राहुरी तालुक्यातील कणगर हे आमचे छोटेसे गाव. १९९६ पासून आमच्या गावात महिलांचे पाच स्वयंसाहाय्य गट आहेत. दर महिन्याला आम्ही महिला स्वयंसाहाय्य गटामध्ये रु. १०/- प्रमाणे बचत करतो व गटांतर्गत कर्जाचे वाटप करत असतो.
दर महिन्याला गटाच्या मीटिंग होत असत त्यामध्ये दरवेळी विविध विषयांवर चर्चा होत असे. एकदा गटामध्ये महिला समाज सेविकेने, आम्हाला विविध उद्योगधंद्याविषयी माहिती सांगितली. महिलांनी गटामध्ये चर्चा केली की, आपण आपल्या गटाचे आर्थिक उत्पादन कसे वाढवू शकतो. गटातीलच एका महिलेने सुचविले, की कांदा भरण्यासाठी गोणपाटाच्या गोण्या लागतात. त्या आणण्यासाठी दरवेळी राहुरीला जावे लागते. प्रवास खर्च तर होतोच, तसेच एका महिलेनी सांगितले, की एका दिवसाची रोजदारी देखील बुडते. जर आपणच गोण्या आणून विक्री केली तर आपला प्रवास खर्च वाचेल आणि जो उद्योगधंदा आपण करणार त्या मालाची विक्री आपल्याच गावात होईल व रोजंदारी पण बुडणार नाही. या विषयावर गटामध्ये पुन्हा चर्चा झाली. हा उद्योगधंदा खरंच चांगला आहे आणि गावात त्याचा खप देखील चांगला होईल. कारण गावामध्ये निम्म्यापेक्षा अधिक शेतकरी कांद्याचे पीक घेतात. हा व्यवसाय करण्याचा निर्णय आम्ही महिलांनी घेतला व महिला समाजसेविके पुढे आम्ही हा विषय मांडला. त्यांनी सांगितले, की तयार गोण्या आणण्यापेक्षा गोणपाट आणून त्यापासून गोण्या शिवून विकल्या तर नफा चांगला होईल.
गोण्या कशा तयार करायच्या? त्यासाठी लागणारे समान कुठे मिळेल? या विषयीची सर्व माहिती आम्ही गोळा केली. संगमनेरमध्ये एक व्यक्ती गोण्या शिवण्याचे काम करते. त्या ठिकाणी गटातील दोन महिलांनी जाऊन गोण्या शिकण्याचे प्रशिक्षण घेतले व गोण्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याला किती खर्च येतो याविषयीची माहिती घेतली.
मग गावात येऊन गोण्या बनविण्याचा उद्योगधंदा सुरु केला. गावात भाडयाने एक दुकान घेऊन तेथे दोन महिला गोणपाट कापून देत व इतर महिला घरी नेऊन त्यापासून हाताने गोण्या शिवून दुकानात परत आणून देत. प्रत्येक महिलेला शिवलेल्या गोण्यांप्रमाणे पैसे दिले जात. मग त्या गोण्या विक्रीसाठी दुकानात ठेवल्या जात. गावात कांद्याचे पीक वर्षभर मोठया प्रमाणात घेतले जात असल्यामुळे गोण्यांना वर्षभर मागणी असते. कांद्याशिवाय इतर कामासाठी गोण्यांचा वापर मोठया प्रमाणावर होत असल्यामुळे वर्षभर गोण्यांचा खप चांगला होतो. त्यातून आम्हाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत झाली.
या उद्योगासाठी आम्ही ‘वॉटर’(WOTRWOTR) या संस्थेकडून रु.३०,०००/- चे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची व्याजासहित परतफेड केलेली आहे. आम्हाला मोठया प्रमाणवर हा उद्योगधंदा करायचा आहे. त्यासाठी कलकत्त्याहून एकदम गोणपाटाचे गठ्ठे खरेदी करून त्यापासून गोण्या तयार करून बाहेरील बाजारपेठेत नेऊन विक्री करण्याचा आमचा विचार आहे. पण यासाठी आम्हाला मोठया भांडवलाची गरज आहे. त्यासाठी इतर संस्थांकडून कर्ज घेण्याच्या विचारात आहोत.
यातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. आत्मविश्वासाने बोलणे, विक्री संबंधीची माहिती निर्णय क्षमता, व्यवहार करताना शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे समजले.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 8/31/2020
१९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ ग...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग ये...
आता तरी बायांनो बोलक्या व्हा !! चार गोष्टींचा विच...