्या सवरलेल्या मंडळींकडून असे का घडत आहे, हे समजणे अवघड झालेले आहे. वरिष्ठ कामाची तपासणी करत नाहीत. बैठकांमध्ये त्यांना वेळच मिळत नाही. एका वर्षात मंत्रालयातील काही अधिकांऱ्याच्या फेऱ्या २०० च्या जवळ झालेल्या आहेत, असेपण कानांवर येते. अशा परिस्थितीत त्यांनी कामे कशी करावी, याबद्दल प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे. आपला दुष्काळ हटणारच नाही का, असा प्रश्न सतत पुढे उभा आहे.
वर्तमानपत्रातील बातम्यांतून शासकीय पद्धतीनुसार चौकशी चालू झाली आहे, असे कळते. चौकशीसाठी नेमलेल्या समित्यांत त्याच विभागातल्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. काही बाहेरचे घ्यावयास हरकत नसावी; पण तसे घडत नाही. परिघाबाहेरची मंडळी वेगळ्या नजरेतून पाहतात, उणिवा शोधतात; पण तशी संधीच दिली जात नाही. परवाच कृषी विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत सुधारणा सुचविण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीमध्ये सर्व सदस्य कृषी विद्यापीठाचे आजी माजी कुलगुरू असल्याचेच दिसले. उणिवा कशा लक्षात येणार? शासनाला खऱ्या उणिवा शोधावयाच्याच नाहीत, असे उद्दिष्ट असल्याचे वाटून जाते.
शासकीय निधीच्या गैरवापराची, अपहाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येत आहेत. यांतून धडा घेण्याची वेळ आली आहे. चुका स्वीकारून त्या चुकांत सुधारणा करण्याची गरज आहे. आमचे काहीही चुकले नाही, असाच अाविर्भाव अनेकांमध्ये दिसून येतो. याबद्दल दुःख वाटते. राज्यात पाणलोट क्षेत्र विकासाची अगणित कामे करावयाची आहेत. यासाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून कामे सोपविणे गरजेचे आहे. आपला देश गरीब आहे. तुटपुंज्या निधीची अशी वाताहत लावणे मनाला वेदना देणारे ठरते. काँक्रिट हे बांधकामाचे उत्कृष्ट साधन आहे, त्याला चिखलासारखे हाताळणे हे पूर्णत: अशास्त्रीय आहे. बांधकामाशी धसमुसळेपणाने वागणे हे अपेक्षित नाही. काँक्रिटच्या बंधाऱ्यांची कामे त्या कामाची माहिती नसणाऱ्या कृषी विभागाला दिली जाऊ नयेत, इतकी तरी खबरदारी घेण्याची गरज आहे. शासकीय चौकशीतून काहीही निष्पन्न होत नसते. स्थापत्य अभियंत्याने आपल्या व्यवसायाशी व मिळविलेल्या ज्ञानाशी इमानदार राहून कामे करण्याची गरज आहे, हीच खरी देशसेवा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी परिसरात २०१२-१३ मध्ये नॅचरल शुगर इंडस्ट्रीजच्या मदतीने नाला रुंदीकरण व खोलीकरणाची काही कामे करण्यात आली. नाल्याच्या उतारानुसार दर कि.मी. वा अर्धा कि.मी.ला बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात आले. काँक्रिटचे बंधारे बांधण्याऐवजी साधारणत: २५ ते ३० फुटांचा नाल्यामधील भाग न खोदता तसाच ठेवण्यात आला आहे. खालचा उतार साधारणतः १:३ ते १:४ व वरचा उतार १:२ असा ठेवण्यात आला. चार पाच गावांच्या परिसरात ३० ते ४० कि.मी.मधील नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामाशी माझा थोडा संबंध आला. काम करणाऱ्यांना डेडमन (न खोदलेला भाग) ठेवण्यास सांगितले. वरच्या भागात प्रशस्त खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या बंधाऱ्याला नैसर्गिक बंधारा (नॅचरल बंधारा) असे नाव देण्याचे सुचविले. सिमेंट बंधारे बांधण्यासाठीचे खोदकाम करण्याऐवजी सिमेंट, वाळू, खडी आदींचा कसलाही संबंध येऊ न देता साधारणत: असे ३० नैसर्गिक बंधारे निर्माण करण्यात आले अाहेत. पहिल्याच पावसाळ्यात या बंधाऱ्यांच्या पाठीमागे पाणी साठले व ते झिरपले. आजूबाजूच्या विहिरींना भरपूर पाणी आले आहे. याचा फायदा कारखाना परिसरातील ऊस जगवण्यासाठी झाला. मागच्या वर्षी या भागात पुन्हा पाऊस कमी पडला, कोणताही बंधारा ओसंडून वाहिला नाही. येत्या पावसाळ्यात या मातीच्या नैसर्गिक बंधाऱ्यांची पुन्हा परीक्षा होईल.
हे नैसर्गिक बंधारे पाणी अडविण्याचे काम चांगल्या प्रकारे करत आहेत. अशा २५-३० मातीच्या नैसर्गिक बंधाऱ्यांमुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी रस्तेपण झाले. ट्रक जाईल एवढा रुंद रस्ता झाला. पाऊस मोठा पडला, जास्त पूर आला व बंधारा थोडा झिजला, तर खालच्या भागात ३० ते ४५ सें.मी. जाडीचे दगडी अस्तर (पिचिंग) पण करता येईल. एखाद्या ठिकाणी आवश्यक वाटल्यास पुढे चालून काँक्रिटचा बंधारापण बांधता येईल. काँक्रिटवर खर्च न करता पाणी साठविण्याचे व जिरवण्याचे काम जर परिणामकारक होत असेल तर फारच चांगली बाब राहणार आहे. पैशांच्या अपहाराला जास्त वाव राहणार नाही. काम सोपे व फक्त एक प्रोक्लॅन मशिनच्या साहाय्याने दोन माणसे आठ दिवसात एक किमी लांबीचा बंधारा करतील. हा सोपा पर्याय कामी येईल, असे वाटते. इतरांनीपण असे प्रयोग करावेत, ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भूस्तर मऊ असल्यास, माती असल्यास थोडी काळजी घ्यावी लागेल. मुरूम व खडक असलेल्या भूस्तरास काहीही करण्याची गरज वाटत नाही. अशा बंधाऱ्याचा खर्च नगण्य असणार आहे.
मो. ९४२२७७६६७०
(लेखक महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
केळीसह इतर पिकांवरील नैसर्गिक आपत्तीचे पूर्णपणे नि...
कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात य...
पृष्ठभागावरचे पाणी गरम असल्याने खोलीवरच्या गार पाण...
गरोदरपण (गर्भारपण) आपोआपच नष्ट होणे ह्याला नैसर्ग...