অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मांजरा नदी खोलीकरण व रुंदीकरण

मांजरा नदी खोलीकरण व रुंदीकरण

लातूर जिल्ह्यात सन २०१४ व २०१५ या सालात अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे गतवर्षी म्हणजेच सन २०१६ यावर्षी दुष्काळी परीस्थिती निर्माण झाली होती. ज्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली याची जास्तीची झळ ग्रामीण भागापेक्षा लातूर शहरास बसली. या टंचाईची प्रचिती यावरूनच लक्षात येते की, गतवर्षी लातूर शहरास मिरजहून (जि.सांगली) महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच रेल्वे वॅगनद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या नेतृत्वाखाली या दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. भविष्यात असे भीषण संकट उद्भवू नये म्हणून वेळीच नाविन्यपूर्ण दृष्टीकोन ठेऊन योग्य उपाययोजना करण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रमाण पांडुरंग पोले यांच्या कार्यशैलीतून दिसून आले आणि ह्या बाबी रेल्वेचे पाणी उपलब्ध करून त्याचे समन्यायी पद्धतीने वितरण करणे, ग्रामीण भागात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे असेल वा शहरी भागात विशेष मोहीम ‘जलपुनर्भरण अभियान’ ई. मधून अधोरेखित होतात.

बदलते हवामान आणि ऋतुचक्र यातूनच निर्माण होत असलेला जलजन्य दुष्काळ याची आता सवय करून घेऊन त्याप्रमाणे नियोजन आखणे आवश्यक आहे. गतवर्षी सन २०१६ मध्ये नागझरी बॅरेज कोरडे होते. परंतु यंदा सन २०१७ च्या मे महिन्यात देखील २.५ मी. इतकी पाणी पातळी नागझरी बॅरेज येथे उपलब्ध आहे.

गतवर्षी कोरडे पात्र, यंदा मात्र बोटीने रंगीत तालीम

संकट कितीही मोठे असले तरी, त्यास सक्षमपणे, नियोजनबद्ध पद्धतीने त्यास प्रतिसाद दिल्यास त्याच्या झळा तर कमी होतातच, शिवाय अशा प्रकारचे संकट भविष्यात आपणास टाळता येऊ शकतात याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजेच सन २०१६ मध्ये झालेले मांजरा नदीची खोलीकरण व रुंदीकरणचे काम होय. गतवर्षी सन २०१६ च्या मे-जून या महिन्यांत एक टिपूस / थेंबभरही पाणी नसलेल्या व नदीपात्रात कसलीही हिरवळ नसलेल्या निर्जिवीत मांजरा नदीच्या नागझरी बॅरेजमध्ये लातूरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूर प्रतिसाद आणि शोध व बचावाची रंगीत तालीम घेतली ज्यामध्ये त्यांनी नागझरी बॅरेजमध्ये चक्क बोट चालवली. हे केवळ मांजरा नदीच्या पुनर्जीविकरणामुळेच घडून आले.

जलयुक्त लातूर

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांपैकी कायमस्वरूपी उपाययोजनांमध्ये नाला- नदी पुनरुज्‍जीवनाचा समावेश होतो. त्‍यासाठी सामान्‍यत: पूर्णा नदी किमान १० ते १५ कि.मी. पात्र रुंद खोल करुन साठवण क्षमता वाढविली जाते. रेणा, बामणी, तेरणा इत्‍यादी नद्यांप्रमाणेच लातूर शहराची पाण्‍याची गरज भागविणाऱ्‍या मांजरा नदीचे रुंदीकरण करण्‍यासाठी जलयुक्‍त लातूर समितीतर्फे साई बॅरेज येथे सुरुवात झाली. या कामात विविध सेवाभावी संस्था, जिल्ह्यातील प्रत्येक घटकातील, सर्व जाती-जमातीचे लोक यांचे योगदान होते. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की, सर्वजण एकत्रित आल्यास काहीतरी अभूतपूर्व घडल्याशिवाय राहत नाही. तशीच काहीशी यशकथा यातून आपणास निदर्शनास येईल.

मुख्यमंत्री सहायता निधीतून खोलीकरण आणि रुंदीकरण

जलयुक्त लातूरच्या संकल्पनेपूर्वीच शासनास साई बॅरेज ते नागझरी बॅरेज ५ कि. मी. खोलीकरण व रुंदीकरणाचा प्रस्‍ताव प्रशासनाकडून शासनास सादर करण्यात आला होता. सदरील प्रस्‍ताव ढोबळ अंदाजपत्रकाप्रमाणे तयार करण्यात आला होता. जलयुक्‍त लातूर समितीचे काम साई बॅरेजकडून नागझरी बॅरेज कडच्‍या दिशेने होत होते. नागझरी येथे दुसऱ्‍या टप्‍पाचा शुभारंभ मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद, लातूर यांच्या हस्ते जलयुक्त लातूर समितीमार्फत करण्यात आला.

