प्राप्त परिस्थितीबद्दलची मानसिक अस्वस्थता, असंतोष अगर त्या परिस्थितीचा निषेध सांघिक रीत्या अगर सामूहिक रीत्या व्यक्त करण्याकरिता तसेच तिचा प्रतिकार करण्याकरिता अगर स्वत:ला अनुकूल असे तीत परिवर्तन घडवून आणण्याकरिता युवकांनी चालविलेले अनेकविध कार्यक्रम म्हणजे युवक चळवळी होत. युवकांचा हा असंतोष, निषेध किंवा प्रतिकार त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या, त्यांना न पटणाऱ्या मूल्यांबद्दल असेल किंवा त्यांना जाचक ठरणाऱ्या नीतिनियम आणि कायद्यांबद्दलही असू शकेल. मूल्ये म्हणजे आचरणाची मार्गदर्शक तत्त्वे होत आणि नीतिनियम किंवा कायदे हे प्रत्यक्ष आचरणाशी निगडित असतात. साहजिकच आचरणनियमांबद्दलची नापसंती अधिक तीव्रपणे प्रगट होण्याची शक्यता अधिक असते.
परिस्थितीबद्दलची नापसंती तीव्र असेल, तिचा निषेध अगर प्रतिकार अधिक कडकपणे किंवा प्रभावीपणे करणे आवश्यक वाटत असेल, त्या प्रमाणात युवकांची चळवळही अधिक उत्स्फूर्त, व्यापक आणि हिंसात्मक बनण्याची शक्यता असते. त्यानुसार चळवळीचे स्वरूपही बदलत जाते. चळवळ किती तीव्र आहे, हे प्राप्त परिस्थितीबद्दलची नापसंती अगर निषेध व्यक्त करण्याकरिता अगर तिचा प्रतिकार करण्याकरिता युवकांनी कोणते कार्यक्रम हाती घेतलेले आहेत, यांवरून कळते. कार्यक्रमाच्या स्वरूपावरून चळवळीचे प्रकार ठरतात त्याचबरोबर युवकांना जाचक वाटणारी परिस्थिती ही संपूर्ण समाजात पसरलेली आहे, एका संस्थेपुरती मर्यादित आहे किंवा समाजात एका विशिष्ट राजकीय, आर्थिक अगर धार्मिक गटापुरती मर्यादित आहे, यांवरही चळवळीचे स्वरूप आणि प्रकार अवलंबून असतात. जाचक आचरणनियमांविरुद्ध चळवळ उभी राहते, तशी ती त्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि मुळात ते नियम ठरविणारे मंडळ अथवा व्यक्ती स्थानिक असल्यास त्यांच्याविरुद्ध अधिक तीव्र बनते.
जाचक परिस्थितीस कारणीभूत असलेल्या व्यक्तीविरुद्ध अगर शासकीय मंडळाविरुद्ध, कार्यालयाविरुद्ध पत्रके काढून, घोषणा देऊन आणि घोषणाफलक मिरवून प्रचार करणे, कार्यालयातील कामकाज बंद पाडणे वा शहरातील अगर त्या त्या संबंधित संस्थांमधील नित्याचा व्यवहार बंद पाडणे (यात बाजारपेठ आणि वाहतूक यांचा प्रामुख्याने समावेश होतो), कार्यालयांवर सामूहिक मोर्चे नेणे इ. प्रकार या चळवळीमध्ये येतात. हे प्रकार सर्वसामान्य इतर चळवळींमध्येही दिसून येतात आणि त्यांचेच अनुकरण युवकांकडूनही होत असते. परंतु दैनिके, मासिके इ. पत्रांद्वारे, तसेच कथा, कादंबऱ्या व विशेषत: नाटकांद्वारे प्रतिगामी वाटणाऱ्या रूढींविरुद्ध सातत्याने प्रचार करणे हेही या चळवळीमध्ये मोडते. सध्या तर भारतात युवकांची खास व्यासपीठे याकरिता आहेत आणि पथनाट्ये ही प्रचाराची प्रभावी साधने बनली आहेत.
युवकांच्या चळवळी ह्या प्रामुख्याने नागरी समाजात आणि विद्यार्थिवर्गात अधिकांशाने दिसून येतात. त्याचप्रमाणे सामाजिक परिवर्तनाशी त्या अधिक निगडित आहेत. एकीकडून त्या सामाजिक परिवर्तनाच्या उद्देशाने छेडल्या जातात, दुसरीकडून परिवर्तनातूनच त्या उद्भवतात असे म्हटले जाते. या दृष्टीने युवकांची चळवळ हे विसाव्या शतकातील आधुनिकीकरणाचे अपत्य आहे असे प्रतिपादन केले जाते.
दोन पिढ्यांमधील सुप्त अगर प्रगट संघर्ष हे केवळ आजचे वैशिष्ट्य नव्हे. अनेक शतकांपासून युवक आणि वृद्धांमधील तेढ प्रत्येक समाजात दिसून आलेली आहे. परंपरेच्या जाचक बंधनातून जरा तरी मोकळीक मिळावयास हवी, असे प्रत्येक तरुण पिढीला सतत वाटत आलेले आहे आणि प्रत्येक मावळत्या पिढीला तरुण पिढी ताळतंत्र सोडून वागते आहे, विधि - निषेधांना जुमानीत नाही म्हणून त्यांच्यावर बंधने जरा कडकपणे लादावयास हवीत, त्यांना आटोक्यात ठेवावयास हवे असे वाटत आलेले आहे. पुरातन ग्रीस देशामध्ये जुन्या पिढीतील प्रस्थापितांविरुद्ध तरुण बुद्धिमंतांनी, विद्यार्थ्यांनी बंडच पुकारले होते. या परिस्थितीला सॉक्रेटीसने नैतिक अराजकता असे म्हटल्याचा उल्लेख आहे. सॉक्रेटीसचा काळ म्हणजे ख्रिस्तपूर्व चारशे ते पाचशे वर्षांचा काळ. युवकांचा चळवळीचा इतिहास इतका जुना आहे; युवक चळवळींना प्रदीर्घ परंपरा आहे हे यावरून स्पष्ट होते. समाजातील प्रत्येक स्तरावरील युवकाला पारंपारिक बंधने जरी जाचक वाटत असली आणि त्याविरुद्ध बंड करून उठावे असे प्रत्येक युवकालाच वाटत असले, तरी प्रत्यक्षात बंड करून उठणे हे सर्वांनाच शक्य नसते. गरिबांना, ज्यांचे समाजातील स्थान असुरक्षित आहे, ज्यांना केवळ जगण्याकरिता सतत झगडावे लागते अशांना प्रस्थापितांविरुद्ध स्वयंप्रेरणेने बंड करून उठणे अशक्यप्राय होते. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरुद्धच्या युवक चळवळीतील सहभागी अगर नेतृतव गाजविणारे हे नेहमीच उच्च, सत्ताधारी, श्रीमंत वर्गातून आलेले दिसतात. त्यांचे समाजातील स्थान सुरक्षित असते. इतिहासात अमीर - उमराव आणि सरदार यांच्याच मुलांनी बंड पुकारल्याची उदाहरणे अनेक आहेत. परंतु युवक चळवळीला प्रेरणा प्रामुख्याने समाजात असुरक्षिततेने ग्रासलेल्या असंख्य सामान्य युवकांकडूनच मिळते हेही खरे आहे. ही असुरक्षितता कशी निर्माण होते हे पाहू गेल्यास, देशोदेशींच्या युवक चळवळींच्या इतिहासावरून काही ठळक गोष्टी नजरेसमोर येतात.
युवक चळवळींची विविध कारणे तपासावयाच्या संदर्भात एक गोष्ट नमूद करावयास हवी. ती म्हणजे युवकांची चळवळ ही आज बहुतेक देशांमध्ये महाविद्यालयीन अगर पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये अधिक रुजलेली आहे आणि ती त्यांच्यापुरती मर्यादित राहिली आहे, ही होय.
युवकांचे वय कमी म्हणून साहजिकच त्यांना अनुभव कमी आणि त्यामुळेच बहुधा त्यांची वृत्ती अधिक साहसी, भावनाप्रधान असते. व्यवहारातील कठोरपणाची जाणीव त्यांना झालेली नसते. म्हणून ते आदर्शवादी आणि कल्पनेच्या जगात वा स्वप्नसृष्टीत वावरणारे तसेच अधिक संवेदनाक्षम आणि भावनाशील असतात. तुलनेने त्यांच्यावर प्रापंचिक जबाबदाऱ्याही कमी असतात. त्यामुळे अन्यायाविरुद्ध झगडण्याची ईर्षा आणि जिद्द त्यांच्यात अधिक तीव्र असते आणि प्रत्यक्ष चळवळीत उडी घ्यावयाचे साहसही तेच करू शकतात. म्हणूनच जगातील अनेक चळवळींच्या इतिहासात प्रौढ नेतृत्वाखाली युवकांनी अत्यंत यशस्वीपणे स्वयंसेवकांचे महत्त्वपूर्ण काम केल्याचे दिसून येते. ‘युवक नेतृत्व’ हा तसा एक विरोधाभासच आहे. युवकांना नेतृत्व करण्याइतपत अनुभव, ज्ञान, वैचारिक परिपक्वता - प्रगल्भता, व्यवहारकौशल्य, सारासार विवेक आणि उतावळेपणाने कोणताही निर्णय न घेता तो धिमेपणाने घेण्याची प्रवृत्ती असण्याची शक्यता कमीच असते. केवळ युवकांच्या नेतृत्वाखाली युवकांनी चालविलेल्या चळवळी ह्या अधिक विध्वंसक, दिशाहीन आणि अनेक परस्परविरोधी गटांमध्ये विभागलेल्या आणि त्यामुळे परिणामी अपेशी ठरलेल्या आहेत असेच दिसून येईल.
युवक चळवळी ह्या प्रामुख्याने नागरी विभागात दिसून येतात. इतर सर्वच चळवळींप्रमाणे युवक चळवळींचे नेतृत्वही नागरी भागातूनच आलेले असते आणि त्याचे केंद्रीय कार्यालयही नागरी भागातच असलेले दिसून येते. नागरी विभागातली युवकांची चळवळ ही विद्यार्थी आणि महाविद्यालय किंवा विद्यापीठ यांच्यातील अधिकारी व अध्यापक वर्ग यांच्या संघर्षातून उद्भवलेली दिसून येते. विद्यार्थ्यांची ह्या स्वरूपाची चळवळ एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून मध्य यूरोपीय देशांमध्ये प्रथम सुरू झाली. आधुनिकीकरणाच्या संदर्भात जुन्या मूल्यांना आणि चालीरीतींना चिकटून राहणारे हे प्रतिगामी, सनातनी आणि उजव्या विचारसरणीचे प्रस्थापित वर्गाचे असे समजले जात असत आणि नव्या मूल्यांचा स्वीकार करणारे हे परिवर्तनशील, पुरोगामी, आधुनिक आणि डाव्या विचारसरणीचे प्रगतिशील असे समजले जात असत. अर्थात हा दृष्टिकोनही तसा युवकांचाच. युवक हे पुरोगामी विचारसरणीचे आणि परिवर्तनशील होते आणि प्रथम त्यांचा संघर्ष विद्यापीठातील अध्यापक व अधिकारी वर्गाशी आला. विद्यापीठातील सत्तास्थानावर असलेले लोक त्यांना प्रस्थापित, सनातनी वाटू लागले. यूरोपीय युवक तेव्हा ध्येयवादाने प्रेरित झाले होते आणि समाजातील इतर व्यापक चळवळींतही सहभागी होत असत.
विद्यापीठातील प्रस्थापित नियमांविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलनांद्वारे आपला असंतोष जसा व्यक्त केला आहे तसा सामाजिक अन्यायाविरुद्ध आणि कालबाह्य चालीरीतींविरुद्धही व्यक्त केला आहे. देशोदेशींचा इतिहास पाहिला तर आपणास असे दिसून येईल, की राष्ट्रवादी, स्वातंत्र्यवादी चळवळीत क्रियाशील कार्यकर्ते आणि आघाडीचे उत्स्फूर्त स्वयंसेवक म्हणून विद्यार्थीच अग्रभागी राहिले आहेत. कारण वर युवकांची म्हणून जी लक्षणे सांगितली आहेत ती विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रकर्षाने दिसून येतात. शिवाय नवनवीन सिद्धांत आणि विचार हे विद्यार्थ्यांमध्ये इतर समाजाच्या मानाने आधी पसरतात आणि रुजतात. नवनवीन विचारांचे, एकूणच नावीन्याचे आकर्षण युवकांमध्ये आणि त्यातही विद्यार्थ्यांमध्ये अधिक असते. विद्यार्थी हे आदर्शवादाने अधिक सहजपणे प्रेरित होतात.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास यूरोपमध्ये मॅझिनीच्या नेतृत्वाखाली फोफावलेल्या तरुण यूरोप आंदोलनाची (यंग यूरोप मूव्हमेंट) प्रमुख प्रेरणा राष्ट्रीयताच होती आणि त्यात प्रभावी भूमिका बजावणारे हे विद्यार्थिदशेतील युवकच होते. परंतु त्यात अगदीच पोरवयातील भावनाशील वर्ग नव्हता, तर विशीच्या पुढचा आणि लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य या विचारांनी प्रेरित झालेला विद्यार्थी वर्ग होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रशियामध्ये बुद्धिजीविवर्गामध्ये विनाशवाद वा विध्वंसवाद (निहिलीझम) उदयास आला. सनातनी भावनात्मकता आणि गूढगुंजनवाद यांच्या विरुद्ध तिथल्या युवकांनी बंड पुकारले. यात अर्थातच विद्यार्थ्यांचा, नवशिक्षितांचा भरणा अधिक होता. मॅझिनीप्रेरित आंदोलनामागे आदर्शवाद होता, तर रशियातील आंदोलनामागे भौतिकवाद आणि उपयुक्ततावाद अधिक होता असे म्हटले जाते.
विद्यार्थ्यांनी सामाजिक आणि राजकीय अशा व्यापक उद्दिष्टांकरिताच चळवळी केल्या आहेत असे नव्हे, तर विद्यापीठीय अगर महाविद्यालयीन व्यवस्थापनातील त्यांना जाचक वाटणाऱ्या तात्कालिक विषयांबद्दलही त्यांनी चळवळी – आंदोलने केली आहेत. ही आंदोलने निवासी विद्यापीठांमध्ये अधिक प्रमाणात झालेली आहेत. साहजिकच महाविद्यालये अगर विद्यापीठांमध्ये विशिष्ट अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळणे येथपासून विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणे, वसतिगृहात अनेक सोयी – सवलती असणे, त्यावर शुल्क अगदी जुजबी आकारणे, वर्गात येणे – जाणे यावर निर्बंध नसणे, वसतिगृहातून बाहेर जाणे व परत येणे यावर वेळेचे बंधन नसणे, वेषभूषेवर तथा खेळकरमणुकीवर बंधने नसणे व शेवटी परीक्षेत व निकाल लावण्यात अनेक प्रकारच्या सवलती मिळणे येथपर्यंत सर्व विषयांबद्दल विद्यार्थ्यांनी आंदोलने छेडली आहेत. त्यांच्या संख्याबळापुढे व विध्वंसक सामर्थ्यापुढे माघार घेऊन काही विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी काही नियम शिथिल केल्याची उदाहरणे आहेत. भारतीय विद्यार्थ्यांच्या व पर्यायाने युवकांच्या संदर्भातही कमीअधिक फरकाने हीच परिस्थिती पहावयास मिळते. स्वातंत्र्यपूर्व चळवळीत यूरोपप्रमाणेच भारतीय विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादाने प्रेरित होऊन हिरिरीने भाग घेतला होता. यूरोप आणि भारत अगर आशिया यात एक मुख्य फरक म्हणजे यूरोपमधील सामाजिक चळवळींना सामाजिक समता, लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यांची दीर्घकालीन पार्श्वभूमी आहे. एकोणिसाव्या शतकात तेथे औद्योगिकीकरणाची प्रक्रिया जोमाने सुरू झाली. त्यामुळे व्यक्तीवरील पारंपारिक आचारविचारांची, कुटुंबादी संघसंस्थांची बंधने शिथिल झाली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आणि सामाजिक समतेच्या मूल्यांना प्रत्यक्ष सामाजिक परिस्थितीचा आधार मिळाला. परंतु भारतात अगर नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया खंडातील इतर राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्य, समता या मूल्यांचा वैचारिक पातळीवर प्रचार झाला असला आणि उच्च वर्गांनी तत्त्व म्हणून त्यांचा स्वीकार केला असला, तरी परिस्थिती या तत्त्वांना/मूल्यांना फारशी अनुकूल दिसत नाही. म्हणजे येथील औद्योगिकीकरणामुळे पारंपारिक बंधनातून व्यक्ती अजूनही मुक्त झालेली नाही. या कारणास्तव कुटुंब, नातेसंबंध, जात, धर्म, प्रदेश, भाषा इत्यादींच्या आधारे निर्माण होणाऱ्या भिन्नभिन्न गटांपुरती व्यक्तीची निष्ठा मर्यादित राहण्याचा धोका येथे उद्भवतो. राष्ट्रबांधणीमध्ये यामुळे अडथळा निर्माण होतो. स्वातंत्र्यपूर्व काळातच नव्हे, तर स्वातंत्र्योत्तर काळातही भारतात राष्ट्रनिष्ठेपेक्षा संकुचित निष्ठेवर आधारित अगर राष्ट्रनिष्ठेबरोबरच इतर वर उल्लेखिलेल्या संकुचित निष्ठा उराशी बाळगून बांधलेल्या युवकांच्या अगर विद्यार्थ्यांच्या संघटना अस्तित्वात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्र सेवादल आणि काँग्रेस सेवादल ह्या राष्ट्रवादी व राष्ट्रव्यापी संघटना होत्या. परंतु त्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, द्रविड कळघम, द्रविड मुन्नेत्र कळघम, अकाली दल इ. प्रदेशवादाला अगर धर्मनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या इतर संघटनाही होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात काही युवक आणि विद्यार्थिसंघटनांमध्ये आणखी भर पडली आहे. परंतु जाति – पंथ – धर्म – प्रदेश – विरहित अशा वैचारिक भूमिकेवर आधारलेल्या संघटना तशा कमीच आहेत.‘युवक काँग्रेस’ आणि ‘युवक क्रांतिदल’ ह्या संघटना अनुक्रमे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या प्रेरणेने आणि नियंत्रणाखाली चालत असत. त्याचप्रमाणे ‘ऑल इंडिया स्टूडंटस फेडरेशन’ ही संस्था साम्यवादी विद्यार्थ्यांची आणि ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ ही हिंदुत्ववादी विचारसरणीची म्हणून अस्तित्वात आली. त्याचप्रमाणे पंजाबमधील शीख पंथीयांची म्हणून ‘ऑल इंडिया शीख स्टूडंटस फेडरेशन’ ही लढाऊ वृत्तीची संघटना अस्तित्वात आली. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या विकासाकरिता व त्यांच्या काही खास समस्या सोडविण्याकरिता ‘दलित पँथर’ ही संघटना अस्तित्वात आली. यातही युवक आणि विद्यार्थीच अधिक क्रियाशील आहेत.
मराठवाड्याच्या विकासाकडे, रेल्वे रुंदीकरणाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधावे म्हणून १९७४ साली जे आंदोलन झाले, त्यात विद्यार्थ्यांच्या संघटनाच प्रामुख्याने होत्या. सत्ताधारी पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेली ‘विद्यार्थी संघटना’ मात्र त्या आंदोलनात अधिकृत रीत्या सामील झाली नव्हती. या सर्व विद्यार्थ्यांच्या अगर युवकांच्या संघटनांचे संपूर्ण नेतृत्व कधीच विद्यार्थ्यांकडे अगर युवकांकडे नव्हते. तात्त्विक बैठक मिळवून देण्याकरिता अगर व्यावहारिक चाकोरीला स्थिरता यावी, पाया भक्कम व्हावा इ. कारणांकरिता प्रौढांचे मार्गदर्शन अगर प्रत्यक्ष नेतृत्व आवश्यक ठरले आहे. संघटनेमध्ये सर्वच सदस्य युवक असले तर सर्वमान्य नेता लाभणे कठिण होते आणि परिणामी संघटनेमध्ये फाटाफुटीला सुरुवात होते.
महाराष्ट्रात औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे म्हणून १९७८ साली जे आंदोलन दलित वर्गांनी केले त्याचे नेतृत्वही प्रौढांकडेच होते. मागणीचे आद्य पुरस्कर्ते हे काही प्राध्यापक होते. त्या मागणीला विरोध करणारेही प्रतिष्ठित प्रौढ नागरिकच होते. नामांतर विरोधी विद्यार्थी कृतिसमिती ही नंतर स्थापित झाली.‘दलित पँथर’ आणि औरंगाबाद अगर मराठवाड्याच्या बाहेरील दलित संघटना यात नंतर सामील झाल्या. त्याचप्रमाणे पंजाबमधील शीख विद्यार्थी संघटनेमागेही संघटनेबाहेरचे किंबहुना देशाबाहेरचेही लोक आहेत असा भारत सरकारचाच दावा आहे; यावरून वरील विवेचनाला पुष्टीच मिळते.
स्थानिक प्रश्नांपैकी व्यावसायिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमांत प्रवेश मिळविणे आणि त्याकरिता अनुसूचित जाति - जमातींकरिता केलेल्या आरक्षणांविरुद्ध आंदोलन करणे हे गुजरात आणि अलीकडे आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेले आहे. परंतु विद्यार्थ्यांनी व्यापक राजकीय - सामाजिक उद्दिष्टांकरिताही आंदोलन केले आहे. हे गुजरातच्या ‘नव - निर्माण समिती’ च्या आंदोलनावरून आणि आसाममधील ‘नवसंग्राम गणतंत्र परिषदे’ ने दीर्घकाळ आणि अहिंसक रीतीने चालविलेल्या आंदोलनांवरून स्पष्ट होते. या दोन्ही आंदोलनांचा राजकीय परिस्थितीवर नाट्यमय परिणाम झाला. दलित पँथरप्रमाणे आदिवासींच्या आंदोलनांमध्येही नवशिक्षित आणि विद्यार्थिवर्ग हा अग्रभागी राहिला आहे.
विद्यार्थी आंदोलनाने ठिकठिकाणचे स्थानिक व्यवस्थापनाचे प्रश्न काही प्रमाणात सुटले आहेत असे वाटते. मराठवाडा विकासासारख्या सामाईक प्रश्नावर एकमुखी आंदोलन उभे राहिले म्हणून शासनाला त्याकडे लक्ष पुरविणे आवश्यक वाटले. परंतु संकुचित क्षेत्रात काम करणाऱ्या, संकुचित ध्येयाने प्रेरित झालेल्या संघटनांनी संकुचित अगर स्वार्थी हेतूकरिता कितीही तीव्र अगर दीर्घ आंदोलने छेडली, तरी ती यशस्वी होतीलच असे नाही. उलट त्यांविरुद्ध जनमत तयार होऊन समाजात दुही माजण्याची आणि राष्ट्राला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हा धोका राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सैनिकी अशा सर्व क्षेत्रांत निर्माण होतो.
युवक चळवळीच्या पार्श्वभूमीत युवकांची अस्वस्थता, असंतोष आणि त्यांच्या भोवतालच्या सामाजिक परिस्थितीबद्दलची चीड, निषेध दडलेला आहे हे निश्चित. ही अस्वस्थता, चीड, असंतोष - निषेध यांच्या मागे नेमकी कोणती कारणे आहेत हे पाहणे उद्बोधक ठरेल.
सामाजिक असंतोषाची तीन कारणे प्रामुख्याने सांगितली जातात : (१) सापेक्ष दारिद्र्य किंवा गरजपूर्तीचा अभाव, (२) अन्यायाची जाणीव आणि (३) सामाजिक स्थानांतील विसंगती.
(१) व्यक्तीला अगर विशिष्ट गटाला, या संदर्भात युवकांना किंवा विद्यार्थ्यांना जे जे मिळावयास हवे असे वाटते ते मिळत नाही, व्यवस्थापनाकडून ज्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा साहजिकच त्यांचा अपेक्षाभंग होतो. त्यांच्यात असंतोष निर्माण होतो. जेथे अपेक्षा उंचावलेल्या असतात तेथे अपेक्षाभंग क्षुल्लक कारणांनी होतो. १९६० च्या नंतरच्या पाश्चिमात्य देशांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा असंतोष हा उच्च वर्गाच्या लोकांची मुले शिकत असलेल्या, अनेक सोयी - सवलती असलेल्या उदारमतवादी महाविद्यालयांत अधिक दिसून आला आणि निषेध त्यांच्याकडूनच झाला असे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरात उच्च शिक्षणाकरिता येतात तेव्हा त्यांना त्यांच्या दारिद्र्याची जाणीव होते.
(२) यातूनच अन्यायाच्या जाणिवेचा उगम होतो. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या कक्षा जशा विस्तारत जातात त्या प्रमाणात समाजातील खालच्या स्तरांतील लोकांमध्ये उच्च वर्गातील सुशिक्षित लोकांनी सतत त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदाच घेतला, ही भावना पसरते आणि आपल्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटू लागते. अर्थातच याची चीड विद्यार्थिवर्गामध्ये अधिक दिसून येते. दलित वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ही चीड असणे स्वाभाविक आहे; परंतु उच्च वर्गातून आलेले ध्येयवादी विद्यार्थीही या असंतोषात, चिडीत सहभागी होतात असे दिसून येते.
राष्ट्राभिमान आणि देशभक्ती हे याच जाणिवेचे आविष्कृत रूप होय. याच भावनेने प्रेरित होऊन भारतीय युवकांनी, विद्यार्थ्यांनी इंग्रजी राजवटीविरुद्ध प्रखर लढा दिला. अन्याय झाला किंवा नाही याची जाणीवही मूल्यात्मक असून ती वस्तुनिष्ठ न राहता आत्मनिष्ठ पातळीवर राहते; परंतु मूल्यात्मक जाणीवही शेवटी वास्तवाच्या ज्ञानावरच अवलंबून असते. अशा रीतीने अज्ञानात सुख असते आणि ज्ञान हे जाणिवा विस्तारणारे प्रभावी साधन आहे हे स्पष्ट होते.
(३) व्यक्ती एकाच वेळेला अनेक भिन्न स्तरांवरील व भिन्न कार्यक्षेत्रांतील गटांना सदस्य म्हणून वावरत असते. या सर्वच गटांमध्ये सारखीच प्रतिष्ठा मिळावयास हवी, मान - मरातब मिळावयास हवा असे व्यक्तीला वाटणे स्वाभाविकच आहे; परंतु सर्व गटांमध्ये व्यक्तीच्या वाट्याला सारखेच स्थान येते वा प्रतिष्ठा मिळते असे नव्हे. स्थानानुसार मान - मरातब मिळणे हा नियम झाला. परंतु ही स्थान - विसंगती आणि त्यातून उद्भवणारी प्रतिष्ठा अगर दर्जा - विसंगती ही असंतोषाला कारणीभूत होते. समाजातल्या एखाद्या गटालाच भिन्न प्रदेशातील त्याच्या स्थानमानांच्या तुलनेने अगर त्या गटाच्या ऐतिहासिक स्थानमानाच्या किंवा तत्कालीन अपेक्षांच्या तुलनेने ही स्थान - विसंगती जाणवत असेल, तर तो सबंध गटच असंतुष्ट राहण्याचा संभव असतो. शहरात ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी असंतुष्ट राहणे किंवा न्यूनगंडाने पछाडले जाणे, तसेच भारतीय समाजात दलित वर्गामध्ये आणि विशेषतः त्यांच्यातील युवक वर्गामध्ये – त्यातही महाविद्यालयीन युवकांमध्ये – असंतोष धुमसत राहतो ही या विसंगतीच्या जाणिवेची उदाहरणे होत. ही विसंगती आर्थिक, राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक निकषांवर आधारलेल्या विषमतेतूनही निर्माण होऊ शकते. येथेही अपेक्षा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांतील तफावतीमुळेच असंतोष निर्माण होतो असे दिसून येईल.
वैयक्तिक अगर सामूहिक असंतोष निर्माण व्हावयास वरील कारणे सांगितली जातात; पंरतु त्यातून आंदोलन अगर चळवळ हमखास उद्भवेलच असे नाही. असंतोषाबरोबरच समाजात अन्य काही परिस्थितिजन्य कारणे घडून यावी लागतात : (१) समाजाच्या चाकोरीत अथवा बंदिस्त चौकटीत असंतोषपरिहाराचा समाजमान्य आणि वैध मार्ग उपलब्ध नसणे किंवा त्या मार्गात अडथळे निर्माण होणे; (२) असंतुष्ट लोकांमध्ये, समदु:खी व्यक्तींमध्ये परस्परसंपर्क आणि दळणवळण वाढणे; (३) आपले उद्दिष्ट चळवळीच्या मार्गाने साध्य होण्याची शक्यता वाटणे अगर अशी शक्यता वाढणे आणि (४) चळवळीला सैद्धांतिक विचारप्रणालीचा आधार असणे किंवा तसा आभास युवकांच्या मनात निर्माण होणे.
असंतोषाबरोबरच वरील चार प्रकारची परिस्थिती एकाच वेळेस निर्माण झाली म्हणजे ती चळवळीला अनुकूल ठरते असे म्हटले जाते.
(१) ध्येय साधण्याकरिता, असंतोषाचा परिहार करण्याकरिता समाजात वैध मार्ग उपलब्ध असावे लागतात. राहणीमान उंचावणे आणि त्यामुळे मिळणाऱ्या सुखांचा, प्रतिष्ठेचा उपभोग घेणे हे बहुतेकांचे उद्दिष्ट असते आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याचे शिक्षण आणि त्यातील प्रावीण्य हे एकमेव साधन सर्व समाजांत सर्वांना सारख्याच प्रमाणात उपलब्ध असावे लागते. तसे जर नसले तर उच्च ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती उच्च शिक्षणाच्या वर्गात प्रवेश मिळविण्याकरिता, त्यात उच्च श्रेणी मिळविण्याकरिता धडपडू लागतात; परंतु जेव्हा त्यांचे न्याय्य प्रयत्नही हाणून पाडले जातात, ते अयशस्वी ठरतात अगर न्याय्य प्रयत्नांचा मार्गच त्यांना खुला राहात नाही तेव्हा त्यांच्यात असंतोष वाढतो - बळावतो. जीवनातील अन्य क्षेत्रातील विषमतेमुळेही असंतोष निर्माण होतो. सार्वजनिक ठिकाणी, शाळा, विहिरी, तळी, मंदिरे इ. ठिकाणी सर्वांना मुक्त अगर सारखा प्रवेश नसला म्हणजे प्रतिबंध झालेल्या वर्गामध्ये असंतोष पसरतो. सर्व थरांतील असंतोषाची प्रतिक्रिया ही उसळत्या रक्ताच्या युवकांमध्ये तीव्र स्वरूपाची आणि तात्काळ दिसून येते आणि विषमतेला चळवळीच्या रूपाने प्रत्यक्ष कृतीतून प्रत्युत्तर देणारे युवकच असतात. प्रौढ नेते असले, तरी ते पडद्यामागे राहून युवकांना आघाडीवर ठेवतात.
(२) असंतुष्ट लोकांमध्ये परस्परसंपर्क आणि संबंध वाढावयास हवेत. म्हणजे त्यांच्यात स्वतःच्या संघ - शक्तीची जाणीव निर्माण होते. आपण एकटे दुकटे नाही, या जाणिवेने प्रत्यक्ष कृतीच्या वेळेला त्यांचा ⇨ जमाव (क्राउड) निर्माण होऊ शकतो. एकमेकांच्या संपर्काने आणि एकत्र विचार - विनिमय करण्याने त्यांच्या चळवळीला एक वैचारिक बैठक, अधिष्ठान प्राप्त होते.
(३) चळवळीचे यश एकजुटीमध्ये असते. सर्वच असंतुष्ट लोक चळवळीमध्ये सामील असले, तर यशाची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर प्रतिपक्ष असलेल्या शासकीय अधिकारी अगर व्यवस्थापकीय वर्गामध्ये एकजूट नसली; चळवळीने स्वीकारलेल्या संप, बंद आदी मार्गांनी व्यवस्थापनाचे अधिक नुकसान होणार असले, तर यशाची अधिक खात्री देता येते. विद्यार्थ्यांच्या प्राथमिक चळवळीला अगर चळवळीच्या प्रारंभिक अवस्थेत तिचे स्वरूपही सौम्य असते. तेवढ्याने व्यवस्थापनाचे नुकसान होत नसते आणि प्राथमिक अवस्थेनंतर चळवळ थांबली अगर काही मागण्या मान्य करून थांबविता आली, तर युवकांना चळवळ यशस्वी झाली असेच वाटते व म्हणूनच वारंवार चळवळीचे हत्यार उपसले जाण्याची शक्यताही वाढते.
(४) औद्योगिकीकरणाचे पर्व पाश्चिमात्य देशांत सुरू होऊन असंख्य कामगारांचा आणि त्याविरुद्ध मूठभर उद्योगपतींचा वर्ग तयार झाला. त्या आर्थिक विषमतेतून समतेचे, साम्यवादाचे, समाजवादाचे तत्त्वज्ञान उदयाला आले. याला कार्ल मार्क्सकडून सैद्धांतिक आधार मिळाला. किंबहुना मार्क्सच्या विचारांपासूनच साम्यवादास प्रेरणा मिळाली आणि देशोदेशींचे सुशिक्षित युवक या तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट झाले. विकसनशील देशांतील युवकांना त्यांचा आर्थिक मागासलेपणा अधिक भेडसावीत होता आणि आर्थिक विषमता आणि माणसा - माणसांमधील कृत्रिम बंधने अधिक जाचक वाटत होती. समता, व्यक्तिस्वातंत्र्य, समान संधी इ. मूल्ये ही सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवहारांची मार्गदर्शक तत्त्वे ठरली. यांच्या आधारे सत्तास्थानाविरुद्ध बंड करून उठण्याइतपत युवक धीट बनले. लोकशाही तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्तीला अगर गटालाच सत्तेच्या केंद्रस्थानी आपण असावे असे वाटू लागले. युवकही याच ईर्षेने प्रेरित झाले आहेत. म्हणूनच त्यांच्या चळवळीचा उद्रेक वारंवार सत्तास्थानांच्या विरुद्ध निर्माण होतो.
यांशिवाय, सामाजिक गतिशीलतेचा अतिरेक, समाजात संपूर्णपणे सामावले न जाणे अगर समरस न होणे, सामाजिक अलिप्तता, आपलेपणाचा अभाव, कौटुंबिक संबंधांची अगर आप्त - स्वकीयांची जवळीक नसणे इ. कारणांमुळेही माणसे चळवळीत ओढली जातात. गतिशीलता ही भौगोलिक असो किंवा सामाजिक स्थानांची असो, तिचा अतिरेक झाला म्हणजे व्यक्ती कोणत्याही स्तरावर अगर प्रादेशिक मर्यादा असलेल्या कोणत्याही समाजात स्थिरावत नाहीत. म्हणून त्यांचे घनिष्ठ असे संबंध कुठेच प्रस्थापित होत नाहीत. त्यांना कोणाबद्दलही आणि कशाबद्दलही भावनिक स्तरावर आपुलकी वाटेनाशी होते. असे बिनबुडाचे उपरे लोक लवकर अगर सहजपणे चळवळीमध्ये ओढले जातात, असे म्हटले जाते. अशा प्रकारचा व्यापक समाजाबद्दलचा आपलेपणाचा अभाव, वर उल्लेखिलेल्या इतर दोन प्रकारच्या लोकांमध्येसुद्धा दिसून येतो.
युवकांची चळवळ ही विधायक होऊ शकते तशी विध्वंसकही होऊ शकते. युवकांची शारीरिक कुवत, मनाची खंबीरता आणि जिद्द ही दुर्दम्य असते, ती सहसा दुर्लक्षून चालणार नाही. म्हणूनच युवकांच्या उत्साहाला, त्यांच्या ध्येयवादाला, त्यांच्या अस्मितादर्शनाला योग्य ती – विधायक - वाट करून द्यावी, व्यासपीठ मिळवून द्यावे. म्हणून सत्तेकरिता प्रयत्नशील असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षामध्ये युवकांकरिता एक खास विभाग काढल्याची उदाहरणे सर्वत्र आढळतात. याशिवाय, ठिकठिकाणी युवक मंडळे, क्रीडामंडळे, वक्त्तृत्वाच्या स्पर्धा, नाट्यमंडळे आदी युवकांच्या आशा - आकांक्षांना जोपासणाऱ्या, त्यांना मूर्तरूप देणाऱ्या संस्था निघाल्या आहेत आणि त्या तशा निघणे योग्यही आहे.
संदर्भ : 1. Eisestadt. S. N. From Generation to Generation, Chicago, 1956.
2. Eisenstadt. S. N. Modernisation : Protest and Change, New Delhi, 1969.
3. Gesell, Arnold; Ilg. F. L.; Ames. L. B. Youth : The Years From ten to Sixteen, New York, 1956.
4. Gupta. R. C. Youth in Ferment, Delhi, 1968.
5. Mukherjee, Dhurjati, Youth : Change and Challenge, Calcutta, 1977.
6. Musgrove, F. Youth and the Social Order, New York, 1964.
7. The World Assembly of Youth (India), Youth in India Today; A Report of the Survey on the Attitudes of Youth and the Values to which they Remai Attached, New Delhi, 1963.
८. धर्माधिकारी, चंद्रशेखर, युवा चळवळ, नागपूर, १९८६.
लेखक: मा. गु. कुलकर्णी
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/15/2020
बर्ट्रड रसेल यांच्या प्रेरणेने जागतिक सुरक्षा व न...
जळगाव येथील किशोर कुळकर्णी हे आपल्या सुंदर अक्षर च...
ब्राह्मणवर्गाच्या धार्मिक वर्चस्वाविरुद्ध ब्राह्मण...
ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक होय. त्या...