पोडॉस्टमोनेसी : (नदीतृण कुल). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग द्विदलिकित वर्गात (बियांत दोन दले असलेल्या गटात) समाविष्ट असलेल्या ह्या लहान कुलाला हल्ली पोडॉस्टेमेसी अशीही संज्ञा वापरलेली आढळते. ए. बी. रेंडल यांनी ह्या कुलाचा अंतर्भाव रोझेलीझ गणात (गुलाब गणात) इतर दहा कुलांबरोबर केला आहे. ह्या कुलात व सॅक्सिफ्रागेसी कुलात (पाषाणभेद कुलात) साम्य असून त्यांचे आप्तभाव आहेत. त्यांचा उगम रॅनेलीझ गणापासून (मोरवेल गणापासून) प्रथम सॅक्सिफ्रागेलीझ गण (पाषाणभेद गण) व त्यांच्यापासून क्रॅसुलेसी कुलाद्वारे (घायमारी कुलाद्वारे) झाला असावा, कारण क्रॅसुलेसी कुलाशीही त्यांचे आप्तभाव आहेत व त्यापासून हे कुल (पोडॉस्टेमोनेसी) ऱ्हसनाने (अवनतीने) निघाले असावे, असे मत पंचानन माहेश्वरी यांनी व्यक्त केले आहे. ह्या कुलात सु. ४५वंश व १३०जाती (ए. एंग्लर यांच्या मते ४३वंश व १४०जाती) असून त्या बव्हंशी उष्ण कटिंबधात आढळतात; काही जाती उ. व द. समशीतोष्ण प्रदेशांत आहेत. सर्वच जाती वैशिष्ट्यपूर्ण आहेत कारण त्या सतत खळखळून वेगाने वाहणाऱ्या गोड्या पाण्यात खडकांस चिकटून वाढतात; त्यावरून नदीतृण हे कुलनाम दिलेले आढळते.
खडक उघडे पडल्यावर त्यांच्या सुक्या आणि चिकटलेल्या शरीराच्या चित्रविचित्र आकृती दृष्टीस पडतात. विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांचे सांधे (कायकाभ) शरीर शैवले, शेवाळी किंवा शैवाक कायक वनस्पति यांच्याप्रमाणे दिसते म्हणून त्यांना ‘जल-प्ररोधी’ असे नाव काहींनी सुचविलेले आढळते. उन्हाळ्यात ह्या वनस्पती जणू निद्रावस्थेत जातात व पावसाने पुन्हा जणू त्यांना नवचैतन्य मिळते, म्हणून ‘उभयचर’ असे कोणी म्हणतात. आसाम, मध्य प्रदेश, महाबळेश्वर, प्रतापगड, दूधसागर, आंबोली, गोवा इ. ठिकाणी त्यांच्या काही जाती आढळतात व त्या पाच वंशातील (टर्निओला, डिक्रिया, ग्रिफिथेला, झेलॅनिडियम, पोडॉस्टेमॉन इ.) आहेत. त्या जातींना पुढील मराठी नावे सुचविलेली आढळतात :
(१) त्रिपुटी (टर्निओला झेलॅनिका),
(२) अश्मपुष्पी (डिक्रिया स्ट्रायलोजा),
(३) घंटाकारी (ग्रिफिथेला हूकरियाना),
(४) अश्महरिता (झेलॅनिडियम लायकेनॉइडीस) आणि
(५) केशपर्णा (पोडॉस्टेमॉन स्युबुलेटम);
पोडॉस्टेमॉनला नदीतृण हे नाव आढळते. त्यांच्या शाकीय (पोषणाचे कार्य करणाऱ्या) अवयवांत विविधता व जटिलता आढळते. उन्हाळ्यात कोरड्या खडकावर पडलेले बी पाऊस सुरू होताच रुजते व त्यातून आलेल्या प्राथमिक अक्षापासून हिरवे कायकाभ शरीर बनते. हे आगंतुक मुळाचा प्रकार समजतात, कारण याच्या टोकास मूलत्राण (टोपीसारखे टोपण) असते. ते कधी रूपांतरित खोड असते; दोन्ही अंतर्भव (आतील कोशिकांपासून वाढत आलेली) असतात. पोडॉस्टेमम (पोडॉस्टेमॉन) वंशात हे काहीसे तंतूसारखे असून खडकास केसासारख्या तंतूंनी किंवा विशिष्ट बहिर्भव (पृष्ठभागापासून वाढलेले) अवयवांनी (स्थापनांगांनी) चिकटते. डिक्रियाचा प्ररोह तरता व पट्टीसारखा आणि हायड्रोब्रियमचा सपाट, प्रसर्पी (पसरत वाढणारा) व धोंडफुलासारखा शैवाक दिसतो; त्यापासून द्वितीयक बहिर्भव किंवा काही जातींत अंतर्भव शाखा वाढतात व पावसाळ्याच्या शेवटी त्यांवर फुले येतात. बहुतेक जातींत हवायुक्त पोकळ्या नसतात व वाहक वृंद (वाहक घटकांचे संच), ऊतककरहीन ऊतककर, संलग्न व विखुरलेले असतात. शाकीय भागांत मृदूतक व स्थूलकोनोतक असून खोडासारख्या भागात अंतस्त्वचा नसते शारीर, वनस्पतींचे. प्रकाष्ठाचे प्रमाणे कमी असून परिकाष्ठात मोठ्या चाळणी-नलिका असतात; सर्वांत बाहेरच्या कोशिका-थरात (पेशीच्या थरात) रेतीचे प्रमाण बरेच असल्याने वनस्पतींना काठिण्य व संरक्षण मिळते.