लातूरमधील दुष्‍काळ निवारण कामासाठी सहकार विभागाने दिनांक २२ एप्रिल २०१६ रोजीच्‍या पत्राद्वारे ५० लक्ष रुपये मुख्‍यमंत्री सहायता निधीसाठी उपलब्‍ध करुन देण्यात आले आहेत. या निधीतून खोल CCT, गाळ काढणे या सोबतच नदी-नाला रुंदीकरण ही कामे करावयाची होती. त्‍यासाठी खाजगी मशिनरी भाड्याने लावून हे काम सुरु करण्यात आले. मांजरा नदीच्‍या ५.०० कि.मी. साठी ५९५ लक्ष पैकी मुख्‍यमंत्री सहायता निधितून अधिकचे ३ कोटी रुपये उपलब्‍ध करुन कामाचे संचलन, सनियंत्रण करण्यात आले. नागझरी बंधाऱ्‍यांचे वरचे टोक-कारसा पोहरेगावकडून टाकळीच्‍या दिशेने काम करण्‍यास‍ निश्चित झाले, ज्‍यामुळे नागझारी बंधाऱ्‍यांची साठवण क्षमता वाढली व लातूर शहराच्‍या पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या पूरक स्त्रोताची साठवण क्षमतेमध्ये वाढ झाली.

नदीचे सविस्‍तर व अचुक सर्वेक्षण

कारसा पोहरेगाव ते टाकळी पुल या दरम्‍यानचे मांजरा नदीचे सविस्‍तर व अचुक सर्व्‍हेक्षण Electronic Total Station (ETS) मशीन वापरून करण्‍यात आले. नदीपात्राच्‍या प्रती ३० मी. अंतरावर पातळी (Levels) घेऊन कामाची निश्चिती करण्‍यात आली. सन २०१६ चा पावसाळा जवळ आल्‍यामुळे होणाऱ्‍या कामाच्‍या गतीनुसार मान्‍यता देण्‍यात आली. खाजगी मशिनने काम सुरु करण्‍यापूर्वी यांत्रिकी विभागाच्‍या मशिनने काम प्रथमत: सुरु करण्‍यात आले होते. कारसा पोहरेगाव बॅरेजच्‍या खालचा पहिला सुमारे ७०० मीटरचा भाग यांत्रिकी विभागाच्‍या मशिनरीने व उर्वरीत सुमारे २२०० मीटरचा भाग खाजगी मशिनरीने करण्‍यात आला.

काम सुरु होण्‍यापूर्वी जसे ETS द्वारे Levels घेतल्‍या तशाच Levels काम जसजसे पूर्ण होईल तसतसे घेण्‍यात आले आहेत.

त्रयस्थ संस्थेकडून तपासणी

पुरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, लातूर (Puranmal Lahoti Government Polytechnic College, Latur) या त्रयस्‍थ संस्‍थेमार्फत झालेल्‍या कामाचे परिमाण व गुणवत्‍ता (Quantity & Quality) तपासून प्रमाणित करण्‍यात आले आहे. काम सुरु होण्‍यापूर्वी, काम सुरु असताना व काम झाल्‍यानंतरचे असे तीनही टप्प्यामधील (Stages) जी.पी.एस. टॅग केलेले फोटो (GPS tagged) घेण्‍यात आलेले आहेत. शासकीय नियमानुसार कामाच्‍या ठिकाणी माहितीस्‍तव कामाचे बोर्ड लावण्‍यात आलेले आहेत.

मान्यवरांच्या भेटी

काम चालू असताना कामास वेगवेगळ्या व्‍यक्तिंनी भेटी देऊन कामाची पाहणी केली. आमदार, लोकप्रतिनीधी, अधिकारी, त्रयस्‍थ संस्‍थेचे अभियंता इत्‍यादींनी कामाची पाहणी केलेली आहे. काम चालू असताना मुख्‍य अभियंता, जलसंपदा यांनी दिनांक १७ जून २०१६ रोजी आपल्‍या क्षेत्रीय दौऱ्‍याच्‍या मांजरा भेटी दरम्‍यान शासकीय निधीतून चालू असलेल्‍या कामाबाबत आवश्‍यक ते निर्देश दिले तसेच कामाच्‍या दर्जाबाबत समाधान व्‍यक्‍त केले. याबाबतचे लेखी निरीक्षण टिप्‍पणी (दौरा कार्यक्रम) त्‍यांनी नोंदविली आहे. कामाच्‍या अचूक परिमाणासाठी ETS द्वारे levels दोन्‍ही वेळेस घेण्‍यात आल्‍या आहेत. टेपचा वापर न करता ETS च्‍या वापरामुळे कामाचे मोजमाप अचूक झाले असून त्‍याची पडताळणी त्रयस्‍थ शासकीय संस्‍थेमार्फत करण्‍यात आलेली आहे.

प्रकल्पाची फलनिष्पत्ती

मांजरा नदीच्या पुनर्जीविकरण कामाच्या माध्यमातून मांजरा नदी पात्रातील (साई ते नागझरी व नागझरी वरच्या टोकापासून कारसा पोहरेगावकडून टाकळी च्‍या दिशेने) असे एकूण २,०४,७६६ घ.मी. गाळ काढण्‍यात आला व हे गाळ परिसरातील शेतकऱ्‍याच्या शेतासाठी देण्यात आले ज्यामुळे शेजारच्या एकूण २० गावातील शेतकऱ्यांची जमीन सुपीक झाली. या कामामुळे शिवारातील एकूण ५०० हे. जमीन क्षेत्र हे सिंचनाखाली आले आहे ज्याचा फायदा २० गावातील शेतकऱ्यांना झाला असून त्‍यामुळे नदी पात्रात सुमारे २०४ टि.सी.एम. एवढा जास्‍तीचा पाणीसाठा झाला आहे. ज्यामुळे लातूर शहरास पाणीपुरवठा योजनेच्या पूरक स्त्रोतामध्ये मोठ्या प्रमाणाची वाढ झाली आहे.

- साकेब उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, लातूर

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate