ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या एकूण मतदारांपैकी १०% किंवा १०० यापैकी जी संख्या कमी असेल इतका कोरम असला पाहिजे. त्यापैकी ग्रामसभेमध्ये किमान ५०% महिला हजर असाव्यात तरच तो कोरम पूर्ण मानण्यात येईल. कोरम पूर्ण न झाल्यास सभा तहकूब होईल. परंतु तहकूब सभेला कोरमचा नियम लागू नाही. ठरलेल्या वेळेनंतर कमीत कमी पंधरा मिनिटे आणि जास्तीत जास्त तीस मिनिटे सभेला सदस्य येण्याची वाट पाहावी अशी पध्दत आहे. ज्या दिवशी ग्रामसभा बोलविली असेल त्यादिवशी सभा सुरु होण्यापूर्वी हजेरी पुस्तक ठेवून त्यात येणाऱ्या प्रत्येक मतदारांच्या / सभासदांच्या सह्या घ्याव्या लागतात.
ग्रामसभेसाठी पुरेसे सदस्य वेळेवर उपस्थित झाले नाहीत तर अशी ग्रामसभा तहकूब करावी लागते. तसेच चालू असलेल्या ग्रामसभेतील काही विषय वेळेअभावी शिल्लक राहिले तर उपस्थित असलेल्या सदस्यांच्या सहमतीने अशी सभा तहकूब करता येते.
तहकूब करण्यात आलेल्या सभेच्या बाबतीत सभेला उपस्थित असलेल्या सभासदांसमोर पुढील तहकूब सभेची तारीख, वेळ, ठिकाण त्याच सभेत अध्यक्षांनी जाहीर केले पाहिजे. अशा तहकूब सभेला कोणत्याही नवीन विषयाचा विचार करता येत नाही. कार्यक्रम पत्रिकेवर नवीन विषय घेता येत नाहीत.
सभेची गणपूर्ती झाल्यानंतर सुरुवातीस मागील सभेचा इतिवृत्त सभेपुढे वाचून दाखवावे लागते. नंतर अध्यक्षांनी ते इतिवृत्त स्वतः वाचून ते कायम केल्याबद्दलचा शेरा लिहून त्याखाली शी करावी लागते. त्यानंतर पुढील विषय चर्चेत घ्यावयाचे असतात.
[कलम ११ नुसार] ग्रामसभेचे इतिवृत्त संबंधित सचिव तयार करून व्यवस्थित ठेवील. परंतु त्याच्या गैरहजेरीमध्ये सभेचे इतिवृत्त अध्यक्ष निर्देश देईल त्याप्रमाणे गावातील शाळेत असणारे शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या कोणत्याही शासकीय / निमशासकीय किंवा ग्रामपंचायतीच्या कोणताही कर्मचारी तयार करतील. सर्व विषय संपल्यावर अध्यक्ष सभा संपली असे जाहीर करून सभेचे कामकाज बंद करतील.
ग्रामसभेच्या प्रत्येक कामकाजाचे संक्षिप्त इतिवृत्त सभा झाल्यापासून १५ दिवसांच्या आत जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी [पंचायत] व गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले पाहिजे.
संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे
अंतिम सुधारित : 6/5/2020
ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसभेच्या सभा बोलावण्यास...
आदिवासी जीवनाची परंपरा आणि रूढी, त्यांची सांस्कृति...
अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य ...
पंचायत राज संस्थांना 73 व्या घटना दुरुस्तीने घटनात...