অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॅपॅव्हरेसी

पॅपॅव्हरेसी

(अहिफेन कुल; अफू कुल). फुलझाडांच्या [⟶ वनस्पती, आवृतबीज उपविभाग ] ऱ्हीडेलीझ ह्या गणातील एक कुल. ⇨ निंफिएसी (कमल कुल), ⇨ क्रुसिफेरी (मोहरी कुल), ⇨ कॅपॅरिडेसी (वरूण कुल), ⇨ रॅनन्क्युलेसी (मोरवेल कुल), फ्यूमॅरिएसी [पर्पट कुल; ⟶ पित्तपापडा] इ. कुलांशी याचे निकट संबंध आहेत. ह्या कुलात ए. बी. रेंडल यांच्या पद्धतीनुसार सु. २८ वंश व ७०० जाती (जे. सी. विलिस यांच्या मते २६ वंश व २०० जाती; जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते २८ वंश व २५० जाती) असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधेतर व समशीतोष्ण प्रदेशांत आहे. भूमध्य सामुद्रिक प्रदेशांत काही वंश आढळतात. बहुतेक सर्व जाती ⇨ ओषधी, काही झुडपे व फारच थोडे वृक्ष असून सर्वांत ⇨ चीक असतो. काही जाती (उदा., पॉपी, एशोल्टझिया) बागेत लावतात. ⇨ अफूच्या झाडांची मोठी लागवड खसखस व अफूकरिता करतात. पिवळा धोतरा [ ⟶ धोतरा] हे काटेरी तण औषधी आहे. ह्या कुलातील जातींत पाने साधी, एकाआड एक, कधी मूलज (जमिनीतून मुळापासून आल्यासारखी दिसणारी) व गुच्छाकृती (झुबक्याप्रमाणे) असून त्यांची किनार कमीजास्त विभागलेली असते. फुले मोठी, नियमित, आकर्षक, द्विलिंगी, अवकिंज, क्वचित परिकिंज,एकेकटी व अनेक असल्यास मंजरीवर किवा कुंठीत (मर्यादित) फुलोऱ्यावर [⟶ पुष्पबंध] येतात. संदले दोन ते तीन, सुटी व लवकर गळणारी; प्रदले चार ते सहा किंवा आठ ते बारा व सुटी; केसरदले बहुधा अनेक, कधी दोन ते चार; किंजदले दोन किंवा अधिक; किंजपुट ऊर्ध्वस्थ व बहुधा त्यात एकच कप्पा असून बीजकविन्यास (बीजकांची मांडणी) तटलग्‍न असतो; किंजलाचा अभाव असून किंजल्क विभागून पसरलेला असतो [⟶ फूल]. बोंडातून छिद्रावाटे किंवा शकले होऊन लहान, गोलसर किंवा मूत्रपिंडाकृती तैलयुक्त बिया बाहेर पडतात. काहींची फळे तडकत नाहीत. फुलांतील मधाचा अभाव भरपूर परागाने भरून काढल्याने कीटक त्याकरिताच फुलांवर येतात.

 

लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate