অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शौचालय बांधा, वर्षभर ‘मोफत दळण’ मिळवा

शौचालय बांधा, वर्षभर ‘मोफत दळण’ मिळवा

विदर्भातला बुलढाणा जिल्हा. तिथल्या मेहकर तालुक्यातलं दुर्गम पांगरखेड गावं. ४२२ घराचं आणि २,००० लोकसंख्येचं. मोजक्याच १९८ घरांमध्ये शौचालयं. गावच्या सरपंच आहेत अंजली सुर्वे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीत पाच महिला तर चारच पुरुष सदस्य. सध्या सुरु असलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत पांगरखेडच्या सरपंचानीही एक आगळीवेगळी योजना जाहीर करून गावं हागणदारी आणि दुर्गंधीमुक्त करण्याचं ठरवलं आहे.‘शौचालय बांधा, वर्षभर ‘मोफत दळण’ मिळवा’ - योजनेच्या नावातच वेगळेपणा दिसून येतो. नुकतीच म्हणजे १ सप्टेंबरपासून या योजनेला सुरुवात झाली आहे.

वर्षभरापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नव्या सदस्यांनी गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी इतर आदर्श गावांचा अभ्यासदौरा केला होता. पांगरखेडही आदर्श गावं व्हायला हवं हे तेव्हाच त्यांच्या मनाने घेतलं. अर्थातच मुख्य प्रश्न होता शौचालयं असण्याचा आणि ती वापरण्याचा. सरपंच अंजली सुर्वे यांनी बायकांचा विचार केला. बाईला उघड्यावर शौचाला जावं लागतं आणि घरातलं दळण आणण्यासारखं कामही तिलाच करावं लागतं. मग ज्यांच्या घरात शौचालय आहे त्यांना मोफत दळण दळून दिलं तर आपोआपच बाकी कुटुंबंही घरात शौचालय बंधायला तयार होतील. या विचारातून ही योजना आकाराला आली. ‘कुठलीही गोष्ट फ्री मिळतेय, कशावर काही फ्री आहे तर घ्यायचं’ ही मानसिकताही इथे उपयोगी पडल्याचं सरपंच अंजलीताई सांगतात.

यासाठी ग्रामपंचायतीने स्वखर्चाने पीठगिरणी खरेदी केली. पीठगिरणीचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायत आपल्या उत्पन्नातून करणार आहे. ‘ना नफा ना तोटा' या तत्वावर ही योजना राबविण्याचा निर्णयही घेतला आहे. अर्थातच कितीही फ्री असलं तरी यासाठी एक नियमावली केली आहे. कुटुंबाकडे शौचालय असणं गरजेचं आहे आणि ज्या कुटुंबाने ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर भरलाय, त्या कुटुंबातील प्रति व्यक्ती ९ किलो धान्य दळून दिलं जाणार आहे. लग्न, बारसं, साखरपुडा आणि तेराव्याच्या कार्यक्रमासाठी लागणारं दळणसुद्धा नाममात्र १ रुपये प्रति किलोप्रमाणे दळून मिळणार आहे. तसंच गावातील सार्वजनिक कार्यक्रमाला लागणारं दळणही १ रुपये प्रति किलोप्रमाणे मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांसाठी तसं कार्डही छापून दिलं आहे. या योजनेमुळे संपूर्ण गाव हागणदारीमुक्त, स्वच्छ, सुंदर होऊ शकेल असा विश्वास सरपंचताईंना आहे.

पांगरखेड ग्रामपंचायतीने 'बेटी बचाओ बेटी पढाओ', महिलांसाठी शिलाई आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण, जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकवर्गणीतून ई -लर्निंग, गावातील रस्ते तयार करून सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालेबांधणी, स्वच्छतासंदेश देणाऱ्या म्हणींचं घरांच्या भिंतींवर लेखन असे अनेकानेक उपक्रम केले आहेत. महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीने महिलांच्या आणि किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला असून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

गाव स्वच्छ करण्यासाठी अनोख्या योजनेची शक्कल या ग्रामपंचायतीने लढवली आहे. ही योजना पांगरखेडकरांना शौचालय वापरायला, गाव हागणदारीमुक्त करायला उद्युक्त करो आणि पांगरखेडपासून अन्य गावांनाही प्रेरणा मिळो, हीच इच्छा

माहिती संकलन - अमोल सराफ

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate