‘पैसा’ या पैशाची आवश्यकता सगळ्यानांच असते. त्यातल्या त्यात महिलांना पैशाची गरज नेहमी भासत असते. घरातील घरखर्च , आजारपण, अन्नधान्य, लग्नकार्य या छोट्यामोठ्या कारणासाठी पैशाची गरज भासत असते. त्यावेळी एकदम पैसा महिलांजवळ नसतो. मग एकदम पैसा हातात कसा राहील, तर तो बचत केला तर राहील. मग बचत करण्याचे ठरवले.
भोयरेखुर्द हे आमचे गाव अहमदनगरपासून १२ कि.मी. अंतरावर आहे. १९९४ साली आमच्या गावात शहरातून काही लोक आले, त्यांनी सांगितले की आम्ही मंचयनी या संस्थेचे लोक आहोत आणि आम्ही खेडयात जाऊन लोकांना संस्थेत गुंतवणूक करण्यास सांगतो. कारण त्यात तुमचा फायदा आहे. गुंतवणूक केल्यामुळे बचत देखील होईल आणि पाच वर्षानंतर भरपूर व्याजासह पैसा परत मिळेल. तुम्हाला रक्कम दर महिन्याला भरायची, त्यामुळे जास्त पैशाचा भर तुमच्यावर येणार नाही.
आम्ही विचार केला, की असे एकदम पैसे आपल्याकडे नसतात. जर आपण या संस्थेत पैसे भरले तर पाच वर्षानंतर व्याजासह चांगली रक्कम आपल्या हाती येईल आणि बचतपण होईल. म्हणून आम्ही संस्थेत पैसे भरू लागलो. संस्थेचा एजंट दर महिन्याला येवून पैसे घेऊन जात असे. दोन-तीन महिने झाले, तो एजंट येऊन पैसे घेवून जात असे. त्यामुळे आमचा विश्वास बसला होता. पण सहा महिन्यानंतर, अचानक त्या एजंटने गावात येणे बंद केले, आम्ही त्या एजंटची खूप चौकशी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आम्ही भरलेल्या पैशाचे काय झाले हे कळायला काहीच मार्ग नव्हता. खूप उशिरा कळाले की, त्या माणसाने आम्हाला फसविले. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान खूप झाले. आता बचत करावयाची म्हटली तरी भीती वाटते.
१९९६ मध्ये आमच्या गावात इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम या संस्थेची कामे सुरु झाली होती. एक भाग म्हणून गावात स्वयंसाहाय्य गट तयार करणे हा होता. विठ्ठल ग्रामीण विकास संस्था आणि ‘वॉटर’(WOTR) या संस्था क्षमता बांधणी टप्प्याचे काम करतात. यांनी मिळून स्वयंसाहाय्य गटबांधणीस सुरुवात केली. पण पूर्वीच्या अनुभवामुळे बचत करण्यास कुणीही एकत्र येण्यास तयार होत नव्हते. परंतु संस्थेने त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्यासाठी त्यांनी गावात महिलांच्या नियमित बैठका व ग्रामसभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी इतर ठिकाणी जी कामे केली, जे स्वयंसाहाय्य गट सुरु केले त्याविषयी माहिती आम्हाला सांगितली. पण आमचा अजूनही बचत करण्यावर विश्वास बसत नव्हता. मग संस्थेने कडूस व कळमकरवाडी या गावांना भेट देण्यासाठी आम्हाला नेले. तेथील महिला दर महिन्याला एकत्र येऊन रु. १० ची बचत करतात. १० ते १५ जणींना मिळून एक स्वयंसाहाय्य गट तयार केलेला आहे. त्यामध्ये पैसे हे गटातील निवडलेल्या अध्यक्षाकडे जमा केले जातात. हेच पैसे ज्यांना कर्ज पाहिजे असतील त्यांना २% व्याजदराने कर्ज दिले जाते. त्या कर्जाची परतफेड ही पाच महिन्यात करावी लागते. गटातील सर्व कामाची तपशीलवार नोंदणी केलेली होती. हा सर्व व्याहार गरासमोर प्रत्येक मिटींगच्या वेळी मंडळा जातो. स्वयंसाहाय्य गटाचा फायदा कसा होतो हे तेथील महिलांच्या बोलण्यातून जाणवत होता. आता आम्हला स्वयंसाहाय्य गटाबद्दल सर्व माहिती कळाली होती. त्यामुळे त्यावर आमचा विश्वास बसला. नंतर आम्ही गावात येऊन ६६ महिला मिळून ४ स्वयंसाहाय्य गट तयार केले. गटाअंतर्गत कर्जाची देवाणघेवाण सुरु केली. जी महिला वेळेवर कर्जाची परतफेड करत नाही तिच्याकडून रु. ५/- दंड वसूल करण्याचे ठरविले. ‘वॉटर’(WOTRWOTR) संस्थेने सुरुवातीला स्वयंसाहाय्य गट कसा चालवायचा याविषयीचे प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे आता स्वयंसाहाय्य गटाचे कामकाज व्यवस्थित पार पडले जाते. आतापर्यंत, म्हणजे २००० सालामध्ये आमचे ६ स्वयंसाहाय्य गट तयार झालेले आहेत. त्यामध्ये ९८ महिला (गावाच्या ९०% प्रौढ महिला) सहभागी आहेत. स्वयंसाहाय्य गटामुळे आम्हाला जो फायदा झाला त्याविषयीची माहिती आता शेजारच्या गावातील महिलांना सांगितली. त्या महिलांनी देखील स्वयंसाहाय्य गट सुरु केले.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 8/7/2020
आता तरी बायांनो बोलक्या व्हा !! चार गोष्टींचा विच...
१९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ ग...
मी कौसाबाई कांदे. माझे आयुष्यच ह्या स्वयंसाहाय्य ग...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...