অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गाव हागणदारीमुक्त करूनच ग्रामसेवक विभुते चढले बोहल्यावर

गाव हागणदारीमुक्त करूनच ग्रामसेवक विभुते चढले बोहल्यावर

सिन्नर तालुक्यातील हिवरे गाव हागणदारी मुक्त करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अशावेळी तरुण ग्रामसेवक किशोर विभुते यांनी गाव हागणदारीमुक्त होईपर्यंत विवाह न करण्याचा निश्चय केला. बाहेरच्या जिल्ह्यातील तरुण आपल्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचाही त्याग करीत असल्याचे पाहून ग्रामस्थदेखील पुढे सरसावले.... आणि अवघ्या काही महिन्यातच गाव हागणदारी मुक्त झाले.

सिन्नर पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरे गावात एकूण 351 कुटुंब आहेत. त्यापैकी 174 कुटुंबांकडे शौचालय होते. उर्वरीत 177 कुटुंब शौचालय बांधण्यासाठी पुढे येत नव्हते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सिन्नर पंचायत समिती येथे घेतलेल्या बैठकीत शौचालय उभारणीसाठी ग्रामस्थांना तयार करण्याचे आव्हान कोण स्वीकारेल, असा सहज प्रश्न उपस्थित केला असता विभुते यांनी कोणताही विचार न करता ते स्वीकारले. एवढेच नव्हे तर गाव हागणदारीमुक्त होईपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय बोलून दाखविला. काहींनी त्यांना यापासून परावृत्त करण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले.

विभुते हे मुळेचे लातूर जिल्ह्यातील नळेगावचे. एक हुशार आणि धडाडीचे ग्रामसेवक म्हणून आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीसच त्यांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. हीच धडाडी दाखवीत त्यांनी ग्रामस्थांना तत्कालिन सरपंच लता सहाणे, विद्यमान सरपंच विमल बिन्नर यांच्यासह घरोघरी जाऊन समजाविण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. विविध बैठकातून मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे आणि ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी देखील बैठकांमधून विभुते यांचे उदाहरण देत ग्रामस्थांनी गावासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. विभुते यांच्या निर्णयामुळे ग्रामस्थांच्या मानसिकतेत हळूहळू परिवर्तन झाले.

दरम्यान जून 2016 मध्ये विभुते यांचा साखरपुडा झाला. तत्पूर्वी गावात 2014-15 मध्ये 14 आणि 2015-16 मध्ये 107 कुटुंबांनी शौचालय बांधले होते. या कुटुंबांना रुपये 12 हजाराप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. उर्वरीत 56 कुटुंबांकडे शौचालय नसल्याने त्यांनी विवाहाचा मुहुर्त निश्चित करण्यास नकार दिला. गावात त्यांच्या विवाहाची आणि त्यासाठी शौचालय बांधण्याची चर्चा होऊ लागली. अखेर ऑगस्ट 2016 मध्ये राहिलेल्या सर्व शौचालयांचे काम पूर्ण होऊन गाव हागणदारीमुक्त जाहीर झाले. उद्दिष्ट पूर्ण झाल्याने विभुते यांनी विवाह निश्चित केला. 21 एप्रिल रोजी त्यांचा विवाह उदगीर तालुक्यातील संगम येथे होत आहे.

गाव हागणदारीमुक्त होण्याच्या आनंदाएवढाच आनंद ग्रामस्थांना विभुते यांच्या विवाह सोहळ्याचा आहे. आज त्यांच्या संपूर्ण गाव त्यांच्या वैवाहीक जीवनातील आनंदाची कामना करीत त्यांना शुभेच्छा देत आहे. त्यांच्या प्रतिज्ञेने गावाला एकत्र होऊन चांगले काम करण्याची ऊर्जा दिली एवढे मात्र खरे.किशोर विभुते-गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय विवाह न करण्याचा निश्चय केल्यावर ग्रामस्थांनीदेखील माझ्यावरच्या प्रेमापोटी शौचालय बांधण्यास सहमती दर्शविली. सर्वांनी सहकार्य केल्यानेच हे शक्य होऊ शकले. आज विवाहाचा आणि गावाच्या विकासात काहीतरी योगदान दिल्याचा आनंद आहे.

रत्नाकर पगार, गट विकास अधिकारी- विभुते यांनी चांगले उदाहरण प्रस्तुत केले आहे. एखाद्याच्या समर्पण भावनेने चांगले काम कसे होते हे हिवरे गावात दिसून आले आहे. सिन्नर तालुक्यात इतरही ग्रामसेवकांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे तालुका लवकरच हागणदारीमुक्त होईल आणि त्यासाठी जनतेचे सहकार्य लाभेल, असा विश्वास वाटतो.

लेखक - किरण मोघे,
जिल्हा माहिती अधिकार, नाशिक

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 6/18/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate