मुद्रा बँक योजनेमुळे स्वयंरोजगार वाढत असून लाभार्थ्याबरोबरच देशाचा आर्थिक विकास होण्यासही एक प्रकारे मदत होत आहे. नवीन रोजगार सुरु करणाऱ्यांसाठी तसेच सुरु असणाऱ्या व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी मुद्रा बँक योजना अतिशय लाभदायी ठरत आहे.
विदर्भ कोकण ग्रामीण बँक, शाखा गोडोली मधून मुद्रा बँक योजनेतून कर्ज घेऊन पवनराम शर्मा आणि मोहन घाडगे यांनी आपला व्यवसाय वाढवला. आज दोघेही आपली आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे करीत आहेत. या बाबत पवनराम शर्मा म्हणाले, चारवर्षापूर्वी गोल्डन स्वीटस् नावाने आपण दुकान सुरु केले होते. परंतु दुकानामध्ये फ्रीज, फर्निचर काही नव्हते. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून सुरुवातील एक लाखाचे कर्ज घेतले. त्यातून तीन फ्रीज विकत घेऊन कोल्ड्रींकचा विभाग सुरु केला. यामधून माझा व्यवसाया वाढला. परत मला भांडवलाची आवश्यकता होती. त्यामुळे पुन्हा तीन लाखाचे कॅश क्रेडीट कर्ज घेतले. आज माझ्या दुकानामध्ये आवश्यक ते फर्निचर सीसीटीव्ही आदी सुविधा आहेत.
व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून माझी आर्थिक प्रगती होत आहे. शिवाय माझ्या दुकानामध्ये पाच कर्मचाऱ्यांना मी नोकरी देऊ शकलो. हे केवळ या विस्तारलेल्या व्यवसायामुळेच करु शकलो आणि मुद्रा बँक योजनेमुळे माझ्या व्यवसायाचा विस्तार करु शकलो.
श्री महालक्ष्मी ज्वेलर्सचे मोहन घाडगे म्हणाले, गोडोली सारख्या ठिकाणी दुकान सुरु करुन छोटा व्यवसायाला प्रारंभ केला. परंतु व्यवसायाच्या विस्तारासाठी भांडवलाची आवश्यकता भासली. त्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून मुद्रा योजने अंतर्गत 1 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यामुळे भांडवलात वाढ करता आली. अतिशय कमी कागदपत्रात कर्ज मिळवून मी आज प्रगती करु शकलो.
नवीन उद्योजक, छोटे मोठे उद्योजक तसेच सुशिक्षीत बेरोजगारांनी मुद्रा बँक योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करुन, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा प्रबंधक सूर्यकांत साठे म्हणाले, शिशु गटात 52 लाभार्थ्यांना 17 लाखांचे तसेच किशोर गटात 12 लाभार्थ्यांना 22 लाखांचे कर्ज वाटप विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने केले आहे. आज हे सर्व लाभार्थी अत्यंत चांगल्या पध्दतीने आपला व्यवसाय करुन कर्जाची परतफेड करीत आहेत. या परतफेडीमधूनच बँक आणखी नवीन गरजू लाभार्थ्यांना निश्चितच कर्ज देईल. लाभार्थ्यांनी मुद्रा बँक योजनेचा लाभ करुन घ्यावा आणि स्वत:च्या, गावाच्या तसेच देशाच्या विकासात हातभार लावावा असे आवाहनही श्री.साठे यांनी यावेळी केले.
मुद्रा बँक योजनेमुळे स्वत:च्या, आपल्या गावाच्या तसेच देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गरजवंतांना शासकीय योजनेचा लाभ देणे आणि लाभार्थ्यांनी प्रामाणिकपणे योजनेचा लाभ घेणे ही बँक आणि लाभार्थी या दोघांनाही देशसेवा करण्याची एक प्रकारचे संधीच उपलब्ध झाली आहे.
लेखक - प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 6/13/2020
पारंपरिक शिक्षण घेऊन नोकरीचा शोध घेण्यापेक्षा ज्या...
कमल कुंभार श्रेष्ठ महिला उद्योजक पुरस्काराने सन्मा...
नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य वस्त...
श्री.के.विवेकानंदन, कोईम्बतूर, (तामिळनाडु) यांनी र...