केळीसह इतर पिकांवरील नैसर्गिक आपत्तीचे पूर्णपणे निर्मूलन होऊ शकत नाही. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपत्तीवर मात करून शेती उत्पादन वाढवू शकतात. त्यानुसार योग्य ती खबरदारी घेतल्यास केळीवरील करपा रोखणेदेखील शक्य आहे, असे प्रतिपादन जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. बडगुजर यांनी ऐनपूर (ता. रावेर) येथे केले.
ऐनपूरचे सार्वजनिक वाचनालय व "सकाळ- ऍग्रोवन'तर्फे आयोजित केळी- कापूस चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बाजार समितीचे संचालक युवराज महाजन, सरपंच विकास अवसरमल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कापूस पैदासकार डॉ. संजीव पाटील, केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. परदेशी तसेच श्रीराम पाटील, वामन पाटील, अजित पाटील, स्वप्नील पाटील, विजय चौधरी, महेंद्र भोई, प्रभाकर पाटील, आश्विन पाटील, धोंडू पाटील, कृषी विभागाचे ए. डी. फेगडे, आर. आर. चौधरी, ए. बी. चौधरी, एन. ई. चौधरी आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. "सकाळ- ऍग्रोवन"तर्फे मिलिंद बिऱ्हाडे व प्रदीप अष्टेकर यांनी स्वागत केले.
डॉ. बडगुजर म्हणाले, की चरका व करपाबाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहे. चरका हा रोग नाही. अधिक थंडीमुळे तापमान घटल्यावर केळीतील पेशीत बर्फाचे कण तयार होतात. परिणामी, अन्नद्रव्य शोषणाचा वेग मंदावतो व पाने उमलण्याची प्रक्रियादेखील कमी होते. बुंध्याजवळील पाने कापू नये. ती पाने बुध्याजवळ राहिल्याने केळीचे थंडीपासून आपोआप संरक्षण होते. करपाग्रस्त केळीची पाने कापून ती पाने बागेत टाकू नये. करपाग्रस्त पाने जाळून किंवा जमिनीत खोल खड्डा करून पुरावीत. प्रा. परदेशी म्हणाले, की जानेवारी ते ऑगस्टदरम्यान करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. रोग उद्भवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय वेळीच केले पाहिजे.
कपाशीत आंतरपीक घ्यावे ः डॉ. पाटील
बदलत्या हवामानामुळे बीटी कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. योग्य त्या वाणांची निवड न केल्यामुळे व तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसल्यामुळे कपाशीवर स्पोडोप्टेरासारख्या अळीचा प्रादुर्भाव होतो. यामुळे उत्पादनात घट येते. बोंडे लागण्याच्या स्थितीत "लाल्या' विकृती तसेच अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास तीस टक्के उत्पादनात घट येते. कपाशीत मका, मूग, उडीद हे अंतर पीक घ्यावे. त्यामुळे नत्राच्या मात्रेत बचत होऊन कपाशीवर रोग पडत नाही व उत्पादन वाढते, असे डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. सरपंच अवसरमल यांनी "ऍग्रोवन'ची उपयुक्तता व औरंगाबाद येथे झालेली "ऍग्रोवन'ची महापरिषद, याविषयी गौरवोद्गार काढले. प्रदीप वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. रमेश अवसरमल यांनी आभार मानले.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...