অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतकऱ्यांच्या जीवनात जलसमृद्धी

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शाश्‍वत उपजीविका उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प राबवण्यात आला. विहिरी खोलीकरण, बंधारेनिर्मिती आदी उपायांतून परिसरात जलसमृध्दी झाली. पिकांसाठी संरक्षित पाण्याची सोय करण्यात आली.

राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यात राबवण्यासाठी येथील कृषी विज्ञान केंद्राकडे (केव्हीके) जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार केव्हीकेने नवापूर तालुक्‍यातील खांडबारा गाव परिसरातील आठ गावांच्या समूहाची निवड केली. कामांना प्रत्यक्ष सुरवात करण्यापूर्वी निवडलेल्या गावांचे मूल्यावलोकन केले.


पाणी हाच ठरला कळीचा मुद्दा


मूल्यावलोकनानंतर पाणी हा कळीचा मुद्दा समोर आला. खांडबारा परिसरातील बहुतांश शेतकरी खरीप पिकांची पेरणी, मशागतीची कामे झाल्यानंतर शेजारच्या राज्यांत (गुजरात राज्याची सीमा नजिक आहे) कामासाठी जातात. पिकांच्या काढणीवेळी तसेच दीपावलीसाठी ते परत येतात, त्यानंतर पुन्हा कामासाठी रवाना होऊन होळी सणासाठी पुन्हा आपल्या गावी परततात. हा जीवनक्रम कायम ठरलेला होता. अशा स्थलांतरित शेतकरी कुटुंबांचे प्रमाण जवळपास 26 टक्के होते. स्थलांतराच्या समस्येच्या खोलात गेल्यावर केवळ जिरायती पीक पद्धती हे शेतकरी अवलंबित असल्याचे दिसून आले. या पद्धतीत काम नसलेल्या काळातच स्थलांतर होत होते. जिरायती पिकांपासून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून कुटुंबाची तोंडमिळवणी करण्यास असमर्थ असल्यानेही स्थलांतर सुरू होते. साहजिकच शेतकरी कुटुंबांचे सामाजिक जीवन अस्थिर होते. या भागांचा शाश्‍वत विकास करायचा तर पाण्याच्या मुद्द्याला हात घातला पाहिजे यावर एकमत झाले. आठही गावांमध्ये पाण्याचा स्रोत म्हणजे विहिरी तसेच नेसू नदी होती.


केले विहीर खोलीकरण


ज्या विहिरी पुनर्भरण क्षेत्रात खोदण्यात आल्या त्यांचे पाणी रब्बी हंगामापर्यंत पुरत नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम अर्ध्यावरच सोडून द्यावा लागायचा, त्यामुळे केव्हीके आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या शास्त्रज्ञांनी विहिरींचे सर्वेक्षण केले. त्यातून लक्षात आले, की विहिरींची चार ते सहा मीटर असलेली खोली 12 मीटरपर्यंत वाढविल्यास त्या भागातील भूजल प्रस्तरातून वर्षभर पाण्याची उपलब्धता होऊ शकेल. हा प्रस्तर दर वर्षी नैसर्गिकरीतीने पुनर्भरण होणारा असल्याने विहिरींतून अति उपशाची तसेच भूजल पातळी कमी होण्याची समस्या निर्माण होणार नाही. अशा विहिरींचे प्रमाणीकरण करण्यात आले. शास्त्रीय अभ्यासाच्या आधारावर विहिरींची खोली तीन मीटरने वाढविण्याचा (विहीर खोलीकरण) प्रयोग राबविण्यात आला.


पाणी उचलण्याच्या साधनांचा पुरवठा -


प्रकल्प क्षेत्रातील साठवण क्षेत्रातील विहिरींमध्ये वर्षभर पाण्याची उपलब्धता असायची; परंतु काही विहिरींचा शेतीला पाणी देण्यासाठी उपयोग होत नव्हता. याचे कारण शेतकऱ्यांकडे पाणी उचलण्याचे साधनच नव्हते. परिसरातील 96 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 20 हजार रुपयांपर्यंत आहे, त्यामुळे शासनाच्या विविध योजनांमधून विहीर खोदून मिळाली; परंतु पाणी उचलण्याचे साधन खरेदी करण्यासाठी पैशाची उपलब्धता होऊ शकली नाही. अशा गरजू शेतकऱ्यांची निवड करून त्यांना डिझेल मोटर पंप, इलेक्‍ट्रिक मोटरपंप उपलब्ध केले. 

या दोन प्रयोगांतून प्रत्येक विहिरीतून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर 8 ते 10 एकर क्षेत्र ओलिताखाली हमखास येऊ शकते असे प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांच्या अनुभवातून समोर आले. हे पाणी खरिपात संरक्षित तसेच रब्बीत बागायती पिके घेण्यासाठी उपयोगात आणणे शक्‍य होते. परिसरातील 78 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. उपलब्ध पाण्याचा उपयोग शेजारील शेतकऱ्यांना होऊ शकतो हे ध्यानात आल्यानंतर त्यातून जलस्रोत वापर गटाची कल्पना व काही नियम ठरवण्यात आले, ते असे - 

1) गटातील सदस्य शेतकरी मंडळाचे सदस्य असावेत. 
2) गटात किमान पाच शेतकऱ्यांचा समावेश असावा. 
3) भागधारकांना खरिपात भात, सोयाबीन, तूर पिकांना संरक्षित पाणी द्यावे. रब्बीत हरभरा, भाजीपाला, गहू पिकांना पाणी उपलब्धतेनुसार किमान अर्धा व कमाल एक एकरासाठी पाणी द्यावे. 
4) दुरुस्ती व व्यवस्थापन खर्चासाठी एकूण किमतीच्या 10 टक्के रक्कम बॅंक खात्यात जमा करावी.

प्रयोगांची आकडेवारी


विहिरीवरील प्रयोग +जलस्रोत वापर गट + सहभागी शेतकरी + ओलिताखालील क्षेत्र (एकर) 

नेसू नदीवरील बंधारे प्रयोग - 
खांडबारा परिसरातून वाहणारी नेसू नदी इथली जीवनदायी असून, ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्लक्षित होती. नदीची या परिसरातील लांबी 12 किलोमीटर आहे. त्या क्षेत्रातून 27 शेतकरी 60 एकर क्षेत्रावर बागायती शेती करीत होते. 
पावसाळा ओसरल्यावर नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा साठा केला, तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते हे चर्चेतून पुढे आले. या दृष्टीने नदीच्या पात्रात पाण्याचा साठा निर्माण करण्यासाठी वाळूच्या पोत्याचे बंधारे यावर उत्तम उपाय म्हणून समोर आला. त्याचे प्रशिक्षण केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ जयंत उत्तरवार यांनी दिले. यात गावातील युवकांचा प्रामुख्याने समावेश होता. बंधारे बांधण्यासाठी समूह पातळीवरील गट, शेतकरी मंडळ, विद्यार्थी, बचत गट आणि जलस्रोत उपगटाचे सभासद यांनी श्रमदान केले. नदीच्या पात्रात 12 ठिकाणी आणि नाल्यावर पाच ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. 
त्यातून नदीपात्रात पाण्याचे साठे निर्माण झाले. उपलब्ध पाणी सामूहिक रीतीने वापरावे यावर भर देण्यात आला. त्या दृष्टीने शेतकऱ्यांची मानसिकता होण्यासाठी प्रशिक्षण, वैयक्तिक भेटी घडवून आणण्यात आल्या. पाणी उचलण्यासाठी इलेक्‍ट्रिक मोटर पंपाची निवड करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोचेल अशा दृष्टीने पंपाची अश्‍वशक्ती ठरविण्यात आली. प्रयोग राबविल्यानंतर पाण्याच्या निश्‍चित उपलब्धतेबाबत सर्व शेतकऱ्यांमध्ये विश्‍वास व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.


प्रकल्पाचे रूपांतर झाले फायद्यांमध्ये -


1) जलस्रोत वापर गटाच्या माध्यमातून परिसरातील रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू झाली. हे यश पाहून आणखी गट स्थापण्याची मागणी वाढू लागली. त्याची परिणिती 58 गट स्थापन होण्यात झाली. या प्रयोगाला आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ माधवराव चितळे यासारख्या मान्यवरांनी भेट देऊन प्रकल्पाची प्रशंसा केली. 
2) नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही वाळूच्या पोत्यांचा बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले. बंधारे साखळीमुळे निर्माण झालेले जलसाठे पाहून कायमस्वरूपी बंधारे व्हावेत यासाठी नियोजनाची आवश्‍यकता प्रतिपादन केली. 
3) प्रकल्पाची दखल घेऊन लघुसिंचन जलसंधारण उपविभाग (नंदुरबार) यांच्यामार्फत पक्के बंधारे बांधण्याचे नियोजन झाले. सद्यःस्थितीत 10 पक्के सिमेंट बंधारे पूर्ण झाले असून, उर्वरित चार बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. 
4) अशा प्रकारे खांडबारा समूहात वर्षभर सिंचनासाठी पाण्याचे साठे निर्माण होऊन जलसमृद्धी येण्यास मदत झाली.


नगारे गावाची उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर झाली


खांडबारा समूहातील नगारे गावात उन्हाळा सुरू झाला, की विहिरींतील पाण्याची पातळी तळाला जायची. पहाटे-पहाटे अख्खे गाव एका विहिरीजवळ पाण्यासाठी जायचे. राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प व कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक साह्याने बांधबंदिस्ती, सलग समतल चर यासारख्या पाणलोट विकासाच्या उपाययोजना माथा ते पायथा या धर्तीवर राबवण्यात आल्या. पावसाच्या पाण्याचे जमिनीत मुरण्याचे प्रमाण त्यातून वाढले. जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. ज्या विहिरी फेब्रुवारीत आटायच्या त्या विहिरींत आता पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी उपलब्ध होऊ लागले. सुमारे 1.28 मीटरने भूजल पातळी वाढल्याचे दिसून आले. गावाची उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करण्यात यश मिळाले. गावातील चार विहिरींतील पाण्याची पातळी वाढल्याने खरिपात भात, सोयाबीन पिकासाठी संरक्षित पाणी देणे शक्‍य झाले. सोबतच रब्बी ज्वारीच्या (दादर) संवेदनशील अवस्थांमध्ये शेतकऱ्यांना पाणी देता आले. त्यातून उत्पादनात एकरी चार क्विंटलपर्यंत वाढ झाली. 
विविध प्रयोग यशस्वी झाल्याने परिसरात जलसमृद्धीतून शेतीच्या शाश्‍वत विकासाकडे येथील शेतकऱ्यांची वाटचाल सुरू झाली. 

संपर्कः 
गोडसे संशोधन सहायक (राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प, नंदुरबार) तर उत्तरवार 
विषय विशेषज्ञ (कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार) आहेत.

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate