आमच्या बोलटेक गावात गेल्या पाच-सहा वर्षांपासून स्वयंसाहाय्य गट सुरु आहेत. या स्वयंसाहाय्य गटामध्ये सुरुवातीला खूप कमी महिला होत्या. मात्र नंतर जसजसे महिलांना बचतीचे महत्त्व पटू लागले, तेव्हापासून गटामध्ये महिलांची संख्या वाढू लागली. सुरुवातीला आम्हांलादेखील महिलांना बचतीचे महत्व पटवून दयावे लागत होते. लताबाई ही एक अशीच महिला होती, की तिला आम्ही स्वयंसाहाय्य गटामध्ये सामिल होण्यास सांगत होतो.
लताबाईचे मात्र आपले एकच म्हणणे की, ‘मला बचतीची गरज काय? माझ्याजवळ पैसा अडका आणि गुरढोर असताना मी बचत कशाला करू?’ त्याच वर्षी तिला पीकपाण्याचा भरपूर पैसा आल्यामुळे, तिच्या नवऱ्याने नवीन पक्के घर बांधण्यास काढले. घराच्या बांधकामास सुरुवात केली. जसजसे बांधकाम पूर्ण होत आहे, तसतसा त्यांच्याजवळचा पैसा संपत गेला. घरावर फक्त छप्पर टाकण्याचे बाकी राहिले होते. घरातील होते नव्हते तेवढे बांधकामासाठी खर्च झाले. आता पैसा आणायचा कुठून हा प्रश्न पडला. सावकाराकडे जावे तर व्याज खूप दयावे लागेल, मग लताबाईने स्वयंसाहाय्य गटाकडे कर्जाविषयी चौकशी केली. तर तिला असे समजले, की ज्या महिला स्वयंसाहाय्य गटाच्या सभासद आहेत, त्यांनाच गटाकडून कर्ज मिळू शकते. गटाबाहेरील व्यक्तीला कर्ज दिले जात नाही. त्यावेळी लताबाईंच्या मनात आले, की जर मी स्वयंसाहाय्य गटाची सभासद असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती. त्या निराश होऊन घरी आल्या. गुरेढोरे होती, ती पण घरासाठी आधीच विकून टाकली होती. मग लताबाईच्या नवऱ्याने नातेवाईकांकडून कसेबसे पैसे गोळा करून घाचे बांधकाम पूर्ण केले.
पुढच्या मिटींगच्या वेळी लताबाई स्वतः होऊन हजर झाली. “मला पण स्वयंसाहाय्य गटाचे सभासद करून घ्या”, असे म्हणू लागली. आम्ही महिलांनी तिला विचारले की, “बाई तू तर म्हणत होती माझ्याजवळ भरपूर पैसाअडका, गुरढोर आहेत. मला बचतीची गरज काय? आता तुला बचतीचे महत्व कसे कळले?” “चुकले बघा. मी त्यावेळी तुमचे ऐकले असल्ते तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. माझ्या नवऱ्याला इतरांपुढे पैशासाठी हात पसरावे लागले नसते. पैसा-अडका, गुरढोर म्हणाल, तर ते पण वेळ आली की विकून टाकावे लागते. पण बचत केल्यानंतर आपल्याकडून बचत पण होते आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते आणि सावकाराच्या जास्त व्याजदरातून सुटका पण होते.”
मग लताबाईंनी तिच्यासारख्याच आणखीन सर्व महिला गोळा करून स्वयंसाहाय्य गटाकडे गेल्या आणि सांगितले, की आम्हाला नवीन स्वयंसाहाय्य गट स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करा. आम्ही त्याचा नवीन गट तयार करून दिला. आता त्यांच्या त्या स्वयंसाहाय्य गट व्यवस्थित चालवत आहेत.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 8/13/2020
मी कौसाबाई कांदे. माझे आयुष्यच ह्या स्वयंसाहाय्य ग...
आता तरी बायांनो बोलक्या व्हा !! चार गोष्टींचा विच...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...
१९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ ग...