एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडीशा राज्यात सांस्कृतिक आदान प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. येथील राष्ट्रीय विज्ञान केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष या कराराचे हस्तांतरण करण्यात आले. महाराष्ट्राच्यावतीने मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि ओडिशा राज्याच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव गगन कुमार धल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कार्यक्रमात केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री महेश शर्मा आदी उपस्थित होते.
या करारांतर्गत दोन राज्यांमधे कलापथकांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाण-घेवाण होणार आहे. साहित्य विषयक राज्यातील ५ पुरस्कार विजेती पुस्तके व कविता संग्रह, लोकप्रिय लोकगीत यांचा उडिया भाषेत अनुवाद करणे तसेच दोन राज्यांच्या भाषेतील समान अर्थाच्या म्हणी निश्चित करणे, त्यांचा अनुवाद व प्रसार करणे, लेखक आणि कवी यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे, पाककलांच्या पद्धती शिकण्याच्या संधीबरोबर पाककला महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, असे या करारात नमूद करण्यात आले आहे.
शाळा, विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांकरिता परस्पर राज्यांमध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाईल. पर्यटकांसाठी राज्यदर्शन कार्यक्रमाला चालना मिळेल. पर्यटन वाढीसाठी परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल. सहभागी राज्यांच्या भाषांमधील वर्णक्रम, गाणी, म्हणी व १०० वाक्ये यांची ओडीशा राज्याच्या विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात येईल. शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रसार करण्यासाठी सहभागी राज्यांची संस्कृती, प्रथा, परंपरा, वनस्पतीजीवन व प्राणीजीवन इत्यादींवरील माहितीचा अंतर्भाव असणारे पुस्तक तयार करण्यात येईल. जोडीदार राज्यांच्या भाषांमधील शपथा, प्रतिज्ञा घेण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये सहभागी राज्यांच्या भाषेमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. सहभागी राज्यांच्या भाषेचे अध्ययन करण्यासाठी शक्य असेल त्या शाळा, महाविद्यालयांमध्ये पर्यायी वर्ग भरविण्यात येईल.
शैक्षणिक संस्थांमध्ये सहभागी राज्यांच्या नाट्यकृतीचे आयोजन याअंतर्गत करण्यात येईल. सहभागी राज्यांमधील शेतकऱ्यांमध्ये परस्पर कृषी पद्धती व हवामान अंदाज यावरील माहितीचे देवाण-घेवाण करण्यात येईल. समारंभाच्या प्रसंगी सहभागी राज्यांच्या संयुक्त चित्ररथाचे आयोजन करणे आणि संचालन तुकडीत सहभाग असणे, राज्याच्या कार्यक्रमाचे सहभागी राज्यांच्या प्रादेशिक दूरदर्शन, रेडीओ वाहिन्यांवर प्रसारण करणे, प्रक्षेपण करणे असे करारात समाविष्ट आहे.
सहभागी राज्यातील चित्रपटाचे उपशिर्षासह महोत्सव आयोजित करण्यात येतील. सहभागी राज्याच्या पारंपरिक वेशभुषेचे प्रदर्शन लावण्यात येईल. दूरचित्रवाणी, रेडीओ, “एक भारत श्रेष्ठ भारत” संकेतस्थळ यावर विविध भाषांमधील राष्ट्रीय, राज्यस्तरीय विशिष्ट प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. सहभागी राज्याची संस्कृती व वारसा अधोरेखित करणाऱ्या छायाचित्र स्पर्धांचे आयोजन यानिमित्त होणार आहे.
"एक भारत श्रेष्ठ भारत" संकेतस्थळावर ब्लॉग स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. राज्यांच्या विद्यार्थ्यांसाठी, लोकांसाठी सहभागी राज्यामध्ये सायकल मोहिम आयोजित करणे, राज्यांच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेची शिबीरे सहभागी राज्याच्या ठिकाणी आयोजित करणे, सहभागी राज्यांचे पारंपरिक क्रीडा प्रकार शिकण्यास व ते प्रसिद्धीस आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच अन्य महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश या कराराअंतर्गत होणार आहे.
संकलन
मनीषा पिंगळे
जिल्हा माहिती आधिकारी
पालघर.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/15/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परत...