काही जातींत फार साधी, कधी फार विभागलेली लांबट सुईसारखी किंवा खवल्यासारखी व एकाआड एक पाने येतात. वनस्पतीवरून वाहणारे पाणी कमी झाल्यावर फुले उमलतात, फळे आणि त्यानंतर बी तयार झाल्यावर शाकीय भाग मरून जातात. या वनस्पतींची फुले साधी, फार लहान, द्विलिंगी, ३–५परिदलयुक्त किंवा नग्न व कीटक परागित (कीटकांद्वारे परागसिंचन होणारी) असतात; तळाशी छदकांचे आवरण असते. केसरदले १ - २किंवा अनेक आणि ऊर्ध्वस्थ किंजदले दोन व जुळलेली; किंजपुटात दोन कप्पे व अनेक बीजके फूल आणि फळात (बोंडात) असंख्य अपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश नसलेली) बीजे असतात. कोरड्या हवेशी संपर्क झाल्यास फळे तडकतात व असंख्य बिया वाऱ्याने किंवा पक्ष्यांकरवी (त्यांच्या पायास चिकटून) विखुरल्या जातात.
शाकीय व प्रजोत्पादक अवयवांत अनेक प्रारंभिक लक्षणे आढळतात; परिस्थितीच्या संदर्भात अनेक लक्षणे ऱ्हसित स्वरूपाची मानली आहेत; वर्गीकरणातील या कुलाचे स्थान विवाद्य मानले आहे. या कुलातील जातींचा व्यावहारिक उपयोग केलेला आढळत नाही. पहा : जलवनस्पति. पोडॉस्टेमोनेसी : (अ) अश्मपुष्पी (डिक्रिया स्टायलोजा) : (१) वनस्पती, (२) पूर्णपणे उमलेले फूल : (क) केसरदले, (ख) छदक, (ग) किंजल्क, (३) फुलोरा; (आ) त्रिपुटी (टर्निओला झेलॅनिका) ; (इ) घंटाकारी (ग्रिफिथेेला हूकरियाना) ; (ई) अश्महरिता (झेलॅनिडियम लायकेनॉईडीस); (उ) केशपर्णा (पोडॉस्टेमॉन स्युबुललॅटम).पोडॉस्टेमोनेसी : (अ) अश्मपुष्पी (डिक्रिया स्टायलोजा) : (१) वनस्पती, (२) पूर्णपणे उमलेले फूल : (क) केसरदले, (ख) छदक, (ग) किंजल्क, (३) फुलोरा; (आ) त्रिपुटी (टर्निओला झेलॅनिका) ; (इ) घंटाकारी (ग्रिफिथेेला हूकरियाना) ; (ई) अश्महरिता (झेलॅनिडियम लायकेनॉईडीस); (उ) केशपर्णा (पोडॉस्टेमॉन स्युबुललॅटम).
संदर्भ: 1.Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
2. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.
3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.
लेखक - शं. आ. परांडेकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 11/4/2019
फुलझाडांच्या ह्या वंशाचा समावेश कंपॉझिटी कुलात केल...
वनस्पती
खसखस व अफूकरिता करतात.
याचे मूलस्थान भारताचा ईशान्य भाग आहे. चीन आणि जपान...