सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी गावात श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेतल्याने आणि ग्रामस्थांना आर्थिक सहकार्य केल्याने गाव हागणदारीमुक्त झाले आहे.
कुंदेवाडी गावात पायाभूत सर्वेक्षणाच्यावेळी 572 पैकी 279 कुटुंबाकडे शौचालय होते. उर्वरीत 293 पैकी 41 शौचालय 2013-14 आणि 17 शौचालय 2014-15 मध्ये उभारण्यात आली. शौचालय उभारल्यानंतर अनुदान मिळत असल्याने ग्रामस्थ शौचालय बांधण्यासाठी पुढे येत नव्हते. अशावेळी पतसंस्थेचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहीत करण्यासाठी बैठक घेतली. बैठकीत अनेकांनी आर्थिक अडचण सांगितली. 12 जून 2015 रोजी पतसंस्थेमार्फत शौचालय बांधण्यासाठी तुर्तातूर्त कर्ज (ब्रीज फायनान्स) देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शौचालयासाठी पैसे उपलब्ध झाल्यावरही शौचालयाचे काम करण्यात ग्रामस्थांकडून अनेक अडचणी पुढे केल्या जात होत्या. अशावेळी 25 तरुणांची टीम तयार करण्यात आली. या तरुणांनी शौचालयाचा पाया खोदण्यापासून भांडे बसविण्यापर्यंत जमेल ते काम गरजेनुसार केले. पतसंस्थेने शौचालय उभारण्यासाठी आवश्यक रक्कम दिली. शासनाकडून लाभार्थ्याच्या खात्यावर अनुदान जमा झाल्यानंतर ते पतसंस्थेकडे वर्ग करण्यात आले. पतसंस्थेने कुठल्याही प्रकारचे व्याज घेतले नाही.
जनजागृतीसाठी ग्रामपंचायत इमारतीच्या समोरच्या बाजूस शौचालयाचे मॉडेल तयार करून त्याची माहिती प्रदर्शित करण्यात आली. शौचालय बांधणे कसे सोपे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. एकूण 155 कुटुंबांनी अशा स्वरुपाचे कर्ज घेऊन शौचालय बांधले. गावात वातावरणनिर्मिती झाल्याने 138 कुटुंबांनी स्वत:हून शौचालय बांधले. ग्रामविकास अधिकारी दीपक निकम, सरपंच सविता पोटे आणि उपसरपंच गोविंद जाधव यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहीत करण्यासाठी केलेले प्रयत्नही महत्वाचे ठरले. अखेर गतवर्षी गाव हागणदारीमुक्त झाले.
पतसंस्थेने गावाच्या विकासासाठीदेखील योगदान दिले आहे. आदिवासी वस्तीत बोअरवेल, सार्वजनिक शौचालयांची उभारणी आदी कामे पतसंस्थेने सीएसआरद्वारे केली आहे. ग्रामस्थ हेच पतसंस्थेचे सदस्य असल्याच्या प्रामाणिक भावनेतून हागणदारीमुक्तीसाठी केलेले हे प्रयत्न इतरही गावातील प्रयत्नांना मार्गदर्शक असेच आहेत.
तानाजी नाठे - गावातील तरुण- लोकांची मानसिकता तयार करावी लागली. एखादे घरचे काम करतो आहे असे समजून माझ्या सर्व सहकार्यांनी एकत्रित परिश्रम केले. गाव हागणदारीमुक्त करायचे एवढेच उद्दीष्ट आमच्यासमोर होते.
नामकर्ण आवारे - ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी शून्य व्याजावर कर्ज योजना राबविली आणि ती यशस्वी ठरली. ग्रामस्थांचीच पतसंस्था असल्याने त्यांना शासनाच्या चांगल्या योजनेचा लाभ मिळावा, हाच हेतू यामागे होता. हागणदारीमुक्तीमुळे समारात्मक वातावरण तयार होण्याबरोबरच इतरही शासकीय योजनांचा लाभ गावाला मिळू शकेल.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/27/2023
महिला बचत गटाच्या सदस्यांनी घेतलेल्या पुढाकाराने आ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात सकाळपासून ल...
कळमेश्वर, रामटेक व मौदा हागणदारीमुक्त.जिल्ह्याची ह...
मोलमजूरी करून उदर निर्वाह करणाऱ्या फुनाबाई पवार या...