सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीला 125 वर्ष पूर्ण होत आहे. तसेच “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” या लोकमान्यांच्या उद्घोषणेचे शतक महोत्सवी वर्ष यानिमित्ताने 'लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ आणि 'लोकमान्य उत्सव' असे दोन सांस्कृतिक उपक्रम 2016 आणि 2017 या दोन वर्षात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांची चतुःसुत्री तसेच अन्य उपक्रमांद्वारे जनजागृती घडविण्याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यात गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळाची पद्धत, देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदी विषयांबाबत मूल्यांकन करुन शासनाच्यावतीने तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर विजेत्या मंडळाचा गौरव तसेच रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन यापैकी एका कल्पनेशी निगडीत देखावा करणे आवश्यक आहे.
स्पर्धेत राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. त्यासाठी मंडळाची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मंडळानी अर्ज संबंधित तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे करावयाचा आहे. 29 जुलै ते 29 ऑगस्ट 2016 या कालावधीत गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तपासणी व पारितोषिकासाठी निवड करण्याकरिता विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरावर समित्या नेमण्यात येणार आहेत. विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिक विजेत्या मंडळाला दोन लाख, द्वितीय दीड लाखांचे व तृतीय विजेत्याला एक लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम विजेत्याला एक लाखाचे, द्वितीय पंचाहत्तर हजार व तृतीय विजेत्याला पन्नास हजाराचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय पंधरा हजार आणि तृतीय दहा हजार देण्यात येणार आहेत.
प्रत्येक तालुक्यात किमान पाच मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेणे आवश्यक आहे. चार मंडळांनी सहभाग घेतल्यास दोन आणि तीन मंडळांनी सहभाग घेतल्यास केवळ प्रथम पारितोषिक देण्यात येईल. तालुकास्तरीय समिती स्पर्धेचा निकाल 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान जाहीर करेल. जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल 22 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय समिती जाहीर करेल. विभागीय स्पर्धेचा निकाल विभागीय समिती 25 सप्टेंबर रोजी जाहीर करेल.
लोकमान्य उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांची जीवनगाथा, त्यांनी केलेल्या संघर्षाचा लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी विदेशातील आणि महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी आणि राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि महासंघाचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
लोकमान्य टिळकांनी समाजजागृतीसाठी गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतरच्या काळातही या उत्सवाच्या माध्यमाने समाजाचे प्रबोधन करण्याचे अनेक उपक्रम राबविण्यात आले. ही संस्कृती आणि प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्यासाठी आणि लोकमान्य टिळकांचे कार्य समाजासमोर आणण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सव मंडळांनी त्यात सहभाग घेतल्यास या उत्सवाचे महत्व आणखी वाढेल, हे निश्चित!
शब्दांकन- सुयोग जायभावे.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 2/10/2020
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर ...
अपंग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी अडथळा विरहीत वाता...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
जर पुढीलप्रमाणे कोणताही अनुसूचित जातीचा कोणत्याही ...