मारुती कंदले
खारपाले येथील मिलनताई राणे यांची कौटुंबिक स्थिती बेताची होती. पतीच्या प्रयत्नांना हातभार म्हणून त्या परिसरातील आठवडी बाजारात विविध प्रकारचे पापड विक्रीला नेत. उडीद - तांदळाच्या चवदार, दर्जेदार पापडांना बाजारात चांगली मागणी असे. सन 2007 मध्ये सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस या बाजारपेठ उपक्रमामुळे त्यांच्यातील उद्यमशीलतेची बीजे रुजायला मदत झाली. दारिद्य्ररेषेखालील महिलांचा विघ्नहर्ता बचत गट स्थापन करून त्यांनी गावातील गरजू महिलांना संघटित केले. उपलब्ध संधीतून आर्थिक उन्नती साधण्याचा वस्तुपाठ त्यांना घालून दिला. महालक्ष्मी सरस आणि कोकण सरस असे हे मुंबईत वर्षातून एकदा भरणारे दोन बाजार नजरेसमोर ठेवून नियोजन केले. मागणी व विक्रीचा अंदाज घेत महिलांच्या हाती कायम काम राहील असे नियोजन केले. आज त्यांच्या या प्रयत्नांना वर्षाला लाखो रुपयांच्या उलाढालीची झालर लाभली आहे. सध्या मिलनताई मुंबईतील रहेजा ग्रुपच्या तीन स्टार हॉटेल्सना खाद्यपदार्थ पुरवतात. दर्जा व चवीतील सातत्यामुळे त्यांच्या उत्पादनांच्या ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
शेतीतही आघाडी
प्रयोग म्हणून मिलनताईंनी आपल्या शेतात हळद लावली. समाधानकारक उत्पन्न मिळत असल्याचे पाहून त्यांनी सोबतच्या महिलांनाही त्यासाठी प्रोत्साहन दिले. सामूहिक प्रयत्नांमधून आज वर्षाला दहा ते बारा टन हळदीचे उत्पादन घेतले जाते. ही हळद सेंद्रिय पद्धतीने घेण्यावर कटाक्ष असतो, त्यामुळे या हळदीला किलोमागे पाचशे रुपये असा चांगला दर मिळतो. यंदा सामूहिक प्रयत्नांतून 20 टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. सामूहिक प्रयत्नांतून कलिंगडाचीही यशस्वी शेती केली आहे.
कोकणातील भाताची परंपरा असल्याने बचत गटातील महिला जया, रत्ना, मसुरी, कोमल, गुजरात अकरा, सारथी तसेच म्हाडी (राता किंवा लाल रंगाचा तांदूळ) आदी भात जातींचे उत्पादन घेत आहेत. यातील काही तांदळाच्या पिठाचा वापर पापड व वडे पिठासाठी, तर काही प्रमाणात पोहे तयार केल्यानंतर उर्वरित तांदूळ व तांदळाचे पीठ बाजारात विक्रीसाठी आणले जाते. म्हाडी तांदूळ मधुमेही रुग्णांसाठी लाभकारक आहे, त्यामुळे ग्राहकांकडून त्यास आग्रही मागणी आहे.
बचत गटाची उत्पादने -
- तांदळाचे सुमारे बारा प्रकारचे पापड - यात साधे, फेणी (पापडाचा प्रकार), कोथिंबीर, पालक, टोमॅटो, कारले, मेथी, जिरा, मसाला, नाचणी, लाल मिरची ठेचा, हिरवी मिरची ठेचा पापड आदी प्रकार
- तांदळापासून वडे पीठ - त्याचा वापर थालीपीठ बनविण्यासाठी होतो. अडीचशे रुपये प्रति किलो पापडांना दर
- तीन प्रकारचे पोहा पापड - यात हिरवी मिरची, लाल मिरची, ताकातला पापड, निरगुंडा (चिप्स) असे प्रकार.
दोनशे रुपये प्रति किलो दर
- तांदळापासून पाच प्रकारचे पोहे - उदा. पांढरा पोहा, कांदा पोहा, पातळ पोहा (चिवडा), फोडलेला पोहा व भट्टीत भाजलेला पोहा. दर - शंभर रुपये प्रति किलो
- उडदापासूनही विविध प्रकारचे पापड - उदा. प्लेन, मिरे, लसूण, लाल मिरची ठेचा आणि हिरवी मिरची ठेचा पापड
- उडदाच्या पिठापासून डांगर बनविले जाते
-
चणाडाळीपासून ढोकळा पीठ
- चणा, उडीद, मूग डाळींचे सांडगे बनविले जातात. मिरची पावडर, मिरची गरम मसाला यांचेही उत्पादन घेतले जाते.
- कुळीथ, काळे मूग, हिरवे मूग, नाचणी, हरभरे, कडवे वाल, चवळी, काबुली चणा, मटकी, काळे वाटाणे, तूर
- आदिवासी भागातील शुद्ध मध, चिंच व कंदमुळांचे व सुरणाचे विविध प्रकार
स्पर्धेत टिकून राहताना या गोष्टी पाळल्या जातात -
- स्पर्धक पदार्थांशी तुलना करता दरात साधर्म्य असायला हवे.
- पदार्थांचे पॅकिंग, लेबलिंग आकर्षक असते.
- स्टॉलवर ग्राहकांच्या सूचना घेण्यासाठी खास नोंदवही, त्यांच्या सूचनांचा आवर्जून विचार केला जातो.
- दर्जातील सातत्यामुळे बचत गटाशी आज साडेतीन हजार कायमस्वरूपी ग्राहक जोडले आहेत.
वैयक्तिक व बचत गटाच्या पातळीवर भांडवल ही मोठी अडचण असल्याचे मिलनताई सांगतात. तारण नसल्याने बॅंका कर्ज देत नाहीत; मात्र मिलनताईंनी प्रयत्नांती कमावलेली पतच त्यांच्यासाठी मोठे तारण बनले आहे. त्यांची उद्यमशील वृत्ती व व्यवहार परतफेडीचा अनुभव पाहून बॅंका त्यांना अर्थसाहाय्य देण्यास तयार होतात, त्यातूनच सध्या रहेजा ग्रुपच्या हॉटेल्सना माल पुरवण्याचे कौशल्य साधले आहे.
अशी मिळाली रहेजा ग्रुपची ऑर्डर -
रहेजा ग्रुपच्या मालक श्रीमती बिंदू रहेजा महालक्ष्मी सरसमधील विघ्नहर्ता बचत गटाच्या स्टॉलवर येत असत. सलग तीन वर्षे त्या स्वतःची ओळख न सांगता त्यांच्या स्टॉल्सवरून हजारो रुपयांच्या वस्तूंची खरेदी करत असत. वस्तूंचा दर्जा आणि सातत्याने प्रभावित होऊन त्यांनी मिलनताईंना रहेजा ग्रुपच्या तीन हॉटेल्सची ऑर्डर दिली. सुमारे दीडशे प्रकारचे घटक या हॉटेल्सना त्या पुरवतात. त्यात सुमारे 35 प्रकारची उत्पादने त्यांची स्वतःची असतात. याकामी त्यांचे पती कृष्णा राणे यांचे मोठे सहकार्य लाभते. आठवड्यातून एकदा सुमारे दोन टन माल पुरवला जातो. महिन्याकाठी सुमारे पाच लाख रुपयांची उलाढाल होते. वर्षाचा हा आकडा साठ लाखांच्या घरात जातो. बचत गट म्हणून इतकी गुंतवणूक करण्यास कोणी तयार होत नाही. पुन्हा नुकसान झाले तर कोण सहन करणार, हा विषय असतोच, त्यामुळे मिलनताई स्वतःच ही जोखीम घेतात. अलीकडेच त्यांनी वीस बचत गटांचा एक महासंघ स्थापन केला आहे, त्यात गावातील सुमारे सव्वादोनशे महिलांचा सहभाग आहे. भविष्यात हा डोलारा त्यांना या महासंघाच्या माध्यमातून चालवायचा आहे. महालक्ष्मी सरसमध्ये श्रीमती रहेजा त्यांच्या स्टॉलपुढे बसून स्वतः ग्राहकांना बचत गटाच्या उत्पादनाची खासियत पटवून सांगतात, त्यामुळे मिलनताई त्यांना गुडलक आँटी म्हणतात. श्रीमती रहेजाही आदराने या उपाधीचा स्वीकार करतात. महालक्ष्मी सरस आणि कोकण सरसमध्ये उत्पादनांची सर्वाधिक विक्री केल्याबद्दल अनेकदा त्यांच्या गटाला गौरविण्यात आले आहे.
सामाजिक कार्यातील सहभाग -
कुणाला कर्ज हवे असते, तर कुणाच्या मुलीची- सुनेची प्रसूती असते. अशा सर्व वेळी रात्री-अपरात्री आधार म्हणून मिलनताई महिलांच्या पाठीशी उभ्या असतात. केवळ स्वतःला नव्हे, तर परिसरातील महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणाऱ्या मिलनताईंचा हा स्वभावपैलूचा आदर्श आहे. महिलांत त्यांनी अध्यात्माचीही आवड रुजवली आहे.
विघ्नहर्ता महिला बचत गट - 9209610571
अध्यक्षा - मिलनताई कृष्णा राणे, रा. खारपाले, ता. पेण, जि. रायगड