অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

छ्बुबाईची कहाणी

माझे गाव सौ. छ्बुबाई हरिभाऊ ठोंबे. मी लक्ष्मी स्वयंसाहाय्य गटाची सदस्या असून मी नियमित बचत करते. स्वयंसाहाय्य गटाकडून कर्ज घेऊन आज मी माझा स्वतंत्रपणे बोंबिलाचा धंदा करत आहे. आज मी सुखी समाधानी आहे. आज माझी पैशाविषयीची काळजी कमी झाली. पण यापूर्वीच्या परिस्थितीची आठवण जरी झाली तरी डोळ्यात पाणी येते. पूर्वी फार हालअपेष्टा सोसून दिवस काढावे लागले.

नियतीचे चक्र

मी मूळचे गाव वैजबाभूळगाव, पण कामधंद्याच्या निमित्ताने माझा नवरा आणि मी पूर्वी मुंबईला राहत असे. परिस्थिती बेताची होती. दोन मुले आणि आम्ही दोघजण. आमच संसार अगदी व्यवस्थित चालू होता. पण काळाने अचानक आमच्या कुटुंबावर झडप घातली, माझी दोन्ही मुले आजारी पडून वारली, अशीच एकदोन वर्षे गेली नसतील तर नवऱ्याच्या कंपनीत संप सुरु झाला आणि त्यांनी राजीनामा दिला. जो काही थोडाफार पैसा मिळाला ते घेऊन गावी आम्ही आलो. त्या आलेल्या पैशातूनच आम्ही चांगले घर बांधले व जो काही पैसा शिल्लक होता त्यातूनच प्रपंच चालवत असू, पण नंतर माझ्या आजारपणातच तो पैसा देखील संपून गेला.

आजारामुळे मला एकदम अंथरूणातच पडून रहावे लागले. अगदी स्वतःचे काम देखील माझ्याच्याने होत नसे व नवऱ्याला घरातील सर्व कामे करून पाव बटर विक्री करण्यास बाहेर जावे लागत असे. सर्व खर्च आजारपणावर होत असल्यामुळे हलाखीचे दिवस वाटयाला आले.

गरिबीच्या चक्रातून सुटका

याच काळात म्हणजे १९९५ साली पाणलोट क्षेत्राचे काम आमच्या गावात सुरु झाले व त्यामुळे तेथे आम्हांला मोलमजुरीचे काम मिळू लागले. त्यामुळे आमचा प्रपंच व्यवस्थित चालू लागला. पाणलोट क्षेत्राच्या कामाबरोबर त्या लोकांनी गावात स्वयंसाहाय्य गटाचे मार्गदर्शन केले. आम्ही त्याचे सदस्य झालो. स्वयंसाहाय्य गटामध्ये महिलांच्या वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा होत असे, वयोमानानुसार आम्हांला कष्टाचे काम देखील झेपेनासे झाले होते. तेव्हा आम्ही असा विचार केला की, आपल्याला घरबसल्या काही उदयोग करता येईल का? याच काळात स्वयंसाहाय्य गटाच्या माध्यमातून विविध लघू उद्योगांविषयी माहिती दिली गेली. घरबसल्या, सुरुवातीला आम्ही कुक्कुटपालन केले. पण हवामानामुळे ते जास्त दिवस टिकले नाही.

संयुक्त महिला समितीने गटातील भूमिहीन सदस्यांना रु. ४३,०००/- चे कर्ज वाटप केले होते. तेथून मी रु. ६०००/- कर्ज बोंबील धंद्यासाठी घेतले आणि आमचा घरबसल्या बोंबील विक्रीचा धंदा सुरु झाला. घेतलेले कर्ज आणि व्याज दरमहा हप्त्याने, ५८०/- रु. प्रमाणे संयुक्त महिला समितीला परत करीत आहे. बोंबील (माल) नगरहून ८०/- रु. किलो प्रमाणे एका वेळी ५० ते ६० किलो खरेदी करते. दर १५ दिवसांनी माल खरेदी करते. दर महिन्याला गावात व गावाबाहेरसुद्धा अंदाजे १०० किलोपर्यंत बोंबिलांची विक्री होते. सर्व खर्च वजा जाता जवळपास महिन्याचा फायदा २५००/- ते ३०००/- पर्यंत होतो. अशा प्रकारे व्यवसाय जोरात चालू आहे.

छ्बुबाई महिला प्रवर्तक बनल्या

नुसतेच घरबसल्या उद्योगधंदा करून चालणार नव्हते, तर आजूबाजूच्या खेडयांचा जो बाजार भरतो त्या ठिकाणी पण अधूनमधून बाजारात बोंबील विक्री करते. दरवेळेस माझ्या मनात विचार येत असे की, जसा माझा फायदा झाला त्याचप्रमाणे इतरही गरीब व माझ्यासारख्या गरजू महिलांचाही गटाच्या माध्यमातून फायदा होऊ शकतो. म्हणून बाजाराच्या ठिकाणी ज्या महिला येत असत, त्यांना मी स्वयंसाहाय्य गटामुळे माझा जो फायदा झाला, जी प्रगती झाली त्यासंबंधीची माहिती देऊ लागले, व गट चालू करण्यासाठी त्या महिलांना प्रोत्साहन देऊ लागले. यामुळे त्या खेडयातील महिलांना देखील त्यांच्या गावामध्ये २ स्वयंसाहाय्य गट तयार केले.

आज मी सुखसमाधानी आहे. स्वयंसाहाय्य गटाचे महत्त्व मी प्रत्येक महिलेला पटवून सांगते, तसेच बाजूबाजूच्या खेडयांत गटाचा प्रसार करण्याचा प्रयत्न चालू आहे. या कामातच मी माझे दु:ख विसरण्याचा प्रयत्न करते.

  • तुम्ही स्वयंसाहाय्य गट आपल्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या गावामध्ये वाढविण्यासाठी काय करू शकता?
  • तुम्ही तुमच्या गरातील महिलांना किंवा शेजारील  गावातील महिलांना स्वयंसाहाय्य गट सुरु करण्यासाठी कसे प्रवृत्त कराल यावर तुमचे विचार मांडून चर्चा करा.
  •  

    लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

    स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका

    अंतिम सुधारित : 7/20/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate