অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलदेवता झाली ग्रामदेवता.... काकरदरा ठरले देशातील पहिले गाव

जलदेवता झाली ग्रामदेवता.... काकरदरा ठरले देशातील पहिले गाव

पाणी टंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे, हा एकमेव ध्यास घेऊन पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानाने उभ्या केलेल्या जलसंधारणाच्या विविध उपचारातून आपले गाव पाणीदार करण्याचा यशस्वी प्रयोग काकरदरावासियांनी राबविला. पाण्याचे महत्त्व ओळखलेल्या या आदिवासी गावाने आपली ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिष्ठापणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामदेवता म्हणून जलदेवतेला स्थान देणारे भारतातील पहिले गाव ठरले आहे. 

आर्वी तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी गाव म्हणून काकरदरा या गावाची ओळख आहे. पाणलोट तंत्रज्ञान समजून घेऊन त्याच्या विविध उपचाराद्वारे श्रमकार्याने भूजल पातळी वाढविण्यासाठी ग्रामस्थांचा कायम पुढाकार घेणाऱ्या या आदिवासी गावात ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ च्या प्रेरणेमुळे पाणलोट उपचाराची कामे मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे पूर्ण झालली आहेत. संपूर्ण आदिवासी गाव असून सुद्धा जलयुक्त शिवार अभियानासोबत पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविण्याच्या विविध उपक्रमांमध्ये गावकऱ्यांचा असलेला प्रचंड उत्साह यामुळेच ‘सत्यमेव जयतेच्या वॉटर कप’ स्पर्धेसाठी काकरदरा या गावाची निवड करण्यात आली.

‘जल है तो कल है’ हा एकच ध्यास घेऊन पाण्यासाठी पुढच्या पिढीला त्रास होऊ नये, यासाठी दररोज गावातील 100 ते 125 स्त्री, पुरुष तसेच युवक, युवती सकाळी 6.00 वाजल्यापासून नालाखोलीकरण, कंटूर बांध, अनघड दगडी बांध, पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, म्हणून माथा ते पायथा उपचार पद्धतीने विविध दगडी बांध यासोबतच शेतामधील पाणी शेतातच थांबविण्यासाठी विविध उपचार पद्धतीची कामे करून 45 दिवसात पाणी अडविण्यासाठी संपूर्ण गावशिवाराची बांध बंदिस्ती पूर्ण केली. या कामासाठी प्रशासनातर्फे सहकार्य मिळाल्यामुळे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण केली. 8 एप्रिल ते 22 मे या 45 दिवसाच्या कालावधीत ग्रामस्थांनी केलेले पाणलोटाचे काम अभूतपूर्व असे काम काकरदरा या गावाने केले आहे. नाला खोलीकरणाचा डोह मॉडेल येथे पहायला मिळते. 2 किलोमीटर लांब असलेल्या नाल्याचे संपूर्ण खोलीकरण करण्यात आले. 90 अनघड दगडी बांध, 1 हजार 200 मीटर सीसीटी अडीच हजार, कंटूर बांध तसेच 90 एकर कंपार्टमेंट बंडींग आदी कामे पूर्ण केली आहे. अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या तलावाचे बांध बंदिस्ती व खोलीकरण तसेच गावातील इतर 3 तलावांचे खोलीकरण दुरुस्तीची कामे पूर्ण केली आहे. गावात पूर्वीची 22 शेततळी व नवीन 10 शेततळी सुद्धा जल साठवण्यासाठी सज्ज झाली आहे. 

काकरदरा हे एक ऐतिहासिक वारसा असणारे गाव आहे. 1987 पासून पाणलोट तंत्रज्ञान समजून घेऊन त्याच्या विविध उपचाराद्वारे समकार्याने गावातील भूजल पातळी वाढविण्यासाठी येथे काम झाले आहे. विविध संस्थेच्या माध्यमातून पाणलोटाचे महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितल्यामुळे या गावाचे वेगळी ओळख निर्माण झाली होती. परंतु मागील काही वर्षात येथील काम थांबल्यामुळे या गावाला ‘सत्यमेव जयते वॉटर कप’च्या प्रेरणेतून नवीन ऊर्जा मिळाली आहे. कंटूर बांध, अनघड दगडी बांध हे गाळाने भरत राहिले व लोक ते परत-परत करत राहिले त्यातून त्यांच्या उत्पादनात वाढ झाली. 2013 च्या अतिवृष्टीमुळे पाणलोटाच्या कामाचे नासधूस झाली. दोन मोठे मातीनाला बांध यात वाहून गेलेत. या कामासाठी संस्थांचे सहकार्य पूर्ण झालेले असल्याने हे बांध परत दुरुस्त करणे गावाला शक्य झाले नाही.

गट ग्रामपंचायत आणि अतिदुर्गम डोंगराळ भाग असल्याने त्याकडे दुर्लक्ष राहिले. शंभर टक्के कोलाम आदिवासी समाजाचे गाव असल्याने जे मिळते त्यात समाधान ही प्रवृत्ती त्यामुळे हे गाव विकासापासून दूर राहिले. एकूण 2017 च्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’साठी नागपूर विभागातून केवळ आर्वी तालुक्याची निवड त्यामुळे प्रत्येक गावात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलजागृतीला सुरुवात झाली. परंतु काकरदरावासियांनी दाखविलेला प्रचंड उत्साह आणि लोकसहभाग तसेच श्रमदान करण्याची तयारी यामुळे या गावाचा सहभाग निश्चित झाला. 

काकरदरा गाव हे आज जलसंधारणासोबतच भूजल पातळी वाढविण्यासाठी केलेल्या तंत्रशुद्ध पद्धतीने केलेल्या कामामुळे संपूर्ण उपचार यशस्वीपणे पूर्ण करणारे पहिले गाव ठरले आहे. जलसंधारणासोबतच वृक्षारोपण, गावातील पाणी भूगर्भात जिरविण्यासाठी शोषखड्डे पाणी बचाव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून पुढील पिढीपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचविण्याचा एक भाग म्हणून गावामध्ये जलदेवतेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. जलदेवतेचे मंदिर हे गावासाठी कायम प्रेरणा देणारे ठरावे, यासाठीच ‘जल है तो कल है’ हे संबोधन घेऊन ग्रामसभेत प्रतिस्थापना करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासोबतच काकरदरा या गावाने आदर्श निर्माण केला आहे. 

लेखक - अनिल गडेकर

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate