गाव : लापोडिया
जिल्हा : टोंग
गावातले एक गृहस्थ. कुटुंब मोठं, मुलं जास्त. सगळ्यांना हाताला काम हवं. शेतजमीन भरपूर; पण कोरडवाहू. पावसाचे प्रमाणही खूप कमी. काय करावं? गावातल्या सगळ्यांचीच थोड्या-बहुत फरकानं अशीच परिस्थिती. गावातच जर शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं तर...! एकत्र येऊन चर्चा झाल्या. एका अनुभवी गुराख्यानं "चौका सिस्टिम‘ सुचवली. ठरलं तर मग! सगळं गाव कामाला लागलं. लांबलांबच्या उजाड माळरानावर "चौके‘ खणायला सुरवात झाली."चौ का सिस्टिम‘ म्हणजे एक मोठा चौक. त्याच्या आत पुन्हा छोटे चौक. सगळ्यांची खोली फक्त नऊ इंच. कारण गवतही उगवलं पाहिजे. पावसाळ्यात वाहणाऱ्या नाल्याच्या, ओहोळाच्या प्रवाहात असे अनेक चौके एका विशिष्ट पद्धतीनं खोदले गेले.
बघता बघता पावसाचं पडणारं पाणी अडवलं गेलं. जिरवलं गेलं. भूगर्भाची पाण्याची पातळी वाढली. गायरानं विकसित झाली. जनावरांना भरपूर चारा उपलब्ध झाला. शेतीचं उत्पन्न वाढलं. कमी जमीन असणाऱ्यांनी जास्तीत जास्त जनावरं पाळण्यास सुरवात केली. दुधाचं उत्पन्न वाढलं. आज गावात 20 दूधसंकलन केंद्रं आहेत. गावातलं एका दिवसाचं दूधसंकलन 20 हजार लिटरपर्यंत पोचलं. हळूहळू गावात मोठं तळं उभं राहिलं. अनेक पक्षी, प्राणी परिसरात पाहायला मिळतात. पोपट, चिमण्या, कोतवाल, ट्री-पायर असे अनेक पक्षी इथं झुंडीझुंडीनं बागडताना आढळतात. गावात "कबूतरदान‘ पेटी आहे. बाजूलाच व्यवस्थित कुंपण घातलेला "कबूतरखाना‘ आहे. अनेक प्रकारचे पक्षी इथं ताव मारताना दिसतात.
शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशींसाठी गावाच्या परिसरात भरपूर चारा आहे. एक खास "चरागा‘ फक्त वन्यजीवांसाठी आहे. तिथं आपली जनावरं चारण्यासाठी कुणीही घेऊन जात नाही. वन्यजीवांसाठी तिथं विशिष्ट पद्धतीनं बांधून घेतलेला पाण्याचा कुंड आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व जाणून शाश्वत सहजीवनाचा उत्कृष्ट मेळ घातला गेलेला लापोडियात पाहायला मिळतो. गावातल्या पाण्याच्या या कामामुळं आलेल्या समृद्धीनं परिसरातली गावंही इकडं आकर्षित झाली आहेत. परिसरातल्या अनेक गावांनी प्रेरणा घेऊन शाश्वत सहजीवनाचा मंत्र घेतला आणि आपापला पाण्याचा प्रश्न सोडवला.
माहिती संकलन - नीलिमा जोरवर
अंतिम सुधारित : 7/29/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
उस शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजन...