वर्धा जिल्ह्यात सुमारे 20 गावांमध्ये जलसंधारणाची, तर दहा गावांमध्ये एकात्मिक ग्राम संकल्पनेला पूरक विकासकामे लोकसहभागातून करण्यात आली असून, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची समस्या कमी होण्यास मदत झाली आहे. "गाव करी ते राव काय करी' ही म्हण सार्थ करीत जलस्वयंपूर्ण होणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील वीस गावांची ही यशकथा.
विदर्भामध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई ही बाब काही नवीन नाही. दर वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करणारी वर्धा जिल्ह्यातील वीस गावे निश्चित करीत एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. या पुढाकाराला वर्धा जिल्ह्यातील वीस गावांतील लोकांची चांगली साथ मिळाल्याने गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत मिळाली आहे. यामध्ये देवळी तालुक्यातील सहा, वर्धा तालुक्यातील सात, हिंगणघाट व कारंजा तालुक्यातील दोन, आष्टी व आर्वी तालुक्यांतील प्रत्येकी एक गावाचा समावेश आहे.
कोणत्याही गावाचा विकास हे एकट्यादुकट्याचे काम नाही, गावातील प्रत्येक हात, डोके लढले तरच शाश्वत ग्रामविकास साध्य होतो. अशा कामाला चालना देण्यासाठी जानकीदेवी बजाज फाउंडेशनसारखी संस्था असल्यास या अभिसरणाला वेग येतो. असे काम करण्यासाठी संस्थेने वर्धा जिल्ह्यातील वीस गावांची निवड निश्चित केल्यानंतर स्थानिकांच्या समावेशासाठी प्रयत्न सुरू केले. ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांना जलसंधारण व अन्य कामांचे महत्त्व पटवून देतानाच प्रत्येक गावकरी, शेतकऱ्यांच्या मते आणि सूचना विचारात घेतल्या.
वीस गावांतील परिस्थिती वेगवेगळी होती. त्या स्थानिक बाबींचा शास्त्रीय व शेतकऱ्यांच्या सूचनेचा विचार करून कामांचे स्वरूप निश्चित करण्यात आले. गावातील पाचशे ते सहाशे मीटर लांबीच्या नाल्यांची रुंदी व खोलीकरणाची कामे सुरू करण्यात आली. सोनेगाव स्टेशन, लोणी, गणेशपूर, गाडेगाव, गारपीट, खातखेडा, नागठाणा, तळेगाव, रसूलाबाद, जांभुळदरा, तरोडा या गावांतील शेकडो हात या कामांसाठी राबले. योग्य तिथे यंत्राचाही वापर केला गेला. या प्रत्येक कामासाठी खर्चासाठी आवश्यक निधी संकलनासाठी ग्रामपातळीवरील समिती स्थापन करण्यात आली. थोडक्यात, गावातील कामांचे नियोजन, नियंत्रण यावर गावातील लोकांच्या समितीने लक्ष ठेवले. पूर्वी कृषी विभागाद्वारा झालेल्या सिमेंट बंधारे वगैरे कामांची डागडुजी, नाल्यांतील गाळ काढणी व रुंदी-खोलीकरणाची कामेही करण्यात आली. त्यामुळे जलसंचय वाढण्यास मदत झाली.
दर वर्षी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असलेली ही गावे या कामांमुळे जलस्वयंपूर्ण झाली. पूर्वी विदर्भातील अनेक गावांप्रमाणेच डवलापूर परिसरात उन्हाळा सुरू झाल्यापासून चांगला पाऊस होईपर्यंतचा काळ हा पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असते. आता मात्र सामूहिक प्रयत्नांतून गावकऱ्यांनी आपली गावे केवळ पिण्याच्याच नाही, सिंचनाबाबतीत बऱ्यापैकी जलस्वयंपूर्ण केली आहेत.
जलसंधारणाच्या कामामुळे भिवापूर, चिंचाळा, गाडेगाव, सोनेगाव (स्टेशन), बोदडसारख्या कामे झालेल्या सर्व वीस गावांमधील भूजल पातळीत वाढ झाली आहे. आता पाण्याची शाश्वती झाल्याने खरिपामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन व रब्बीत हरभरा ही पिके घेतली जातात. या पिकांसाठी आवश्यक तेव्हा संरक्षित पाणी देणे शक्य झाल्याने उत्पादनामध्ये वाढ झाली आहे.
या वर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली असली तरी पाण्याची सोय असल्याने काही गावांत कपाशीसारख्या पिकाच्या पेरण्या शेतकऱ्यांना वेळेत साधता आल्या. नागपूर येथील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राच्या मदतीने कपाशीच्या सरळ वाणाच्या सघन लागवड पद्धतीची प्रात्यक्षिकेही शेतकऱ्यांच्या शेतात घेण्यात येत आहेत.
केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या या गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांबरोबर गवताची व चाऱ्याची सोय शक्य झाली. त्या वेळी गावांमध्ये शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न जानकीदेवी बजाज फाउंडेशनतर्फे करण्यात आला. त्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व भूमिहीनांना जनावरांचे वाटप करण्यात आले. चार शेळ्या व एक बोकड असे एक युनिट देताना शेतकऱ्यांना 18 हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच गायखरेदीसाठी 20 हजार रुपयांची मदत व उर्वरित हिस्सा शेतकऱ्यांचा, असे स्वरूप ठेवले आहे.
कोणत्याही विकासकामांत पाच टक्के ग्रामस्थांचे श्रमदान व पाच टक्के आर्थिक सहकार्य असे गृहीत ठेवण्यात आले. ग्रामस्थांनी त्याप्रमाणे सहकार्य केले. आता या वीस गावांतील दूध संकलनात वाढ झाली आहे. त्यातून बऱ्यापैकी पूरक उत्पन्नही मिळत आहे.
टाकळी चणा, कोसूरला, डवलापूर आदी दहा गावांत विहीर खोलीकरण व गाळउपसाही करण्यात आला. त्याकरिता संस्थेमार्फत पाच हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारा दहा शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनाचा पर्याय अवलंबला असून, पूर्वी कपाशीचे एकरी सहा क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी आता संरक्षित पाण्यामुळे दहा क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ लागले आहेत.
भोजनखेडा, टाकळी चणा, भिवापूर, कोसूरला, डवलापूर, चिंचाळा, आजगाव, लोणी, गणेशपूर, सोनेगाव स्टेशन, बोदड, गाडेगाव, काकदरा, गारपीट, खातखेडा, नागठाणा, तळेगाव, रसुलाबाद, तरोडा, जांभुळदरा
गावामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत विहीर असूनही उन्हाळ्यामध्ये गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. विहिरीलगतच नाला असून, त्याचे रुंदी-खोलीकरण करण्यात आले. त्यानंतर नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. या दोन्ही बाबींमुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीसह परिसरातील अनेक विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाले आहे.
प्रशांत कडू - 8380854314
टाकळी (चणा), ता. देवळी, जि. वर्धा
आमची 50 एकर शेती असून, त्यातील 26 एकर क्षेत्र नाल्याच्या काठावर आहे. याच नाल्याचे रुंदी व खोलीकरण करून ग्रामस्थांनी बंधारा बांधला. नाल्यामध्ये पाणी साठल्याने त्याचा वापर हंगामी सिंचनाकरिता होऊ लागला आहे. दर वर्षी कपाशी, सोयाबीन, हरभरा यासारखी पिके मी घेत असून, एकरी उत्पादनामध्ये प्रत्येकी एक ते दोन क्विंटलची वाढ अनुभवत आहे.
- अरुण दादाजी चौधरी - 9420061492
डवलापूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा.
विनेश काकडे - 9850485653
कार्यक्रम समन्वयक
जानकीदेवी बजाज फाउंडेशन, वर्धा.
---------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...