वायगाव निपाणी (ता. जि.वर्धा) येथील गावतलावाच्या खोलीकरणाची चळवळ लोकचळवळ झाली आणि पाहता पाहता 900 ट्रॅक्टर गाळाचा उपसा झाला. लोकवर्गणीतून एक मोठे काम तडीस गेले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या खोलीकरणामुळे सुटलाच परंतू मासेमारीकरीता या तलावाचे लिलाव झाले आणि गतवर्षीपेक्षा दुप्पट दराची बोली लागल्याने ग्रामपंचायतच्या उत्पन्नात मोठी भर पडली.
बारा हजारावर लोकसंख्या असलेले वायगाव निपाणी वर्धेवरुन 12 किलोमीटर अंतरावर आहे. गावात तीन तलाव आहेत. दरवर्षी या तीन तलावाच्या लिलावातून ग्रामपंचायतला मोठे उत्पन्न मिळते. मत्स्य व्यावसायिकांना हे लिलाव मासेमारी करीता दिले जातात, अशी माहिती सरपंच प्रवीण काटकर यांनी दिली. त्यामध्ये भवानी 32 एकर, महादेव 8 एकर, देवतलाव 7 एकर याप्रमाणे आहे. 2012-13 या वर्षात 40 हजार रुपये लिलावाच्या माध्यमातून या तलावातून मिळाले. 2013-14 या वर्षात 50 हजार रुपयांची बोली तलावासाठी लागली. 2013-14 या वर्षात 60 हजार रुपये हे तिनही तलाव ग्रामपंचायला देऊन गेले. परंतू तलावाचे मोठे क्षेत्र असताना ग्रामपंचायतला त्यांच्या लिलावातून अपेक्षीत उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे तलावाच्या खोलीकरणाचा निर्णय सरपंच प्रवीण काटकर व सर्व सदस्यांच्या सहमतीने घेण्यात आला.
जलयुक्त अभियानाची मिळाली जोड शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाची जोड तलाव खोलीकरणाच्या मोहिमेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकवर्गणीतून हे काम करण्याचे ठरले. अल्पावधीतच ही शासन पुरस्कृत चळवळ लोकचळवळ झाली. 900 ट्रॅक्टर गाळ, 101 टिप्पर गाळ उपसा करण्यात आला. 97 शेतकऱ्यांच्या माध्यमातून 105 हेक्टर क्षेत्रावर हा गाळ टाकण्यात आला. त्यातून जमिनीची सुपिकता वाढण्यासही मदत झाली आहे. शासनाकडून या कामासाठी जलयुक्त शिवार अभियानातून 1 लाख रुपयांचा निधी डिझेलसाठी देण्यात आला. उर्वरित सर्व काम लोकसहभागातून झाले आहे. या मोहिमेतून दोन फुट खोलीकरण झाले आहे. तीन पैकी दोन तलावातील गाळ त्यामध्ये महादेव व भवानी तलावाचा समावेश आहे. या दोनच तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर उपसण्यात आला. या साऱ्याच्या परिणामी 2015-16 या वर्षात 1 लाख 5 हजार रुपयांना हे तलाव विकल्या गेला. स्थानिक मासेमारांनाच या तलावाची विक्री होते. तत्कालीन सरपंच गणेश बांदाडे यांच्या कार्यकाळात या कामाची सुरवात झाली. त्यानंतर सरपंच प्रवीण काटकर, वर्धेचे तत्कालीन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड, कृषी सहाय्यक विलास मेघे यांनी हे कार्य पुढे नेले.
ग्रामपंचायतच्या उत्पन्नात या कामामुळे मोठी वाढ झाली. या निधीचा उपयोग अपंग व महिला, बालकांसाठीच्या उपक्रमांवर केला जाणार असल्याचे सरपंच प्रवीण काटकर सांगतात. शासनाकडून जेसीबीकरीता लागणाऱ्या डिझेलपोटी एक लाख रुपयांचा निधी तेवढा मिळाला. परंतू ग्रामस्थांच्या पुढाकाराने पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणास चालना मिळाली. 10 वर्षाच्या आधी गावात टॅकर होते. त्यानंतर टप्याटप्याने गाव टॅंकरमुक्त झाले असले तरी आता अवघ्या 40 ते 45 फुटावर पाणी लागते. यावरुनच जलस्त्रोतांच्या बळकटीकरणाचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. गांधी जयंती पासून ग्रामस्वच्छता अभियानाची गावात सुरवात झाली आहे. 31 डिसेंबर पर्यंत हे अभियान राबविण्यात येईल. शासनस्तरावरुन जाहिर योजनांच्या अंमलबजावणीत हे गाव नेहमी आघाडीवर राहते. त्याच्याच परिणामी या गावातील तलाव खोलीकरणाच्या कामाची माहिती मिळाल्यानंतर गावाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील, तहसीलदार राहूल सारंग यांनी भेट देत गावकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती.
पाच वर्षापूर्वी गावाला तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळाला होता. सात लाख रुपयांचे बक्षीस गावाला या मोहिमेअंतर्गंत मिळाले. तत्कालीन तंटामुक्त अध्यक्ष सुनिल तळवेकर, सरपंच आशाताई वरवटकर, उपसरपंच रामभाऊ हिवसे, सचिव आर.डी. जामुनकर यांच्या कार्यकाळात गावाच्या शिरपेचात हा मानाचा तूरा खोवला गेला. बक्षीसाच्या या रक्कमेतून गावात भुमिगत गटार योजना राबविण्यात आली. त्यासोबतच दिव्यांगांसाठी वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले. सद्यपरिस्थिती स्मशानभुमीचे सुशोभीकरणासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. स्मशानभुमिच्या 17 एकर परिसरात आंबा, पेरु, आवळा अशा फळझाडांची व त्याच्या जोडीलाच फुलझाडांची देखील लागवड करीत हा परिसर सुशोभीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीतील 100 टक्के झाडे जगविण्यात यश आले आहे. गावातील रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. गावातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांचे कामही करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामातही गती आहे. गावात 1 ते चार पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. यशवंत हायस्कुल हा पाचवी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे.
जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा होतो. पिंपरी प्रकल्पातून पाणी उपसा करीत तो गावाच्या टाकीत साठविला जातो. त्यानंतर नळाव्दारे हे पाणी गावकऱ्यांच्या घरापर्यंत जाते. 32 टक्के नागरिकांकडे बोअरवेलचा पर्याय आहे. संगणकीकृत ग्रामपंचायत आहे. नागरिकांना दस्तऐवज ऑनलाईन उपलब्ध होतात. गावात दोन ई सेवा-केंद्र पण आहेत.
पारंपरीक पिकाचा पॅटर्न कापूस, सोयाबीन आणि तूर यासारखी पीक घेतली जातात. रबी हंगामात गहू, हरभरा यासारख्या पिकांवर शेतकऱ्यांचा भर राहतो. कोरडवाहू शेतीक्षेत्र असले तरी तलावाच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे भुगर्भातील जलस्त्रोत बळकट झाले. त्याच्या परिणामी विहीर, बोअरवेलच्या पाणीपातळीतही वाढ नोंदविल्या गेल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगीतले.
‘‘तलाव खोलीकरणाचे काम ग्रामपंचायतने हाती घेतले. अल्पावधीतच या कामाने लोकचळवळीचे रुप घेतले. यामुळे पाण्याचे स्त्रोत बळकट होण्यासोबतच ग्रामपंचायतला उत्पन्नाचा नवा भक्कम पर्यायही मिळण्यास मदत झाली आहे.’’
-प्रवीण काटकर, सरपंच, वायगाव निपाणी, ता.जि. वर्धा 9764808754
लेखक - : चैताली बाळू नानोटे 7773987427
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/9/2020
या माहितीपटात नाला रुंदीकरण व खोलीकरण करताना कोणती...
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून टँकरवर अवल...
मांजरा नदी खोलीकरण व रुंदीकरणची यशोगाथा.