केंद्र शासनाच्या मुद्रा बँक योजनेमुळे होतकरु व्यावसायिकांना मुद्रा कमावण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:बरोबरच देशाच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे.
सातारा येथील वैशाली शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी पुणे, मुंबई येथे स्वत: जाऊन ब्युटी पार्लर व्यवसायातील अत्याधुनिक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर साताऱ्यात येऊन स्वत:चा पार्लरचा व्यवसाय सुरु केला. मात्र अत्याधुनिक सुविधा, त्यासाठी लागणारे साहित्य यासाठी छोट्या पार्लरचा विस्तार करणे आवश्यक होते. श्रीमती शिंदे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, पोवई नाका शाखा येथून मुद्रा बँक योजनेअंतर्गत दोन लाखांचे कर्ज मंजूर करुन घेतले. या कर्जाच्या माध्यमातून आपल्या पार्लरचा चांगल्या पद्धतीने विस्तार केला आणि आज त्या मुंबई, पुणे येथील पार्लर प्रमाणेच साताऱ्यातील ग्राहकांना सुविधा देत आहेत.
मुद्रा बँक योजनेविषयी समाधान व्यक्त करुन श्रीमती शिंदे म्हणतात, नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या होतकरु, मेहनती आणि गरजवंत लाभार्थ्यांसाठी मुद्रा बँक योजना ही अत्यंत चांगली योजना केंद्र शासनाने सुरु केली आहे. मुद्रा बँक मुळे मी माझ्या पार्लरचा विस्तार करु शकले. जेणे करुन चांगल्या तंत्रशुद्ध अत्याधुनिक सुविधा साताऱ्यासारख्या शहरात मला देता आल्या. मुद्रा मुळे माझं छान पार्लर उभं झालेलं आहे. मुद्रा मुळे मी स्वत: उभी झाले. त्याशिवाय या पार्लरच्या माध्यमातून चार महिला कर्मचाऱ्यांना रोजगार देता आला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. हे सर्व मुद्रामुळे शक्य झाले.
बँक ऑफ महाराष्ट्र पोवई नाका शाखेचे वरिष्ठ प्रबंधक अनिल बारटक्के यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, वैशाली शिंदे या आमच्या शाखेच्या खातेदार आहेत. त्यांनी छोट्या पार्लरची सुरुवात केली होती. त्याच्या विस्तारासाठी त्यांना भांडवलाची आवश्यकता होती. बँकेने त्यांना दोन लाखाचे कर्ज मंजूर केले. आज अखेर या शाखेच्या माध्यमातून 40 लाभार्थ्यांना 1 कोटी 45 लाख रुपयांचे कर्ज मुद्रा बँक योजनेतून वितरीत करण्यात आले आहे. यामध्ये किराणा माल व्यवसाय, फूट वेअर व्यवसाय, झेरॉक्स व्यवसाय, ब्युटी पार्लर, स्टेशनरी आदींचा समावेश आहे.
मुद्रा बँक योजनेमुळे नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी तसेच व्यवसायाचा विस्तार करुन मुद्रा कमावण्याची संधी शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. याचा लाभ जरुर करुन घेऊन स्वत: बरोबरच देशाच्या विकासात योगदान देता येईल.
लेखक-प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा.
स्त्रोत-महान्युज
अंतिम सुधारित : 7/8/2020
मुद्रा बँक योजनेमुळे स्वयंरोजगार वाढत असून लाभार्थ...
*९९# सर्व्हिस कशा प्रकारे काम करते याची माहिती याम...